महाराष्ट्र राज्याचा ६२ वा वाढिदवस आहे. १९५५ ते १९६० अशा ५ वर्षांच्या महासंग्रामानंतर ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य’ ही मराठी माणसांची मागणी प्रत्यक्षात आली तो दिवस आज असा डोळ्यासमोरून सोहळ्यासारखा जात आहे. या घटनेला ६२ वर्षे होतील. एका राज्याच्या इितहासात ६२ वर्षांचा काळ हा लहान नाही. त्याहीपेक्षा ‘कालचा महाराष्ट्र’, ‘आजचा महाराष्ट्र’ आिण ‘उद्याचा महाराष्ट्र’ याची चर्चा करण्याच्या एका कड्यावर आपण येवून ठेपलेले आहोत. १९६० च्या १ मे रोजी यशवंतरावांनी नव्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आिण ‘आजचा सोनेरी दिवस’ असे त्या िदवसाचे वर्णन करून त्यांनी महाराष्ट्राच्या बांधणीचा अतिशय चांगला विचार मांडला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य होत नाही म्हणून जे विधायक नेते नाराज होते त्यांच्या घरी जावून यशवंतरावांनी नवीन महाराष्ट्राचा विचार त्यांच्यासमोर ठेवला. सहकार्य मागितले. त्या काळातील विरोधी पक्षातील विधायक विचारांच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये येवून महाराष्ट्राची बांधणी करावी, ही भूमिका घेवून यशवंतरावांनी स्वत:कडे कमीपणा घेतला. पण चांगल्या नेत्यांना काँग्रेसमध्ये घेतले. यशवंतराव मोहीते, शंकरराव मोहीते-पाटील, भाऊसाहेब थोरात, आण्णासाहेब िशंदे ही त्यातील काही नावे… या नेत्यांनी पुढे महाराष्ट्राच्या विकासात एवढे मोठे काम केले, त्यावर वेगळे लिहावे लागेल. यशवंतरावांनी या सर्व परिवर्तनाला ‘बेरजेचे राजकारण’ असे नाव दिले. महाराष्ट्राच्या बांधणीची सुरुवात झाली. जे मुंबई राज्य मुंबई शहरापुरते, अहमदाबादपुरते मर्यादित होते, तो विचार फेकून देवून यशवंतरावांनी महारष्ट्राची बांधणी करताना चौफेर बांधणी केली. उद्याेगांचे विकेंद्रीकरण, एम. आय. डी. सी. ची स्थापना, ग्रामीण भागात उद्योग नेणाऱ्यांना वीज, पाणी, जमीन, सवलती सर्व काही दिले. आज महाराष्ट्रातील अनेक िजल्ह्यांतील एम. आय. डी. सी. फुलली… हजारो लोकांना रोजगार मिळाला… याची निर्मिती कशी झाली, हे नव्या पिढीला मािहतीही नाही. धरणांची िनर्मिती, साखर कारखान्यांची निर्मिती, औष्णिक आिण जलविद्युत केंद्राची िनर्मिती, प्राथमिक िशक्षणाची सक्ती, मोफत शिक्षण, गुणवत्तेपेक्षा िशक्षणाचा प्रसार महत्त्वाचा, हे धोरण… गावागावांत वाहतूक करणारी एस. टी…. कापूस एकािधकार… रोजगार हमी… ४० धरणांची पुढच्या २५ वर्षांसाठी तरतूद… एक नव्हे विकासाच्या चौफेर विचारांनी भारवलेले ते नेते आज असे डोळ्यांसमोर येतात….
