मंत्र्यांची लाखा लाखाची बिलं सरकारने भरली, सामान्य माणसांच्या बिलाचे काय?

Editorial
Spread the love

करोना काळात  राज्य सरकारमधील १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत लाखोंचा खर्च केल्याचं वृत्त झी २४ तासने दिलं आहे. उपचाराचा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला. ही माहिती समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. गेली दोन वर्ष करोना काळात सर्वसामान्य उपचारासाठी वणवण फिरत असताना आणि राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना या १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयातील उपचारासाठी तब्बल १ कोटी ३९ लाख खर्च केले.

               या १८ पैकी सर्वाधिक नऊ मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यानंतर काँग्रेसचे सहा आणि शिवसेनेचे तीन मंत्री आहेत. महत्वाचं म्हणजे यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपेंचाही समावेश आहे. राजेश टोपेंच्या उपचारासाठी तब्बल ३४ लाखांचा खर्च आला असून हे पैसेही सरकारी तिजोरीतून भरण्यात आले आहेत. राजेश टोपेंसहित यामध्ये ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (१७ लाख ६३ हजार), ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (१४ लाख ५६ हजार), महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (१२ लाख ५६ हजार), गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (११ लाख ७६ हजार), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (९ लाख ३ हजार ) पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार (८ लाख ७१ हजार), जलसंपदामंत्री जयंत पाटील (७ लाख ३० हजार), उद्योगमंत्री सुभाष देसाई (६ लाख ९७ हजार) आणि – परिवहनमंत्री अनिल परब (६ लाख ७९ हजार) यांचा समावेश आहे.

                मंत्री छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही फक्त मंत्र्यांचं काढता, पण सर्व आमदारांचं काढलं तर त्यात भाजपा आणि इतर पक्षाचेही सापडतील.   भुजबळ ‘सेफ झोन’मध्ये आहेत.  त्यांच्यासाठी सरकारी सवलती आहेत. पण  सामान्य माणसाचे काय?  सरकारी रुग्णालये फुल झाल्याने लोक खासगी रुग्णालयात   भरती झाले होते. अनेकांनी तर  कोविड  हॉस्पिटलच्या पाटी लावून दुकानदारी सुरु केली होती.  कोविड जंबो  हॉस्पिटलच्या नावाने  अनेक मालामाल झाले.  त्यांची  सरकारने भरलेली बिले आता बाहेर येत आहेत. पण ज्यांनी  घरदार विकून   बिलं  भरली त्यांचे काय?  सामान्य माणूस  हा प्रश्न विचारतो आहे. त्याला उत्तर मिळेल?

 280 Total Likes and Views

0 Comments

No Comment.