राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला दणका बसला. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १८ हजार ८०० मतांनी दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणुकीत उतरलेले सत्यजित कदम यांना भाजपने लढवले होते. मात्र ही लढत कॉन्ग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अशीच झाली. जाधव यांना ९६ हजार २२६ तर भाजपचे सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली. “आपण कोणालाही निवडून आणू शकतो. नाही आणले तर हिमालयात निघून जाईन” असे आव्हान दादांनी महाआघाडीला दिले होते. ते फेल गेल्याने ‘दादा हिमालयात जावा’ अशी भाषा महाआघाडीने सुरु केली आहे. २०१९च्या निवडणुकीत दोन्ही कॉन्ग्रेस विरुध्द भाजप-सेना युती असा सामना झाला होता. उमेदवार शिवसेनेचा होता. सेनेचा उमेदवार इथून पाच वेळा निवडून आला आहे. तसा हा मतदारसंघ सेनेचाच. त्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसला मिळून ९१ हजार मते मिळाली होती तर युतीला ७५ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. आज दोन्ही कॉन्ग्रेस आणि शिवसेना एकत्र असताना फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे प्रश्न आहे, की शिवसेनेचे मतदार गेले कुठे? ते भाजपकडे सरकलेले दिसत आहेत.
भाजपने ही निवडणूक हिंदुत्वाच्या वळणावर नेली खरी. पण हिंदुत्वाचे कार्डही फारसे चालले नाही. “ईडीचे फटके सुरु असताना महाआघाडी भक्कम असल्याचा संदेश कोल्हापूरच्या निकालाने गेला आहे. शिवसेनेची मते भाजपला गेली नाहीत” असा दावा महाआघाडीच्या एका नेत्याने केला. भाजपच्या नेत्याने मात्र ह्या निकालाचे वेगळे विश्लेषण केले. भाजपच्या मते, “हा मतदारसंघ भाजपचा नव्हताच. २०१४ च्या तुलनेत भाजपला यंदा ३७ हजार मते अधिक मिळाली. आम्ही फक्त निवडणूक गमावली. पण शिवसेनेने मतदारसंघ आणि मतदारांचा आधार गमावला. २०२४ च्या निवडणुकीत आता शिवसेनेला ह्या मतदारसंघावर दावा करता येणार नाही. शिवसेनेचा ‘व्होटर बेस’ निसटतो आहे.
जय-पराजयाला अनेक चेहरे असतात. पण जिता वो सिकंदर, बाकी सारे बंदर’ असे म्हणतात तेच खरे. कोल्हापूर हे चंद्रकांतदादांचे गाव. गावच्या मातीतच कुस्ती हरल्याने चंद्रकांतदादांचे प्रस्थ कमी होणार आहे.
212 Total Likes and Views