आजचा महाराष्ट्र पाहताना या सर्व नेत्यांनी विचारपूर्वक केलेली महाराष्ट्राच्या बांधणीची आखणी, अंमलबजावणी, ग्रामीण माणसांचा विचार, एकेका विषयावर मुंबई विद्यापीठाला प्रबंध सादर करता येईल, असे असंख्य विषय पहिल्या २० वर्षांत हाताळले गेले. ३२ मोठ्या धरणांची िनर्मिती झाली. त्यात महाकाय जायकवाडी, उजनी अशी मोठी धरणे त्यांची यादी देत बसलो तर फक्त धरणांवर लिहावे लागेल. ४५० मध्यम प्रकल्प, ६००० लघु पाटबंधारे… कोयनेनंतर (कोयना धरण मुंबई राज्य असताना झाले. ) कोराडी, चंद्रपूर, पारस अशा औष्णिक वीज केंद्रांची िनर्मिती िकती विषय… तारापूर अणू वीजकेंद्र महाराष्ट्रात यावे म्हणून त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, वीजमंत्री राजारामबापू पाटील, यांनी केवढा खटाटोप केला… हे वीज केंद्र गुजरातमध्ये जाणार होते. त्यावेळच्या केंद्र सरकारला या नेत्यांनी पटवून िदले की, अणू केंद्राचे अध्यक्ष डॉ. होमी भाभा यांचे आजोबा पालघरचे अाहेत. त्यांच्या स्मृतीसाठी हे अणूकेंद्र महाराष्ट्रात होणे गरजेचे अाहे… अनेक युक्त्या वापरून तारापूर अणू केंद्र महाराष्ट्रात आले. असा एक विषय नाही… अनंत विषय आहेत… विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्याचा कापूस नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये आला रे आला की, सटोडीए आिण दलाल इिजप्तचा कापूस इथे आणून ओतत आिण विदर्भातील शेतकऱ्याचा कापूस मातीमोल भावाने विकला जाई. त्यावेळच्ो सहकार मंत्री यशवंतराव मोहीते यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यातून कापूस एकािधकार…. शेतकऱ्याच्या कापसाला हमी भाव ही कल्पना जन्माला आली. शेतकऱ्याच्या मागे प्रत्यक्ष कृती करून सरकार उभे राहिले. रोजगार हमी योजना त्यातीलच. देशाने महाराष्ट्राची योजना ‘नरेेगा’ हा कायदा करून स्वीकारली. महाराष्ट्राचे मोठेपण कशात आहे ते समजून घ्या… महाराष्ट्राचे अनेक कायदे देशाने स्वीकारले आहेत. आज ही िस्थती आहे का? केवळ घोषणा नव्हत्या… पेपरबाजी नव्हती… फोटोबाजी नव्हती… प्रसिद्धीची हाव नव्हती… सिद्धीसाठी झटलेले हे नेते आहेत. असे असंख्य विषय आज डोळ्यांसमोरून जातात. उजनीच्या धरणाच्या उद्घाटनाला यशवंतराव निघाले तेव्हा, आगोदर पंढरपूरला गेले… विठूरायाची चंद्रभाग अाडवली म्हणून पांडूरंगाच्या पायावर डोकं ठेवून त्यांनी क्षमा मागितली आिण उजनीच्या उद्घाटनाला यशवंतराव पोहोचले. इतक्या उंच्ाीच्या नेत्यांच्ाी आज महाराष्ट्र कल्पना तरी करू शकतो का?…. ६२ वर्षे अशी डोळ्यांसमोरून सरकत आहेत. शेतकऱ्याचा विचार, कामगारांचा विचार, खेड्यांचा विचार, कष्टकऱ्याचा विचार… महाराष्ट्राची उभारणी करताना किती विचारपूर्वक या मंडळींनी विपरित परिस्थितीत काम केलेले आहे. साधनं नव्हती… फोन लागत नसत… बॅटरी स्टेशन असे… ओरडून ओरडून जीव जायचा पण एेकू येत नव्हते… एक आठवण सांगतो, ‘नवी मुंबईची निर्मिती झाली तेव्हा वाशीच्या खाडीवरचा आजचा जुना पूल उभा करताना स्लॅब टाकण्याकरिता क्रेनची जरूरी होती. २०० टनाची क्रेन िमळत नव्हती… सुदैवाने त्याच वर्षी फक्त एक वर्षाकरिता बंगालमध्ये िसद्धार्थ शंकर रे यांचे काँग्रेस सरकार होते. त्यांच्याकडे मोठ्या क्रेन हावडा ब्रीजजवळ कायम स्टेशन आहेत. वसंतराव नाईकांनी फोनवर रे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. फोन लागता लागत नव्हता… ही त्यावेळची परिस्थिती. शेवटी तारेमार्फत संपर्क साधून मग तिकडून फोन आला आिण वाशी पूलासाठी कलकत्याहून क्रेन आली… ’ एकेका विषयासाठी झगडावे लागत होते. आिण हे झगडण्याचे विषय महाराष्ट्राच्या भल्यासाठी होते. ६२ वर्ष होत असताना आजच्ो झगडण्याचे विषय हे िकती भंपक आिण महाराष्ट्राला लाज आणणारे आहेत. या सर्वपक्षीय नेत्यांची महाराष्ट्राला लाज वाटत आहे. महाराष्ट्राची पहिली २० वर्षे आिण नंतरची ४२ वर्ष यावरचा प्रबंधही िकती िवदारक होईल.
