करोनाचा तिसरा डोस पैसे घेऊन टोचणार

Analysis
Spread the love

आता १८ वर्षांवरील सर्वांना  करोना प्रतिबंधक लशीचा तिसरा डोस मिळेल. १० एप्रिलपासून खासगी केंद्रांवर हा बूस्टर डोस दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतील. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय १८ वर्षांहून अधिक आहे आणि दोन्ही डोस घेतले असून, दुसऱ्या डोसला ९ महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे, ते करोनाचा प्रतिबंधात्मक डोस घेऊ शकतात. खासगी केंद्रांवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. आरोग्य सेवा कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत सुरूच राहील. या अगोदर केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स  तसेच ज्येष्ठांना बूस्टर डोस दिला जात होता. त्यामुळे सर्वसामान्यांना बूस्टर डोस कधी मिळणार याची प्रतिक्षा होती. ती  पूर्ण होत आहे. पण यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.  करोनाचा तिसरा डोस लस कंपन्यांसाठी  नोटा छापायचे मशीन बनला आहे का? तिन्ही लशींचा हेतू एक आहे तर त्यांचे दर वेगवेगळे कसे? आणि सरकारी  दवाखान्यांमधून लस का देत नाही?  खासगी सेंटर का?   कोव्हीशिल्ड लशीसाठी ६०० रुपये घेतले जातील अशी चर्चा होती. आता  त्या लस कंपनीनेच   २२५ रुपये भाव  जाहीर केला आहे.  एका डोसवर एवढा नफा आहे का?  असेल तर एक नक्की. करोनाचे काय व्हायचे ते होवो, प्रतीकारशक्ती वाढो  वा न वाढो, कंपन्याचे उखळ पुन्हा एकदा पांढरे होणार आहे.

                  केसेस कमी झाल्याने   महाराष्ट्र आणि अनेक राज्यांनी करोनाचे निर्बंध  हटवले आहेत. मास्कची सक्तीही काढली आहे.  करोना मेला अशी हवा असताना केंद्र सरकारने तिसऱ्या डोसचा फंडा आणला आहे. केसेसच नाहीत तर तिसऱ्या डोसची भाषा कशाला? संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव  एन्तानियो  हे मात्र करोना संपला हे मानायला तयार नाहीत. ते म्हणाले,   करोनाचा नवा  प्रकार येणार की नाही हा प्रश्न नाही.  तो येणारच.  फक्त कधी येणार हा प्रश्न आहे.   करोना संपला नाही. आजही जगभरात  करोनाचे  रोज १५ लाख पेशंट  सापडत आहेत. युरोपमध्ये नवी लाट पसरते आहे. आशीयाही कोरडा नाही.

                       करोना मेला नाही ही लाईन भारत सरकारही चालवत आहे.   अचानक केसेस वाढल्याचे सांगून   केंद्राने    पाच राज्यांना  सतर्कतेचा  सल्ला दिला आहे. यात महाराष्ट्रही आहे. गुजरातमध्ये  एक्स ई  नावाच्या नव्या  प्रकारचा एक रुग्ण   सापडला आहे.  हा नवा व्हायरस  खतरनाक आहे असे सांगितले जाते.  सामान्य माणसाने काय समजायचे? पुन मास्क येतो आहे का? तिसऱ्या डोसचे पैसे काढून ठेवायचे का?

 460 Total Likes and Views

0 Comments

No Comment.