मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ ह्या घरापुढे हनुमान चालिसा वाचण्याचा हट्ट धरणाऱ्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांना शनिवारी खार पोलिसांनी नाट्यमय घडामोडीनंतर ताब्यात घेतलं. मध्यरात्री भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे त्यांना भेटण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले होते. तेथून बाहेर पडताना ठाण्याबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये सोमय्या किरकोळ जखमी झाले. गाडीच्या डाव्या बाजूची काच दगडफेकीमध्ये फुटली असून सोमय्यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झाली. ह्या हल्ल्याने राजकारण तापलं आहे. पण शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, ‘चोराला दोन दगड मारले तर भाजपाला याचे दुःख होण्याची गरज नाही.’
राजकारण कशी पलटी मारते त्याचे हे उदाहरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत लावलेल्या फटाक्यांची माळ थेट उद्धव ठाकरे यांच्या घरापर्यंत पोचली आहे. ‘मशिदींवरील भोंगे उतरवा’ असे राज ह्या सभेत म्हणाले होते. दुसऱ्या सभेत त्यांनी महाआघाडी सरकारला ३ मे पर्यंतची मुदत दिली. भोंगे उतरले नाहीत तर मनसैनिक तेथे हनुमान चालिसा वाचतील असे जाहीर केले आणि एकच भडका उडाला. मराठी माणसाला फारसा माहित नसलेला ‘हनुमान चालिसा’ सर्वमुखी झाला. राणा दांपत्याने तर २३ एप्रिलला ‘मातोश्री’पुढे हनुमान चालिसा वाचणार असल्याचे जाहीर केले तेव्हा खळबळ उडाली. हनुमान चालिसा वाचायला राणा दांपत्य मुंबईत आले खरे. पण शिवसैनिकांनी त्यांना घराबाहेर पडू दिले नाही. ‘मातोश्री’ समोरही शिवसैनिक दोन दिवसांपासून खडा पहारा देत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याचे निमित पुढे करून ह्या दांपत्याने आंदोलन मागे घेतले. पण सायंकाळी पोलिसांनी त्यांना उचलले. रविवारी कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. राजद्रोहाचे कलम पोलिसांनी राणा दांपत्यावर लावले आहे. समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला असाही आरोप आहे. त्यामुळे १४ दिवस त्यांना जेलमध्ये काढावे लागणार आहेत. २९ तारखेला पुढची सुनावणी आहे.
एकूणच हनुमानजी ह्या दांपत्याला महागात पडले असे दिसते. पण एका महिला खासदाराला तुरुंगात पाठवून ठाकरे सरकार काय सिग्नल देऊ पाहते? हा मुद्दा महाआघाडीच्या अंगावर उलटूही शकतो. भविष्यात हिंदुत्वाच्या ह्याच मुद्यावर राणा पुढची निवडणूक खिशात टाकू शकतात. मुळात एवढे गंभीर हे प्रकरण होते का? शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी चालून गेले होते. त्याबद्दल पोलिसांनी १०५ जणांवर कटकारस्थानाचा गुन्हा दाखल केला. ताज्या प्रकरणात असंख्य शिवसैनिक राणा यांच्या घरापर्यंत पोचले होते. संतप्त शिवसैनिक ‘मातोश्री’पुढेही पहारे देत होते. दोन दिवस नुसता धुडगूस सुरु होता. पोलिसांनी हे कसे खपवून घेतले? ह्या शिवसैनिकांवर कुठले कलम लावले? जमावबंदी आदेश का काढला नाही? पोलीस ठाण्याच्या परिसरात सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला तर भयंकर आहे. सोमय्या निसटले नसते तर त्यांच्या जीवाचे काही खरे नव्हते. कार्यकर्त्यांच्या राड्यात पोलीस बघ्याची भूमिका घेतली का? भाजप आणि शिवसेनेतली ही कटुता आणखी कुठपर्यंत जाणार? राजकारणाचा स्तर कमालीचा खालावला आहे. पूर्वीही टोकाचे विरोधक होते. पण खुनशी राजकारण नव्हते. महाआघाडीचे नेते केंद्र सरकारला राष्ट्रपती राजवट आणण्याची संधी का देत आहेत? का असे घडावे? शरद पवार यांना ह्या सरकारचे ओझे झाले आहे का? उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची नव्हाळी संपली का? ठाकरे सुरुवातीला शरद पवारांच्या सापळ्यात अडकले. आणि आता राणा दांपत्याने फेकलेल्या सापळ्यात अडकले आहेत. हा ‘हनुमान’ २०२४ मध्ये आघाडीची लंका पेटवू शकतो.
नारायण राणे, रावसाहेब दानवे ह्या वजनदार नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. भाजप नेत्यांचे एक प्रतिनिधीमंडळ दिल्लीला निघाले आहे. तेथे ते केंद्रीय गृह सचिवांना भेटणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपण राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार नाही असे स्पष्ट म्हटले आहे. पण नरेंद्र मोदींच्या मनात काय? मोदींनी ‘हनुमान चालिसा’ वाचायला घेतला तर ठाकरे सरकारचे काही खरे नाही. आणि हेही खरे, की ठाकरे सरकारला हिरो बनण्याची कुठलीही संधी मोदी देऊ इच्छित नाहीत.
-मोरेश्वर बडगे
( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत. )
187 Total Likes and Views