नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

News World
Spread the love

पाकिस्तानात पुन्हा एकदा शरीफराज आले आहे. इम्रान खान यांनी सत्तेत राहण्यासाठी खूप उठापटक केली. पण त्यांची दांडी उडालीच. मध्यरात्रीनंतर संसदेत विरोधी पक्षांनी आणलेला  अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. जेमतेम चार वर्षे त्यांनी राज्य केले. पाकिस्तानचे एक विशेष आहे. तिथे कोणीही  पंतप्रधान  आतापर्यंत पूर्ण पाच वर्षे सत्ता भोगू शकला नाही. ‘पाकिस्तानात अविश्वास ठरावाच्या माध्यमातून प्रथमच एखादं सरकार कोसळलं आहे.  इम्रानच्या जागी आता पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ पक्षाचे अध्यक्ष शाहबाझ शरीफ नवे पंतप्रधान म्हणून येत आहेत. ७१ वर्षे वयाचे शाहबाझ हे पाकिस्तानचे तीन वेळा  पंतप्रधान राहिलेले  नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत.

                १९७३ मध्ये शाहबाज यांनी आपल्या चुलत बहिणीशी लग्न केले. दोघांना चार मुले आहेत. २००३ मध्ये शाहबाज यांनी दुसरे लग्न केले. सधन कुटुंबात जन्मलेल्या, शाहबाज यांनी त्यांच्या कौटुंबिक व्यवसायापेक्षा राजकारण स्वीकारले. गेली ४० वर्षे ते राजकारणात आहेत.  पाकिस्तान चारित्र्यापेक्षा दगाबाजीसाठी कुप्रसिद्ध आहे.  भानगडी नाहीत असा नेता तिथे मिळणे अवघड आहे.  भारताला शिव्या मारायच्या आणि राज्य करायचे असा तिथला खाक्या आहे. इम्रान खान क्रिकेटर होता. पण त्याच्यात  खिलाडू वृत्ती  कधीच दिसली नाही. सत्तेतला नेता समोरच्याला  शत्रू मानतो.  म्हणूनच नवाज शरीफ यांना  लंडनला  पळावे लागले. इम्रानचेही तेच हाल होणार.  तिथे साऱ्या किल्ल्या लष्कराच्या ताब्यात असतात. लष्कराशी ख्जाव्नार्याला उचलून फेकले जाते.   नवे पंतप्रधान  शाहबाजही धुतल्या तांदळाचे नाहीत.   सप्टेंबर २०२० मध्ये शाहबाज शरीफ यांनाही  मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. एप्रिल २०२१ मध्ये त्यांना लाहोर हायकोर्टातून जामीन मिळाला. शाहबाज शरीफ यांच्याविरोधात हा खटला सुरू आहे. तेच आता पाकी जनतेला  नवनवी स्वप्ने  दाखवतील.               पाकच्या संसदेत पंतप्रधानपदासाठी मतदान झाले असता शाहबाज यांना १७४ मते मिळाली. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाकडून शाह महमूद कुरेशी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.  पीटीआयच्या सर्व सदस्यांनी राजीनामा देत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे मतदान घेऊन शाहबाज यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. शाहबाज हे पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान असतील. यावेळी संसदेत बोलताना शाहबाज यांनी काश्मीरबाबत जुनाच राग पुन्हा आळवला. ते म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमधून भारताने कलम ३७० हटवल्यानंतर इम्रान सरकारने त्याविरुद्ध पाऊल उचलणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. पण काश्मीर प्रश्न  सुटेपर्यंत ते शक्य नाही. काश्मीरबाबत आमची भूमिका बदलू शकत नाही. काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, हा माझा  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना संदेश असेल. एकूणच, गडी बदलला तरी पाकिस्तानच्या कुरापती सुरूच राहतील. नवाज शरीफ कसे वागले ते भारताला ठाऊक आहे.  त्यांचा धाकटा भाऊ  आता कसा आणि किती पंगा घेतो ते पहायचे.

 286 Total Likes and Views

0 Comments

No Comment.