जुन्या नेत्यांनी एवढी प्रचंड कामे उभा केली.. तो विकास करत असताना महाराष्ट्राचे पुरोगामीपण िटकवले. आज महाराष्ट्र आरोपीच्या िपंजऱ्यात उभा राहिल्यासारखा वाटतो. कोण, कुठले राणा…. महाराष्ट्राशी त्यांच्या काय संबंध… विकासाशी काय संबंध… कोण कुठले सदावर्ते… बांडगुळासारखे नेते एका िदवसात महाराष्ट्राच्या सगळ्या पुरोगामी परंपरा मातीत घालतात आिण िमजाशीमध्ये पुढारी म्हणून िमरवतात. िदवसभर चॅनवाल्यांना दुसरा धंदा नाही. या महाराष्ट्राचे आजच्ो सगळ्यात मोठे संकट म्हणजे ही प्रसारमाध्यमे आहेत. महाराष्ट्रातील चांगले यांना काही दिसत नाही. कोणत्याही वृत्तपत्रात सामान्य माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याकरिता, पहिल्ो पान, अग्रलेखाचे पान आिण संपूर्ण वृत्तपत्र त्या गरिबांच्ो प्रश्न लावून धरत आहे, असे दिसत नाही.आजच्या विधानसभेला अध्यक्षाची गरज राहिलेले नाही. अध्यक्षािशवाय विधानसभा चालू शकते…. न लिहाणाऱ्या संपादकािशवाय वृत्तपत्र चालू शकते… वृत्तपत्रांसाठी, माध्यमांसाठी जाहिरात हा एकच िनकष. पुढाऱ्यांच्या वाढिदवसासाठी आठ-आठ- दहा-दहा पानांच्या पुरवण्या आिण या सगळ्या पुरवण्यांमध्ये हा प्रत्येक पुढारी ‘कार्यसम्राट’ झालेला आहे. काय कार्य केले? कोणालाच मािहती नाही… सगळा महराष्ट्र आज जाहिरातबाजीवर चाललेला आहे. ३० वर्षांपूर्वी ज्यांनी राम वापरला होता त्यांनीच आता रामाला वनवासात पाठवले…कारण त्याची गरज संपली. आता हनुमानाचे चांगले दिवस आलेत. एका दिवसात हनुमान चालिसाची आठवण सगळ्यांना झाली. ज्यांनी ज्यांनी चालिसा चालिसा म्हटले त्यापैकी एकालाही ना ‘रामरक्षा’ येत असेल… ना भीमरूपी म्हणता येत असेल… चालिसाचा तर प्रश्नच नाही. महाराष्ट्र भलतीकडे नेणारे हे नेते आहेत. यांना नेते तरी कसे म्हणावे? पण यांनाच का दोष द्यावा… आजच्या राज्यकर्त्यांनी थोडे चिंतनही करावे. आजच्या चालिसाची आिण रस्त्या रस्त्यावर २५ वर्षांपूर्वीच्या झालेल्या महाआरत्यांची महाराष्ट्राच्या बांधणीशी… महाराष्ट्राच्या विकासाशी काही सांगड होती का? त्यावेळी जनसंघ-भाजपावाले ‘राम’ वापरत होते. त्यावेळचे िशवसेनावाले रस्त्यांवर महाआरती करत होते. आता भूमिका बदलल्या… विचार बदलला… तो सत्तेभोवती फिरत राहिला… याच मंडळींनी पवारसाहेबांना काय म्हटले होते… भाजप कोणत्याही प्ारिसि्थतीत महाराष्ट्रात नको राकरिता याच जागेवर आटािपटा करून ८ वर्षे लिहतोय… महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले त्या िदवशी समाधान वाटले होते…. पण ज्या दिवशी ते एकत्र आले, त्या दिवशीच्या महाराष्ट्रात (िडसेंबर २०१९) जे समाधान होते, ते आज राहिले आहे का? याची तपासणी करा… आपण कुठे चाललोय ते तपासा… यशवंतरावांचा महाराष्ट्र हा आहे का? याचेही एकदा अॅाडिट होवू द्या…. कधी िकरिट सोमय्या… रोज संजय राऊत… कधी राणा… कधी सदावर्ते… महाराष्ट्राच्या विकासाशी, बांधणीशी ज्यांचा कुणाचाही कसलाही संबध नाही… त्यांनी माध्यमांच्या सगळ्या जागा आडवायच्या… सामान्य माणसांच्या प्रश्नाला पहिल्या पानावर जागाही िमळायची नाही… तो आवाज उठवणारा नेताही नाही… आज जशी यशवंतरावांची आठवण येते, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, यशवंराव मोहीते, मधुकरराव चौधरी