घरगुती सिलेंडरचे भाव ५० रुपयांनी महाग झाले आहेत. शनिवारी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला. मार्च महिन्यात २२ मार्चला भाव वाढवले होते. दोन महिनेही झाले नाहीत तर दरवाढीची कुऱ्हाड चालली आहे. आता मुंबईत १४.२ किलोंचा सिलेंडर १ हजार रुपयांना मिळणार आहे. दिल्लीतही तोच दर आहे. नागपुरात मात्र १ हजार ६० रुपये मोजावे लागतील. सर्वाधिक तडाखा पाटणा शहराला आहे. तिथे आता १ हजार ९० रुपये भाव झाला आहे.
आम आदमी पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता महागाई आणखी वाढणार. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेल्या आठवड्यात १०२ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. कुठली गोष्ट स्वस्त झाली ते सांगता येणार नाही. पेट्रोल-डिझेल महाग केल्याने सारेच महागले आहे. तेल कंपन्या भल्या सकाळी भाव वाढवून मोकळ्या होतात. त्यांना विचारणारा कोणी नाही. जगण्याच्या संघर्षात आम आदमी थकला आहे. घराचा गाडा कसाबसा खेचण्यात त्याचा दिवस निघून जातो. हल्लीच्या राजकारण्यांना महागाई हा इश्यू आहे असे वाटत नाही. एकेकाळी महागाईवर लोक रस्त्यावर यायचे, लाखा लाखाचे मोर्चे निघायचे. आता कोण मोर्चे काढणार? मृणाल गोरे, रांगणेकर, बर्धन आपल्यात नाहीत. आहेत ते राज ठाकरे, नवनीत राणा, उद्धव ठाकरे….. साऱ्यांचे टार्गेट सत्ता आहे. म्हणून मग भोंगे, अयोध्या असे सोपे विषय हाती घेतले जातात. दोन महिन्यापासून नुसता तमाशा सुरु आहे. लोक आतून संतापले आहेत. २०२४ ची वाट पाहत आहेत.
490 Total Likes and Views