करोना मेला असे समजून सारें बिनधास्त झाले आहेत. पण तशातली भानगड नाही. करोना मेलेला नाही. तो पुन्हा वाढत चालला असून दिल्लीच्या सीमेला लागून असलेल्या हरयाणातील चार जिल्ह्यांमध्ये खबरदारी म्हणून मास्कसक्ती करण्याचा निर्णय हरयाणा सरकारकडून घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारनेही असेच पाऊल उचलले आहे. दिल्लीत कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना शेजारच्या हरयाणातही संसर्ग हातपाय पसरताना दिसत आहे. गुरुग्राम आणि फरीदाबाद या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. गुरुग्राममध्ये सध्या दररोज करोनाचे १०० पेक्षा अधिक नवे रुग्ण आढळत आहेत.
उत्तर प्रदेश सरकारही अलर्ट झालं आहे. करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत मोठी पावले उचलण्यात येत आहेत. दिल्लीलगतच्या भागांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. नोएडा, गाझियाबाद, मेरठ, हापूड, बागपत, बुलंदशहर, गौतमबुद्धनगर आणि लखनऊ या सर्वठिकाणी मास्कसक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. उत्तर प्रदेशात गेल्या चार दिवसांपासून दररोज शंभरावर नवीन रुग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासांत ११५ नवे रुग्ण आढळले आहेत. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता ६९५ झाली आहे.
261 Total Likes and Views