चैत्र महिना लागताच वेध लागतात ते रामनवमीचे. भारतीय संस्कृतीने आनंदी जीवन जगण्यासाठी ठेवलेला, जगन्मान्य झालेला आदर्श म्हणजे प्रभू श्रीराम.
मनुष्य हा मायेत अडकलेला असतो. संसारात मायेचा प्रभाव सुखामागे धावायला लावतो. मायेनेच सुख दु:ख निर्माण होतात. अशाच वेळी मनुष्याला परमेश्वराची आठवण येते. म्हणूनच आमचे संत भरकटलेल्या मनाला स्थिरावण्यासाठी वारंवार नामाचा आग्रह धरतात. नामाचे महत्व संत वारंवार सांगत असतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की “नामस्मरण करणाऱ्याच्या चिंता मी स्वतःकडे घेत त्याचे प्रारब्धही बदलतो. त्याचे महादोषही जाळून टाकतो. त्याला शत्रूचेच काय पण काळाचेही भय उरत नाही. नाम घेणाऱ्याच्या संसारात ‘राम’ निर्माण करून त्यांचा संसार सुखाचा करतो. त्यांच्या अंतसमयी मी स्वतः त्याच्या सेवेस हजर होतो. त्याला परब्रम्ह सुखाची अनुभूती प्राप्त करून देतो.”
‘चंदन है इस देश की माटी, तपोभूमी हर ग्राम है | हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है’ अशी आहे भारतीय संस्कृतीची जगात ओळख. प्रत्येक बालिकेने दुर्गा तर बालकाने “राम” व्हावे अशीच आई-वडिलांची इच्छा असते. संस्कार त्यानुसार केले जातात. आचार-विचार भरकटलेल्या समाजापुढे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हा आदर्श. संपूर्ण जीवनात श्रीरामाने कधीच मर्यादा ओलांडली नाही.
जगात सदैव राजसत्ता संघर्षाचा रक्तरंजित इतिहास लिहिला जातो. सत्तेसाठी जनसामान्यांना वेठीस धरले जाते. यात शेकडोंचे बळीही जातात. या उलट वागणारे, त्याग शिकवणारे आदर्श चरित्र आहे ते प्रभू श्रीरामाचे. वडिलांना दिलेल्या वचनपूर्तीसाठी श्रीरामाने सत्ता, राजप्रासादातील सुख त्यागून वनवास स्वीकारला. पुढे सत्ता जनतेसाठी कशी राबवावी, निस्पृह कसे राहावे, सर्वांना समान न्याय कसा द्यावा हे आपल्या राज्यकारभारातून दाखवले. त्या राज्यकारभाराची ओळख आजही ‘रामराज्य’ म्हणूनच आहे.
राम हा श्रीविष्णूने घेतलेला मानवी अवतार. जनकल्याणासाठी. पण या अवतारात त्यांना मानवी जीवनातील सुखदु:खाचा सामना करावा लागला. पण परिस्थिती कशीही असो, स्थिरप्रज्ञतेने कसे जगावे हे रामचरित्र शिकवते. त्यामुळेच गेली हजारो वर्षे जगावर रामचरित्राचे गारुड आजही आहे, पुढेही राहणार आहे.
जीवनात चांगल्या लोकांचा सहवास मिळाला तरच विवेक जागृत राहतो. सुसंगतीने लोखंडाचेही सोने होते. जीवनात कलह, चिंता निर्माण न होता कल्याणच होते. जीवनात चांगले मित्र. नातेवाईक लाभणे ही मात्र रामकृपाच. ‘मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी’ या ओळी ऐकताच मनुष्याचे भावविश्वच संपन्न होते. जा पर कृपा राम की होई | तार पर कृपा करहि सब कोई| जिन की कपट, दम्भ नही माया, तिनके हृदय बस हू रघुराया | संत तुलसीदासांनी श्रीराम चरित मानसमधून सांगितले आहे, की ज्याच्यावर प्रभू रामाची कृपा झाली की संसारात कोणत्याही दु:खाचा प्रवेश होत नाही. परमात्मा कृपेची फळे आपोआप प्राप्त होतात. ज्याच्या मनात कपट, दम्भ, लोभ नसतो त्याच्याच व्ह्रद्यात रघुपती निवास करतात.
भारतीय संस्कृतीत जगण्याचा अर्थ म्हणजे ‘राम.’ एवढे या राम शब्दाचे महात्म्य. दिवसातील पहाटेचा आनंदी प्रहर म्हणजे रामप्रहर. आणि जीवनाच्या अंतिम समयीसुद्धा साथ देणारा शब्द “राम’च. म्हणूनच तुलसीदास राम या शब्दात काय जादू आहे ते सांगतात. ते म्हणतात, अग्नी, सूर्य आणि चंद्र यांच्यासाठी ‘र’ आणि ‘म’ हे रूपाने बीज आहे. राम नाम हे ब्रम्हा, विष्णू आणि शिवरूप आहे. ते वेदांचे प्राण आणि गुणांचे भांडार आहे. राम नावाची दोन सुंदर अक्षरे म्हणजे श्रावण-भाद्रपद महिनेच. स्मरण करण्यास सुलभ आणि सुखदायी. ही दोन्ही अक्षरे नर-नारायणासारखे बंधू आहेत. जगताचे पालन आणि भक्तांचे रक्षण करणारे आहेत. भक्तीरुपिणी सुंदर स्त्रीच्या कानातील फुलेच आहेत. तसेच कल्याणासाठी चंद्र-सूर्यही आहेत. ही अक्षरे मोक्ष प्राप्त करून देणारी, अमृतासारखी तृप्ती देणारीही आहेत. कासव आणि शेषाप्रमाणे पृथ्वीला धारण करणारीही आहेत. भक्तांच्या मनरुपी सुंदर कमळात विहार करणाऱ्या भ्रमरासारखी आहेत.
संत एकनाथ महाराजही ह्या रामनामावर सांगतात, ‘रामनाम ज्याचे मुखी, तो नर धन्य तिन्ही लोकी| रामनाम वदता वाचे, ब्रम्हसुख तेथे नाचे|| रामनामे वाजे टाळी, महादोषी होय होळी| रामनाम सदा गर्जे, कलिकाळ भय पाविजे| ऐसा रामनामी भाव, तया संसाराची वाव | आवडीने नाव गाय, एका जनार्दनी वंदी पाय|
चला तर तुम्हाला आयुष्यात आत बाहेर पाहिजे असेल तर तुमच्या मुखरूपी द्वाराच्या उंबरठ्यावर राम-नामरुपी मणी दीपक ठेवू या.
– प्रकाश देशमुख
( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत. )
591 Total Likes and Views