महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या पोरींनी धमाल केली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यावेळी तब्बल ३४ वर्षांनंतर महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत समोरासमोर आले होते. एक चूक इंग्लंडला महागात पडली. एलिसा हिली ४१ धावांवर असताना तिला बाद करण्याची संधी इंग्लंडकडे चालून आली होती. ही संधी इंग्लंडने गमावली आणि त्यांच्या हातून विश्वचषक निसटला. एलिसा हिली हिच्या १७० धावांच्या ओझ्याखाली इंग्लंडचा संघ चिरडला गेला. ऑस्ट्रेलियाने ७१ धावांच्या आघाडीने सातव्यांदा महिला विश्वचषक खिशात टाकला.
एलिसाने १३८ चेंडूंमध्ये तब्बल २६ चौकार लगावत १७० धावा ठोकल्या. आतापर्यंत पुरुष किंवा महिला, कोणत्याही क्रिकेटपटूला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एवढ्या धावा ठोकता आल्या नाहीत. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता. गिलख्रिस्टने २००७ साली वेस्ट इंडिज येथे झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत १४९ धावा काढल्या होत्या. विजयासाठी ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या नॅट स्किव्हरने नाबाद १४८ धावा केल्या खऱ्या. पण तिला चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे इंग्लंडला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ७१ धावांनी पराभव पत्करावा लागला.
147 Total Likes and Views