तल्लख मेंदूचे विद्यार्थी पैसे खात नाहीत असे कुठेही लिहिलेले नाही. महिला घोटाळेबाज नसतात असेही कुठे लिहिलेले नाही. मात्र वयाच्या २१ व्या वर्षी सर्वात तरुण आयएएस म्हणून रुजू होणाऱ्या झारखंडच्या खाण सचिव पूजा सिंघल ईडीच्या कारवाईमुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या २२ वर्षाच्या सरकारी सेवेला हा मोठा बट्टा लागला. सिंघल आणि त्यांच्याशी संबंधी व्यक्तींकडे ईडीने टाकलेल्या धाडीत तब्बल १९ कोटी रुपये मिळाल्याने खळबळ आहे. ईडीनं पूजा सिंघल यांच्याशी संबंधित एकट्या सीएच्या घरातून १७ कोटी रुपये जप्त केले. ईडीनं मुंबई, दिल्ली, जयपूर आणि रांचीमध्ये छापे टाकले. ईडीला जप्त केलेली रोख रक्कम ताब्यात घेण्यासाठी बस बोलवाली लागली होती. नोटा मोजणाऱ्या मशीन अनेकदा थकून बिघडल्या. हे पैसे पूजाचे आहेत अशी कबुली तिच्या सीएने ईडीला दिली आहे.
पूजा सिंघल या २००० च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. धडाडीच्या अधिकारी म्हणून सुरुवातीला त्यांची ख्याती होती. सरकार कोणाचेही असो, त्यांना मोक्याचे पोस्टिंग मिळत असे. अनेक घोटाळे त्यांनी बाहेर काढले. पण सध्या त्याच घोटाळ्यात सापडल्या आहेत. ईडीनं पूजा सिंघल यांच्या विरोधात न्यायालयात मनरेगा घोटाळा प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. मनरेगा घोटाळा तब्बल १६ कोटी रुपयाचा असल्याचे समजते. ह्या घोटाळ्याची चौकशी सुरु असताना खाण वाटपात घोटाळा झाल्याचे ईडीच्या लक्षात आले. अनेक सरकारी अधिकारी, राजकारणी, बिल्डर यात अडकले आहेत. पुजाला अटक करण्यात आली असून रिमांडमध्ये उजेडात आलेल्या माहितीने ईडीचे अधिकारीही चक्रावले आहेत. घोटाळयातला पैसा पूजाच्या नवऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये लागल्याचा ईडीला संशय आहे.
पूजाचे पती अभिषेक झा यांना देखील ईडीनं अटक केली आहे. पहिले लग्न तुटलं. पूजाचा हा दुसरा नवरा आहे. पूजा आणि अभिषेक झा यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. ईडीनं अभिषेक झा यांच्या पल्स हॉस्पिटलवर देखील छापे टाकले होते. पल्स हॉस्पिटलमध्ये आलेली गुंतवणूक कुठून आली त्याच्या शोधात ईडी आहे. ते कळेलही. पण यंत्रणेच्या विश्वासार्हतेचे काय? आतापर्यंत राजकारणी सापडत होते. आता अधिकारी आणि त्यातही महिला अधिकारी सापडली आहे. कुंपणच शेत खात आहे म्हणायचे का?
279 Total Likes and Views