‘ काच के घर मे रहनेवाले दुसरो के घर पे पत्थर नही फेका करते.’ राज कुमारचा हा फेमस डायलॉग आहे. भाजप नेता किरीट सोमय्या यांनी ऐकले नाही. महाआघाडीच्या कोणत्या मंत्र्याला केव्हा ईडी उचलणार ते सांगणारे सोमय्या आज ‘नॉट रिचेबल’ आहेत. अटकपूर्व जामिनासाठी फिरत आहेत. लढाऊ नौका आयएनएस विक्रांत प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचे आरोप झालेल्या प्रकरणात भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांना केव्हाही अटक होऊ शकते. सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, सोमय्या यांनी त्यांच्या जामीन अर्जासोबत जी कागदपत्रे सादर केली होती तीच आम्ही विशेष करून दाखवली. कारण त्यांनी त्या कागदपत्रांमधून तो गुन्हा जवळजवळ कबुलच केला होता. तसेच फोटोग्राफ देखील लावले होते. एका पैशाची केली तरी ती चोरीच आणि कोट्यवधी रुपयांची केली तरी ती चोरीच. त्यामुळे चोरी ही चोरीच असते. ही चोरी किरीट सोमय्या यांनी मान्य केली. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल.
मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री सोमय्या पिता-पुत्राविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. भोसले यांच्या तक्रारीनुसार, २०१३-१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्या, नील सोमय्या व इतरांनी पुढाकार घेऊन आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्यासाठी नागरिकांकडून निधी जमा करण्याचे अभियान सुरू केले होते. चर्चगेट येथे २०१३ मध्ये किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि त्यांचे कार्यकर्ते ‘विक्रांत वाचवा’ असा संदेश छापलेले टी शर्ट परिधान करून पेटय़ांमधून चर्चगेट स्थानकाबाहेर निधी गोळा करत होते. भोसले यांनी त्या वेळी दोन हजार रुपये पेटीत जमा केले होते. पण पुढे विक्रांत भंगारात विकण्यात आली. दरम्यान, धिरेंद्र उपाध्याय यांनी राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला. सोमय्या यांनी २०१३-१४ मध्ये विक्रांत या जहाजाच्या डागडुजीसाठी नागरिकांकडून जमा केलेला निधी राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये धनादेश अथवा रोख स्वरूपात जमा करण्यात आला का, याबद्दल माहिती विचारली. त्यावर अशी कोणतीही रक्कम जमा झालेली नसल्याचे उत्तर राज्यपाल कार्यालयातून देण्यात आले होते. त्यानुसार भोसले यांची तक्रार केली आहे. अंदाजे ५७ कोटी रुपये अथवा त्यापेक्षा जास्त रक्कम सोमय्या यांनी निधी म्हणून जमा केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. ९ वर्षापूर्वीचे हे प्रकरण आहे. ५७ कोटी रुपयाचा आकडा कुठून आणला हेही कोडे आहे. काहीही असो, सोमय्या यांना काय ते कोर्टाला सांगावे लागेल. ते का गायब आहेत हे कळायला मार्ग नाही. अनिल देशमुखही असेच गायब झाले होते. भ्रष्ट लोकांचा कर्दनकाळ अशी सोमय्या यांची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेशी ते जगले नाहीत तर त्यांच्याच नव्हे तर भाजपच्याच अडचणी वाढणार आहे. गेली दोन वर्षे ईडी भाजपतर्फे लढत असल्याचे चित्र होते. विक्रांतच्या मामल्यात सोमय्या यांनी मार खाल्ला तर ईडीला लवकरच आपला गाशा गुंडाळावा लागेल. पण मला एक कळत नाही, विक्रांतसाठी पैसे दिल्याचे लोकांना ९ वर्षानंतर का आठवले? कोणीही पैसे गोळा करावे आणि त्याचा हिशोब जनतेने विसरून जावा हे कोडे आहे.
178 Total Likes and Views