या विकासपुरुषांची आठवण येते त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य निर्माण करणारे आचार्य अत्रे, डांगे, एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, क्रांतीसिंह नाना पाटील, उद्धवराव पाटील… एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख… मृणालताई… अहिल्या रांगणेकर… विदर्भातील जांबुवंतराव धोटे आिण सिमा प्रश्नाकरता त्यावेळी गर्जणारे जयंतराव िटळक…, शाहीर अमरशेख… आत्माराम पाटील, शाहीर जंगम, शाहीर गजाभाऊ बेणी, हेही डोळ्यांसमोर येतात. माईक नसताना घसा फाटेपर्यंत महाराष्ट्र िपंजून काढणारे हे नेते होते. आज त्यावेळचे सत्ताधारी राहिलेले नाहीत. त्यांचा विचार-चिंतन राहिलेले नाही… पैसा आिण प्रसिद्धीच्या मागे महाराष्ट्र लागला आहे का? हे कोण थांबवणार आहे? त्या िपढीचे प्रतिनिधी म्हणून, तो महाराष्ट्र घडवण्यातले एक साक्षीदार आिण सहभागी म्हणून शरद पवारसाहेब हा एकच नेता असा आहे… पण, अनेकवेळा मनात असे येवून जाते की, जेव्हा ते िनवांत असतील तेव्हा त्यांच्या मनातही प्रचंड अशी घुसमट होत असेल का? जे काही चालले अाहे त्यामुळे मनातून पवारसाहेबही काहीसे अस्वस्थच असतील… तरी ८-८ िदवस कडक उन्हात दौरे करून त्यांच्याकडून ते िकल्ला लढवत आहेत.
परवा साहित्य संमेलन झाले… संमेलनाचे अध्यक्ष भारत ससाणे यांनी चांगले भाषण केले… पण ही त्या त्या िदवसांपुरती भाषणे आहेत. भाषण झाले.. संमेलन संपले… महाराष्ट्रातील साहित्यिकांची, लेखकांची गेल्या ७-८ वर्षांत जी घुसमट होत आहे त्याबद्दल ससाणे बोलले… चांगलं बोलले… पण इंिदरा गांधी यांनी आणलेल्या आणीबाणीविरुद्ध रस्त्यावर उतरून त्यावेळी बोलणारे अनेक साहित्यिक, त्यांचे प्रतिनिधी आिण वारस आज कुठे गायब झाले आहेत? सामान्य माणसांचे जीवन अशक्य झाले अाहे. महागाईचा कडेलोट झाला… पुढचे िदवस आणखीन कठीण… गेल्या ७ वर्षांत खोट्या आश्वासनांनी सत्तेवर बसलेल्या दिल्लीतील सरकाराने सामान्य माणसांचे हाल-हाल करून टाकले. कुठे गेले ते दोन कोटी रोजगार? ९५० रुपयांवर गॅस सिलिंडर पोहोचला… १२५ रुपये पेट्रोल झाले… हे दोन्ही विषय केंद्र सरकारचे… अािण देशाचे पंतप्रधान याचे खापर राज्यांवर फोडत आहेत, असेही कधी घडले नव्हते. सगळेच अघटीत आहे. या सगळ्या प्रश्नांवर बोलणारे आहे काेण? काँग्रेसची अवस्था तर केविलवाणी आहे. सरकारात सामील झाल्यामुळे काँग्रेसचे नैतिक सामर्थ्यही गळून पडल्यासारखे आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारात फार महत्त्व नाही. सत्तेत बसल्यामुळे लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरता येत नाही… केंद्रीय नेतृत्त्व घोळ घालून बसलेले आहे. पंजाब राज्य हातचे घालवले… आता कुणी प्रशांत िकशोर नावाचा माणूस, सगळ्या पक्षांतून िफरून आल्यानंतर, तो काँग्रेस उभी करणार आहे… काँग्रेसवर काय वेळ आली… काँग्रेस्ाच्या विचारांवरच काँग्रेस उभी राहील… गांधी-नेहरूंचा विचार हाच काँग्रेसचा आत्मा आहे. त्याच्याकरिता भाजपा आिण सगळे पक्ष फिरून आलेल्या प्रशांत िकशोरची गरज नाही. काँग्रेस्ाच्या नेत्यांनी लोकांपर्यंत पोहोचावे… सत्ता फेकून द्याव्यात… आता हे मान्य आहे… ती काँग्रेस आज राहिलेले नाही. काँग्रेसजवळ आज महाराष्ट्रव्यापी नेताच नाही.
