राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर प्रसारित करणे अभिनेत्री केतकी चितळेला भोवलं आहे. ठाणे कोर्टाने केतकीला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आक्षेपार्ह पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. तिच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी अटक केली होती.
ठाणे सत्र न्यायालयात केतकी चितळे हिने स्वत:च न्यायालयात युक्तिवाद केला. तिने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला. मी फेसबुकवर जी पोस्ट टाकली ती एक प्रतिक्रिया होती. एक सामान्य व्यक्ती म्हणून मला लिहण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य नाही का, असा सवाल तिने उपस्थित केला. मी राजकीय नेता किंवा मास लीडर नाही. त्यामुळे माझ्या लिहण्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. ही पोस्ट मी स्वत:च्या मर्जीने फेसबुकवर टाकली होती असे तिने म्हटले.
केतकी चितळे आणि वाद हे जणू समीकरण झाले आहे. या आधीही तिने केलेल्या पोस्ट्सवरून मोठे वादळ उठले आहे. केतकी अवघी २९ वर्ष वयाची आहे. मराठी-हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम करते. ‘तुझा माझा ब्रेक अप’ ह्या मालिकेमधून ती घराघरात पोचली. सोशल मिडीयावर कमालीची सक्रीय असलेल्या केतकीला ताजी पोस्ट मात्र चांगलीच महागात पडत आहे. तिने केलेल्या पोस्टवरुन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंपासून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सर्वांनी अशाप्रकारच्या आक्षेपार्ह भाषेच्या वापराला विरोध केला आहे. नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना केतकीच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाई फेकली होती. ‘मातोश्री’पुढे हनुमान चालिसा वाचण्याच्या हट्टापायी अपक्ष खासदार नवनीत राणा यांना १४ दिवसाचा तुरुंगवास भोगावा लागला होता. हे प्रकरण ताजे असताना आणखी एक तरुणी वेगळ्या प्रकरणात चर्चेत आली आहे.
675 Total Likes and Views