गडकरींना जमते ते इतर नेत्यांना का जमू नये? – मोरेश्वर बडगे

Editorial
Spread the love

शेखर गुप्ता. पत्रकारितेच्या क्षेत्रातलं एक मोठे  नाव. गुप्ता एका कार्यक्रमासाठी नुकतेच नागपुरात येऊन गेले.  त्यावेळी त्यांनी केलेले भाषण  सर्वांनी  चिंतन करावे असे आहे.   देशाचे  नेमके  दुखणे त्यांनी सांगितले आणि त्यावर उपायही सांगितला.  “देशाला बदला  घेणारे  नव्हे तर  दिलासादायक वाटणाऱ्या नेत्यांची गरज आहे” असे त्यांनी  सांगितले. “देशात केवळ मोजकेच असे राजकारणी आहेत आणि अशांमध्ये  नितीन गडकरी यांचा  समावेश होते”  असेही ते म्हणाले.  अब्दुल कलाम, अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंगतीत  त्यांनी गडकरींना नेऊन ठेवले.  गडकरी हे नागपूरचे आहेत.  त्यामुळे  नागपूर-विदर्भाची छाती  वितभर फुगली.  आम्हा पत्रकारांना  प्रश्न पडतो,  राजकारणात राहून  गडकरी एवढे अजातशत्रू कसे राहू शकतात? गडकरींना जमते ते इतर नेत्यांना का जमू नये?  गडकरींचा फंडा सोपा आहे. समोरचा माणूस कुठल्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे हे न पाहता  काम करण्याचा गडकरींचा पिंड आहे. प्रश्नाशी ते भिडतात. त्यामुळे अगदी सोनिया गांधींपासून  सर्वांना ते आपले वाटतात.   पण एकटे गडकरी किती पुरणार?   आभाळच फाटले आहे. कुठे कुठे ठिगळ लावणार? महाराष्ट्राला  आणखी १०० गडकरींची गरज आहे.  ते मिळणे नाही. गंगा स्वच्छ होईल, हवा स्वच्छ होईल. पण ह्या राजकीय प्रदुषणाचे काय करायचे?  अलीकडे तर  महाराष्ट्राचे राजकारण खूप घाणेरडे झाले आहे.

    सध्या देशात आणि खास करून महाराष्ट्रात   राजकारण्यांमध्ये एकमेकांना तुरुंगात  टाकण्याची स्पर्धा सुरु आहे.  बेरजेचे राजकारण पुढारी विसरले आहेत. केवळ बदला घेण्याचे राजकारण  सुरु आहे. पैसा खाल्ला असेल तर ईडी धाडी पडणारच. त्याचा इश्यू कसा होऊ शकतो? आम्ही खातो, तुम्ही खा, हे आतापर्यंत चालले. हा मोदींचा जमाना आहे. हिशोब द्यावा लागेल. पण तुमची ईडी तर आमचे पोलीस  असा पंगा सुरु आहे.  आरोप-प्रत्यारोपांनी तर  केव्हाच सभ्यतेची पातळी सोडली. इरसाल शिव्या तर जणू राजभाषा झाल्या आहेत. कोणी कोणाचा बाप काढतो आहे तर कोणी कोणाला जमिनीत २० फुट खाली गाडतो म्हणतो आहे. घरातही जे बोलले जात नाही ते  जाहीरपणे बोलले जात आहे. कोणालाच त्याचे काही वाटत नाही. यापेक्षा अतिशय जहाल अस्सल वऱ्हाडी शिव्या गडकरींना  येतात. पण त्या कधी त्यांनी काढल्या नाहीत.  नेत्याने समाजात कसे  वागावे याचा गडकरी आदर्श आहेत. “हे तमाशे बंद करा’ असे नितीन गडकरींनी जाहीरपणे सांगून झाले. पण पुढारी सुधारायला तयार नाहीत. ठाकरे सरकार तर बेभान होऊन  अंगात आल्यासारखे वागत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा १४ दिवसाच्या जेलनन्तर हॉस्पिटलमधून घरी  आल्या तर  घराच्या बेकायदा बांधकामाची नोटीस द्यायला मुंबई महापालिकेचे अधिकारी धडकले. चार दिवसानंतरही नोटीस देता आली असती. नुसती खुन्नस काढणे सुरु आहे.  राज ठाकरेंच्या सैनिकांनी मशिदींवरील भोन्ग्यांचे आंदोलन केले म्हणून  सरकारने त्यांची धरपकड चालवली आहे.  त्यावरून राज ठाकरेंनी  उद्धव ठाकरे यांना कडक पत्र लिहिले. ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’  असा दम दिला. कोण राज ठाकरे? कोण संजय राऊत?कोण किरीट सोमय्या?  कोण राणा? हे नेते केव्हापासून झाले?

