राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार सध्या विरोधकांच्या रडारवर आहेत. मनसे सुप्रीमो राज ठाकरे यांनी तर ह्या महिन्यात पवारांची झोप उडवली. पवारांच्या विरोधात कोणी बोलत नव्हते. पण आता पवारांवर हल्ले करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागताना रणनीती बदलली. त्यांनी जवळपास १४ ट्वीट करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या भूमिकांपासून थेट कलम ३७० पर्यंतच्या मुद्द्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू केलं अशा आशयाची टीका राज ठाकरे यांनी केल्यानंतर या मुद्द्यावरून मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये पवारांवर निशाणा साधला आहे. “इशरत जहाँला फक्त निर्दोषच म्हटलं गेलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तिला मदत देखील देऊ केली. तसेच, त्या काळी आयबीच्या अधिकाऱ्यांचा देखील अपमान राष्ट्रवादीकडून झाला”, असं फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील कलम ३७० ला विरोधच होता, असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानाचेही फडणवीसांनी स्मरण करुन देत पवारांवर निशाणा साधला.
पवारांवरील टीकेने राष्ट्रवादीचे नेते रक्तबंबाळ आहेत. पण तसे ते दाखवायला तयार नाहीत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तर म्हणाले, शरद पवारांवर टीका करणं हा आता सगळ्यांचा आवडता छंद झाला आहे. शरद पवार यांच्या राजकारणातल्या, समाजकारणातल्या भूमिका वर्षानुवर्ष लोकांना माहिती आहेत. अशा प्रकारचे ट्वीट करून त्यात काही फायदा होईल, असं मला वाटत नाही.
नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध जोडल्यावरून देखील वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, यापूर्वी देखील अशाच प्रकारे प्रयत्न झाले. नवाब मलिक यांची केस पीएमएलए कायदा येण्यापूर्वीची आहे. इतकी जुनी केस काढून दाऊदशी कोणताही संबंध नसताना ओढून-ताणून संबंध जोडायचा हा प्रकार आहे. या पूर्वीही शरद पवारांशी असा संबंध जोडायचा प्रयत्न भाजपानं केला होता. मला त्यात काही तथ्य दिसत नाही.
वळसे पाटील कुठल्या वादात बोलत नाहीत. पण आता तेच मैदानात उतरलेले दिसतात. वळसे पाटीलच नव्हे तर अजितदादा यांची नक्कल केली म्हणून दादांचे समर्थकही खवळले आहेत. युवा राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी सकाळी सहा वाजल्यापासून कार्यरत असणाऱ्या दादांवर १२ वाजता उठणाऱ्याने टीका केली म्हणून दादांचा विकास कामांचा धडाका कमी होणार नाही.’
२०२४ च्या निवडणुकीला अजून अडीच वर्षे आहेत. तो पर्यंत हे शाब्दिक युद्ध उठल्या पातळीवर पोचते ते पहायचे.
298 Total Likes and Views