बारामती : सत्ता स्पर्धा आणि संघर्ष…

News
Spread the love

वाघ सावजावर दबा धरून बसलेला असतो, सावज टप्प्यात आले कि झडप घालतो नी सावजाचा क्षणार्धात फडशा पाडतो. आमदार रोहित पवार देखील दबा धरून बसलेले नेते आहेत, पवार घराण्यातले राजकीय वारसदार आहेत, शरद पवार यांच्या राजकीय निवृत्ती नंतर खरी स्पर्धा सुप्रिया अजितदादा आणि रोहित पवार या तिघातच रंगणार आहे इतर सदस्य अगदीच लिंबू तिंबू आहे, आज अजितदादा प्रथम आणि सुप्रिया या पवार घराण्यातल्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेत्या असल्या तरी एक दिवस मी सांगतो तेच नेमके व नक्की घडणार आहे, रोहित या दोघांना खूप मागे टाकून नेतृत्वात पहिला नंबर पटकावून मोकळे होतील, ज्यावेळी या तिघांची राजकारणात तीन वेगवेगळ्या दिशांना तोंडे असतील. ज्यादिवशी सत्तेचे सावज नजरेच्या टप्प्यात येईल, सुप्रियाताई, अजितदादा यांना मागे सोडून ते कित्येक मैल पुढे निघून जातील. लिहून ठेवा. मला त्यांच्याविषयी एक भीती याक्षणी वाटते कि त्यांनी घरातल्या इतर नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणजे काळ्या पैशांच्या मागे लागून तेवढी बदनामी पदरात निदान आज व पुढेही पाडून घेऊ नये, सत्तेत यश चालून आले की पैसाही हवा तेवढा आपोआप चालून येत असतो, रोहित पवारांनी तेवढा घरातल्या इतर नेत्यांसारखा काळ्या पैशाचा मोह टाळावा म्हणजे टिकावू राजकीय यश त्यांच्या पायाशी नक्की लोळण घेईल. माहेर आणि सासर दोन्हीकडे आर्थिक सुबत्ता त्यामुळे भानगडीतुन चालून येणाऱ्या काळ्या पैशांचा मोह रोहित पवार तुम्हाला पडायलाच नको, खूप मोठे व्हाल कारण जात नेतृत्व पैसा वक्तृत्व देहबोली बोलण्याची शैली बाईलवेडा नसलेला स्वभाव वरून पत्नीचे चार चौघात कौतुक करण्याची मस्त सकारात्मक वृत्ती, आई वडील आणि दिवंगत आजोबांविषयी निष्ठा व आदर आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे सुप्रिया, शरदराव व अजितदादा या तरबेज मंडळींना पास करून पुढे निघून न जाण्याची अक्कल हुशारी, रोहित तुमचे हे असेच आणखी काही वर्षे सुरु ठेवा, एकदा का काका आजोबा राजकारणातून निवृत्त झाले रे झाले की इतर, घराण्यातले कोणीही तुमच्यासमोर स्पर्धेत फारसे टिकणार नाही. आणि रोहित पवार यांना हे असे परिपूर्ण नेता म्हणून घडविण्यात वाढविण्यात पत्नीची उत्तम साथ आणि आई सुनंदा राजेंद्र पवार या अत्यंत कर्तबगार आईचे उत्तम व दूरदर्शी संस्कार…

www.vikrantjoshi.com

अजितदादा आधी घडले वाढले शरद काकांचे बोट धरून राजकारणात आणि आर्थिकदृष्ट्या मोठ्या चतुराईने म्हणजे प्रसंगी काकांच्या डोळ्यात धूळफेक करून मोठे झाले नंतर त्यांनी जेव्हा केव्हा संधी चालून आली प्रसंगी शरद काकांना देखील आपले रंग दाखविले मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती, काकांना काहीसे डोईजड ठरून देखील शरद पवार हे अजितदादा यांना राजकारणातून संपवू शकले नाहीत एवढे अजित चतुर निघाले पण सुप्रिया यांना आपल्यानंतर पवार घराण्यातला आता आणखी एखादा मोठा प्रतिस्पर्धी नको केवळ या भावनेतून अनेकदा शरदराव हे रोहित बाबत तुसडेपणाची भूमिका घेतात अशी माझी माहिती आहे. मात्र पवारांनी हे नक्की ध्यानात ठेवावे कि सुप्रिया सुळे यांना राजकारणात अजितदादा यांच्यापेक्षा रोहित अधिक साथ देतील पण सुप्रिया यांनी जर रोहित बाबत पंकजा मुंडे यांच्यासारखी कायम धनंजय पद्धतीने तुसडेपणाची भूमिका घेतली तर मात्र वर जे सांगितले तेच घडेल शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीनंतर तिघांची तीन वेगवेगळ्या दिशांना तोंडे असतील. मला असे वाटते कि ज्या पद्धतीने आई सुनंदा राजेंद्र पवार यांनी आधी सार्वजनिक जीवनात सहकाराचा तसेच महिला कल्याणाचा पाया मजबूत केला, रोहित देखील फारसे वेगळे करतांना कधी दिसले नाही त्यांनी बारामतीच्या आसपास व अख्या पंचक्रोशीत सर्वसामान्य लोकांमध्ये साऱ्यात मिसळणारा व सर्वांसाठी धावून जाणारा नेता अशी इमेज निर्माण केली त्याचवेळी शरद पवार यांच्या नावाचा खुबीने उपयोग करून घेत राम शिंदे यांच्यासारख्या बलाढ्या नेत्याला पार अडगळीत नेऊन सोडले आणि पुढले अनेक वर्षे त्या भागातला प्रभावी आमदार म्हणून आपले मोठे वर्चस्व प्रस्थापित केले. अत्यंत महत्वाचे म्हणजे जी अजितदादा यांनी चूक केली ती चूक सुप्रिया व रोहित या दोघांनी केलेली नाही म्हणजे सुप्रिया पाठोपाठ अधिक आकर्षक पद्धतीने रोहित व सुप्रिया कायम कौटुंबिक पार्श्वभूमीचा बडेजाव न मिळविता सतत सामन्यांमध्ये अगदी सहज मिसळत आपले राजकीय स्थान बळकट करीत पुढे गेले पुढे जाताहेत, हा रोहित यांचा फार मोठा प्लस पॉईंट आहे. पवार घराण्याचे राजकीय भवितव्य हा विषय आणखी विस्तृत स्वरूपात आणि काही महत्वाचे पुरावे मांडत मी ते आपल्यासमोर सादर करणार आहे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

 258 Total Likes and Views

0 Comments

No Comment.