                गेल्या  काही  महिन्यापासून ह्या लोकांनी  महाराष्ट्र व्यापला आहे. सारे प्रश्न सुटले?  राज्यात दुसरे प्रश्नं नाहीत का? आरोप-प्रत्यारोप किती ताणायचे? ५० वर्षापूर्वीचा महाराष्ट्र  सुसंस्कृत, विचारी नेत्यांचा महाराष्ट्र होता. तो कुठे हरवला? कोणी  गमावला?   भांडायचेच आहे तर सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी भांडा. पूर्वी हे होत नव्हते. यशवंतराव चव्हाण निपुत्रिक होते. त्यावरून  आचार्य अत्रे यांनी त्यांना टोमणा मारला. पण नंतर त्यांना वास्तव कळले तेव्हा अत्रेंनी त्यांची  माफी मागितली. कम्युनिस्ट भाई  बर्धन आणि  जनसंघाच्या सुमतीताई सुकळीकर…दोघांच्या विचारधारा वेगळ्या. पण  बर्धन ताईना बहीण मानायचे.  सभेत बर्धन  जनसंघावर  तुटून पडायचे. पण सभा आटोपली, की ताईच्या हातचे थालीपीठ खायला  हक्काने  घरी जायचे. कुठे ते नेते आणि आजची नळावरची भांडणे.  तेव्हा घोषणा नव्हत्या, फोटोबाजी नव्हती, प्रसिद्धी नव्हती आणि सर्वात महत्वाचे  टीव्हीवाले नव्हते. पूर्वीचे नेतेही राजकारण करायचे.  पण विकासाच्या प्रश्नावर एक व्हायचे.  रोजगार हमी योजनेसाठी  १०० कोटी रुपये कुठून उभे करायचे  असा प्रश्न आला तेव्हा  विरोधी पक्षासह सर्वांनी  रोहयो कर आणायला एकमुखाने संमती दिली.  असल्या  एकीतून महाराष्ट्र पुढे आला. आज काय सुरु आहे? देवेंद्र सरकारच्या अनेक योजना उद्धव सरकारने अडवल्या. राज्य सोडा, तालुक्यातही भाजपच्या लोकांची कामे होत नाहीत.  दांडे  घेऊन फिरणाऱ्या  मिडीयाने राजकारण सडवले. मिडीयाने फालतू लोकांना हिरो बनवले आहे. हल्लीचे राजकीय पक्ष  केवळ ‘बाईट’वर  जगत आहेत.  महागाईचा आगडोंब पेटला आहे. सिलिंडर हजार रुपयांवर गेले.  चूल पेटवायची वेळ येतेय.  पेट्रोल महागले म्हणून ओरडायचे. आता पेट्रोल १२० रुपयांवर गेले. समाज  चिडीचूप आहे.  भाज्यांपासून  वडापावपर्यंत सारे महागले. कोणीही ह्या प्रश्नावर बोलत नाही.  सामान्य माणसाचे प्रश्नं संपले का? संपले नाहीत. उलट  अधिक किचकट झाले आहेत. तरीही हा  असंतोष  बाहेर येत नाही.  जगण्याच्या  संघर्षातच  माणूस एवढा थकतो आहे, की  तो लढे  विसरला आहे. वेळ आहे कुठे? पूर्वी महागाईवर चर्चा व्हायची, मोर्चे निघायचे.  आज हे कुठेही दिसत नाही. मृणाल गोरे गेल्या. त्या नन्तर आपण एकही ‘लाटणे’वाली बाई उभी करू शकलो नाही. आताची आंदोलने म्हणजे ‘बात गयी , रात गयी’ असे सुरु आहे.  २४ तासात लोकांच्या चिंतेचे विषय बदलतात. शेखर गुप्तांच्या स्वप्नातले नेते प्रत्यक्षात दिसतील?  कारण आता नेतेच नव्हे तर  मीडियाही खुनशी होत चालला आहे.  तुम्ही  वाहिन्यांवर  चालणारी भाषा पहा.  वृत्तपत्रांची भाषा पाहा.  लोक हे सारे पाहत आहेत, ऐकत  आहेत. ते बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना हे आवडते अशातला भाग नाही.   २०२४ मध्ये लोक निकाल   देतील.

 ( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत. )

 136 Total Likes and Views

0 Comments

No Comment.