१९६२ च्या लोकसभा निनवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघात सोलापूरच्या तुळशीदासदादा जाधव यांना तिकीट देवून यशवंतराव आिण वसंतदादांनी नांदेडमधून िनवडून आणले. ताे विजय तुळशीदासदादांचा नव्हता… खूप लांब अंतर असून नांदेडच्या मतदारांचा यशवंतरावांवर असलेल्या विश्वासाचा तो विजय होता. पण, असा विश्वसनीय पुढारी काँग्रेसमध्ये आज राहिलेला नाही. लोक काँग्रससोबत आजही राहतील… पण नेते त्यांच्यापर्यंत कधी जातील?
६२ वर्षांत हिशोब करायचा म्हटला तर मोठा प्रबंध होईल…. ‘चालता-बोलता’ या आगामी ग्रंथातून पुढच्या काही काळात तसा प्रयत्न मी करत आहे… िकती यश येईल, मािहती नाही… परंतु आजच्या महाराष्ट्रात सगळा महाराष्ट्र खांद्यावर घेवून त्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवाचे िदवस येतील का? हा एकच विचार मनाला सतावत आहे. ६० वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र आजच्या एवढा श्रीमंत नव्हता. आजच्या एवढा झगमगाट नव्हता… प्रत्येकाच्या हातात मोबाईल नव्हता… भौतिक प्रगती नव्हती… पण विचारी होता… समाधानी होता… शेतकरी आत्महत्या करत नव्हता… कामगार चिरडला गेला नव्हता… ज्या शेतकरी आिण कामगारांनी हे राज्य िमळवून िदले, त्याकरिता १०६ हुतात्म्यांनी आपले बलिदान केले. त्यात आघाडीवर होते शेतकरी आिण कामगार… ६२ वर्षांत, १९८० नंतर नेमके तेच िचरडले गेले… यशवंतरावांनी शपथ घेतली तो िदवस आठवताना आज त्यामुळेच मन अस्वस्थ आहे. तो महाराष्ट्र हरवल्यासारखा वाटतोय… शिवाय त्या महाराष्ट्राचा शोध घेणारा आहे कोण?
यशवंतरावांना एकदा किसनवीर म्हणाले, ‘यशवंतराव, तुम्ही राज्य अितशय चांगले चालवत आहात… शेतकऱ्यांपासून साहित्य-संस्कृती मंडळापर्यंत िकती सखोल विचार आहे…’ यशवंतराव त्यांना थांबवून म्हणाले, ‘आबा, हे तुम्ही बोलून चालणार नाही… लोक हे बोलतात का हे सांगा… लोकांचे समाधान हाच आपल्या कामाचा िनकष आहे…’ आज ६२ वर्षांनंतर हाच प्रश्न राज्यकर्त्यांना विचारला तर… काय उत्तर िमळेल? मनाला विचारा… महाराष्ट्र समाधानी आहे का? अालेला प्रत्येक िदवस महाराष्ट्र ढकलतोय… िदल्लीवाले लोकांपासून खूप दूर आहेत… पण शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करून जे सत्तेवर आले त्यांचा महाराष्ट्र आज राणा… सदावर्ते… िकरीट सोमय्या… राऊत यांनी व्यापून टाकला आहे…. आिण लोकांशी याचा काहीच संबंध नाही. एवढीच एक खंत आहे. यशवंतरावांनी उभा केलेला महाराष्ट्रात रािहलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा बघावा, एवढाच एक विचार मनात येतो. पण तो महाराष्ट्र पुन्हा पाहणे, शक्य होईल, असे वाटत नाही. महाराष्ट्रातील सामान्य माणसांना फार समृद्धी झाली नाही तरी चालेल… पैसा फार िमळाला नाही तरी चालेल. जाती-धर्मांत एकोपा, गावागावात मन:शांती आिण पोटाला भाजी-भाकरी एवढीच त्याची अपेक्षा आहे. कोण मुख्यमंत्री आहे… कोण सत्तेवर आहे… याच्याशी ९० टक्के महाराष्ट्राचे काही देणे-घेणे नाही. फक्त आजचे िधंगाणे बंद करा… आव्हाने… प्रति आव्हाने… यांनीच महाराष्ट्र व्यापला आहे. आम्हा सामान्य माणसांना सुसंस्कृत विचारांचा महाराष्ट्र हवा आहे. तेवढीच अपेक्षा…
– मधुकर भावे
254 Total Likes and Views