मनात आणले तर एखादा पोलीस अधिकारी किती धुमाकूळ घालू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सचिन वाझे. सव्वा वर्षापूर्वी वाझेने केलेल्या कारनाम्यांचे लोकांना विस्मरण झाले असेल. तेव्हा हे प्रकरण प्रचंड गाजले होते. पुढे याला राजकीय वळण मिळाले. गृहमंत्री अनिल द्देश्मुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप झाला. त्यात देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. देशमुख तुरुंगात आहेत आणि खटलेबाजी सुरु आहे. मात्र आता वाझे याचा परिचित व्यापारी मनसुख हिरेन यांची हत्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे ‘एनआयए’च्या प्रतिज्ञापत्रातून हायकोर्टासमोर आल्याने वाझे पुन्हा चर्चेत आला आहे.
सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हेसुध्दा शिवसेनेमध्ये होते. त्यांनी निवडणूकही लढवली होती. त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते.” भाजपचे नेते केशव उपाध्ये म्हणाले, “’सचिन वाझे काही लादेन आहे का?’ असा सवाल करत वाझेची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिलं पाहिजे. उपाध्ये यांचा सवाल रास्त आहे. पण कोण उत्तर देणार? प्रदीप शर्मा सध्या अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहे.
पूर्वी निलंबित असलेला वाझे पुन्हा सेवेत आला तेव्हा त्याला आपला पूर्वीचा दबदबा बनवायचा होता. त्यातून त्याने अंबानी यांच्या घरापुढे स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्याचा कट रचला. त्यासाठी मनसुखची कार वापरली. दहशत निर्माण करणे हाच यामागे हेतू असू शकतो. नन्तर मनसुख यांना ती कार त्यांनीच उभी केल्याची जबाबदारी घ्यायला वाझेने सांगितले. मनसुख याला तयार होईना तेव्हा त्यांना संपवण्याचा कट वाझेने शर्मासोबत रचला. वाझेने शर्माकडे ४५ लाख रुपये दिले. ते पैसे शर्माने मारेकऱ्यांना दिले. ठरल्याप्रमाणे कारमध्येच हत्या करून मनसुखचा देह खाडीत फेकून देण्यात आला असे एनआयएने म्हटले आहे.
मनसुखच्या हत्येचा गुंता सुटला. पण देशातले सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापुढे स्फोटकांची कार कोणी ठेवली? का ठेवली? सामान्य माणसाला हे कोडे वाटते. ह्या हत्याकांडाची सुरुवात अंबानींकडे कार ठेवण्यापासून झाली. वाझे आणि अन्य आरोपींनी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी कार उभी केली असे एनआयए म्हणते. हा दावा कोर्टात टिकला तर भयंकर आहे. चुकीची माणसे पोलीस दलात भरती होऊ लागली तर देवच मालक आहे.
207 Total Likes and Views