करोनाची चौथी लाट सुरु झाली आहे का? कारण दिल्लीत अचानक रुग्ण वाढू लागले आहेत. ते पाहून दिल्लीत सरकारने पुन्हा मास घालणे सक्तीचे केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास न घालता कोणी आढळला तर ५०० रुपये दंड ठोकला जाईल. गेल्या दोन दिवसांत राज्यात अचानक करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी महाराष्ट्रात ५९ रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी त्यात दुपटीहून अधिक म्हणजेच १३७ नवे करोनाबाधित वाढले आहेत. देशभरात २४ तासांत १२४७ रुग्ण वाढले आहेत. चिंता वाढली आहे. मात्र, घाबरण्याचं कारण नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
टोपे म्हणाले, काल मी घेतलेल्या आढाव्यात महाराष्ट्रात एकूण १३५ केसेस आढळल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये ८५ केसेस आहेत. महाराष्ट्राने रोजच्या ६० हजार केसेस पाहिल्या आहेत. त्यामुळे अतिशय नियंत्रित अशी ही परिस्थिती आहे. लसीकरणाचं प्रमाण देखील चांगलं झालं आहे. त्यामुळे कुठेही घाबरण्याचं कारण नाही. गुढी पाडव्यापासून आपण निर्बंध मुक्त केले आहेत. मास्कसक्ती हटवली आहे. पण ज्येष्ठ नागरिक किंवा सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीत मास्क घालण्याची काळजी घ्यावी असे मी सांगेन. पाश्चात्य देश, युरोप, चीनमध्ये असलेली परिस्थिती जर आपल्याला जाणवली तर त्या पद्धतीने आयसीएमआर, केंद्र सरकार, आमचं टास्क फोर्स, आरोग्य विभाग या सगळ्या गोष्टीत लक्ष ठेवून आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल अशा शब्दात त्यांनी राज्याला धीर दिला.
235 Total Likes and Views