भारत पूर्वी अखंड होता. तसा तो पुन्हा व्हावा असे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते. ह्या स्वप्नाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नव्याने ‘चार्ज’ केलं आहे. त्यांच्या वक्तव्याने जगभर खळबळ आहे. भागवत म्हणाले, पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. हरिद्वारमध्ये बोलताना ते म्हणाले की, संत आणि ज्योतिषांच्या मते २० ते २५ वर्षात भारत पुन्हा एकदा अखंड भारत होईल. पण जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर १० ते १५ वर्षात अखंड भारत होईल.
अखंड भारताची कल्पना मांडताना त्यांनी म्हटलं की, “हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. पुढील १५ वर्षात पुन्हा एकदा अखंड भारत पहायला मिळेल. आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल. आमच्या मनात द्वेष नाही, पण जग शक्तीला मानतं मग काय करणार? धर्माचं उत्थान होईल तरच भारताचं उत्थान होईल आणि याला विरोध करणारे संपतील.
भागवत यांच्या ह्या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, अखंड हिंदुस्थानाचं कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही स्वागत करु. १५ वर्ष नाही, १५ दिवसात करा असंही त्यांनी म्हटलं. अखंड हिंदुस्थानाचं कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही स्वागत करतो. कोणताही पक्ष त्याला विरोध करणार नाही. २०१४, २०१९ मध्ये भाजपाने याच मुद्द्यावर मतं मागितली. आधी पाकव्याप्त काश्मीर आणि नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान ताब्यात घ्या आणि अखंड हिंदुस्थान निर्माण करा. तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही. पण त्याआधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या. कारण अखंड हिंदुस्थान त्यांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचंही स्वप्न होतं. तुम्ही सावरकर आणि बाळासाहेब यांचे आभार माना कारण त्यांनी ही संकल्पना रुजवली. अखंड हिंदुस्थान जरुर करा पण आधी काश्मिरी पंडितांची घऱवापसी सन्मानाने आणि आदराने होऊ द्या.
454 Total Likes and Views