खुशखबर आहे. ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला असून २ एप्रिल म्हणजे गुढी पाडव्यापासून राज्यातील करोनाचे सर्व निर्बंध काढून टाकले आहेत. मास्क घालणं हे देखील बंधनकारक नसेल. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा. ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही. मंत्रीमंडळाच्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय झाला. सारे सण धूमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आल्याचं सांगताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. मास्कचा वापर ऐच्छिक केला असला तरी लोकांनी आपली आणि इतरांची काळजी घेण्यासाठी जमेल तिथे मास्क घालावा. त्यामुळे गुढीपाडवा, मुंबईतल्या शोभायात्रा, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे दिवस उत्साहात आपण साजरे करू शकू. ऐच्छिक केलं आहे याचा अर्थ काळजी घेऊन आपल्याला काम करायचं आहे. अमेरिका, इंग्लंड, युरोपमधील देशांनी मास्क मुक्त केले आहे. पण आपल्याकडे आपण ऐच्छिक केलं आहे. मुख्यमंत्री आणि इतर सर्वांनीच टास्क फोर्स, आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
निर्बंध गेले. पण करोना गेला का? ह्या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे. सध्या चीनमध्ये करोनाने धुमाकूळ चालवला आहे. पण आपल्याकडे करोनाचे नवे पेशंट नगण्य झाले आहेत. पण आहेत. गुरुवारी २४ तासात १२२५ नव्या केसेस आल्या. अर्थात दोन वर्षात करोनाने घातलेला धुमाकूळ पाहता ह्या काहीच नाहीत. जरा ते दिवस आठवा, जेव्हा लोक पटापट मरत होते, दवाखान्यात खाटा मिळत नव्हत्या, ऑक्सिजन सिलिंडर मिळत नव्हते, रेम्डेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारातही मिळत नव्हते. स्मशानात वेटिंग लिस्ट होती. हॉस्पिटलचे बिल भरताना अनेकांनी इस्टेट फुंकली. ९ मार्च २०२० रोजी भारतात करोनाचा पहिला पेशंट आला. दुबई येथून पुण्यात आलेले जोडपे पॉजिटीव्ह निघाले आणि एकच खळबळ उडाली. भारतात एकूण तीन लाटा आल्या. यातली दुसरी लाट भयंकर होती. दोन वर्षात महाराष्ट्रात ७८ लाख लोकांना करोनाने गाठले होते. आपल्याकडे करोनाबळींचा आकडा १ लाख ४३ हजार आहे. देशात सर्वात जास्त लोक महाराष्ट्रात मेले. त्या कटू आठवणी विसरून नवे पर्व सुरु करण्याची ताकद ह्या गुढी पाडव्याला दाखवू या.
330 Total Likes and Views