देवेंद्र फडणवीस यांना पुरणपोळी नव्हे, शिरा आवडतो

Analysis
Spread the love

सध्या राज ठाकरे यांच्या भोंगा आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे.  मिडीयामध्ये राज आणि त्यांच्यावरचा हल्लाबोल ह्या शिवाय दुसरे काही वाचायला किंवा बघायला मिळत नाही.  अशा हवेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुरणपोळी प्रेमाची भलतीच चर्चा रंगली आहे. “लग्नाआधी  ते ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे” असे अमृता एक कार्यक्रमात बोलल्या होत्या. तेव्हापासून  देवेंद्र म्हणजे पुरणपोळी हे समीकरण बनले आहे.  “मी जिथे जातो, तिथे लोक मला पुरणपोळ्याच खायला देतात” अशी गोड तक्रार  फडणवीस  वेळोवेळी करीत असतात.   महिला मंडळांमध्ये चर्चा असते, की  फडणवीसांना खरंच पुरणपोळ्या आवडतात का?

                 एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस दाम्पत्यानं यासंदर्भात मिश्किल शब्दांत स्पष्टीकरण दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी एका मनोरंजन वृत्तवाहिनीवर बोलताना हा दावा केला होता. कार्यक्रमात एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृता यांनी ते ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे असे म्हटले होते.  लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती? ह्या पुढच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या,  मला त्यांना  ३०-३५ पुरणपोळ्या खाताना पहायचे आहे, त्याही मी न बनवलेल्या.

   अमृताच्या ह्या खुलाश्यावर पुरणप्रेमाचे रहस्य आणखी वाढले. पण नुकताच  देवेंद्र यांच्या विनंतीवर  अमृता फडणवीसांनी या सगळ्या प्रकारावर स्वत: खुलासा केला. अमृता म्हणाल्या, “यांचे  एक मित्र आहेत खूप लहानपणीचे. त्यांनी मला लग्नाच्या आधी सांगितलं होतं, की देवेंद्र फडणवीसांनी एका लग्नाच्या पंगतीत पैजेवर ३०-३५ पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या. ती भीती मला होतीच. पण लग्नानंतर मी पाहिलं की त्यांनी अर्धी पोळी देखील कधी माझ्यापुढे खाल्ली नाही.”

  देवेंद्र हेही हात जोडून म्हणाले, “मला पुरणपोळ्या आवडत नाहीत. मला प्लीज जिथे गेलं तिथे पुरणपोळी खायला देऊ नका. मी नाही खाऊ शकत हो. तुम्हाला हवं तर सांगतो, मला शिरा आवडतो, मोदक आवडतात, बंगाली मिठाई देखील आवडते. पण प्लीज पुरणपोळी नका पाठवू.”

    त्यामुळे भविष्यात कधी देवेंद्र यांना घरी बोलावण्याचा बेत कराल तर त्यांची  पसंत लक्षात ठेवा.   गब्बर की पसंत है  शिरा.

 437 Total Likes and Views

0 Comments

No Comment.