इम्रान खान बचावले, पण ३ महिन्यात पाकिस्तानात निवडणुका

News World
Spread the love

पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर  विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणल्याने पाकिस्तान राजकीय संकटात गटांगळ्या खातो आहे.  ‘आपण शेवटच्या चेंडूपर्यंत खेळू’ असे हा एकेकाळचा क्रिकेटपटू म्हणाला होता.   त्यामुळे तिथे काय होते याची जगाला उत्सुकता होती. बरेच काही झाले. विरोधकांना अपेक्षित नव्हत्या अशा  नाट्यमय घटना घडल्या. इम्रानच्या गुगलीने विरोधकांच्या दांडी उडाली आणि इम्रान स्ट्म्प घेऊन  पळाले.  इम्रान तर बचावले. पण देशाला   येत्या तीन महिन्यात निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.             

           पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत इम्रान खान यांनी मोठा डाव खेळला.  अविश्वास ठराव  सादर होताच   उपसभापती कासिम खान सुरी यांनी तो फेटाळून लावला. ‘हा प्रस्ताव म्हणजे विदेशी षड्यंत्र आहे’ असे सांगत त्यांनी मतदान घेण्याचं टाळलं.  त्या नन्तर लगेच इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी  यांना  संसद बरखास्त करण्याची  शिफारस  केली. राष्ट्रपतींनी तो लगेच मान्य करीत येत्या तीन महिन्यात निवडणुका घ्यायला सांगितले आहे.

              इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना  सांगितले, की ‘परकीय शक्तींकडून कट रचून माझे सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र आता अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला असून मी याबद्दल पाकिस्तानी जनतेचं अभिनंदन करतो. जनतेने पुन्हा निवडणुकांची तयारी करावी असे आवाहनही त्यांनी केले.

             दरम्यान, अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याची कृती संविधानाच्या विरोधात असल्याचा आरोप पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) या पक्षाने केला आहे.  ३४२ सदस्यांच्या सभागृहात अविश्वास ठराव संमत होण्यासाठी १७२ सदस्यांची गरज होती. विरोधकांकडे  १७७ सदस्य होते. त्यामुळे  इम्रान सरकारचे दांडी उडणार असे सर्वांना वाटत होते. पण घटनेच्या पाचव्या कलमाचा  दाखला देत  उपसभापतींनी ठरावच उडवला.   पुन्हा निवडणुका घेण्याची नामुष्की ओढावल्याने पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा हवेत लष्करप्रमुख जनरल बाजवा काय भूमिका घेतात याकडे  जगाचे लक्ष आहे.  सत्ताधाऱ्यांना अटक करून सत्ता बळकावल्याचे प्रकार अनेकदा पाकिस्तानात घडले आहेत.  सध्या तरी पाकिस्तानात  शांतता आहे.  २२ कोटी लोकसंख्येचा  हा देश   राजकीय अस्थिरतेत लोटला गेल्याचे  तिथले विरोधी पक्षनेतेही मान्य करीत आहेत.

 220 Total Likes and Views

0 Comments

No Comment.