भारतात करोनामुळे मृतांचा आकडा पाच लाख २१ हजार ७५१ वर पोहोचला आहे असे मोदी सरकार म्हणते. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी हे आकडे खोटे असल्याचे सांगतात. करोनामुळे पाच लाख नाही तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, मोदीजी खरे बोलत नाहीत आणि बोलूही देत नाहीत. ते अजूनही सांगतात की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचा मृत्यू झाला नाही. मी याआधीही म्हटले होते, कोविडमध्ये सरकारच्या निष्काळजीपणामुळे ४० लाख लोक मेले. सरकारने प्रत्येक पीडित कुटुंबाला ४ लाख रुपयांची भरपाई दिली पाहिजे.
मृत्यूसंख्या मोजण्यासाठी भारत वापरत असलेली पद्धत योग्य नसल्याचं सांगत नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेनं नाराजी व्यक्त केली होती. त्याला भारताने उत्तर दिले आहे. कोविड मृत्यू दराचा अंदाज लावण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यपद्धतीवर भारताने प्रश्नचिन्ह उपस्थित लावले. भौगोलिक आकार आणि लोकसंख्येच्या एवढ्या विशाल राष्ट्राच्या मृत्यूच्या आकड्यांचा अंदाज लावण्यासाठी अशा गणितीय मॉडेलिंगचा वापर केला जाऊ शकत नाही असे आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
471 Total Likes and Views