झारखंडमधील कोळसा खाण सचिव असणार्या पूजा सिंघल नामक आयएएस अधिकारी महिलेच्या घरी पोलिसांनी धाड टाकल्यावर तिच्या घरात सापडलेली रोकड बघून पोलिसही चक्रावून गेले. सुमारे 19 कोटी रुपयांच्या नोटांची बंडले आढळून आली. हे परवा घडले म्हणून लक्षात राहिले, एरवी आपल्या देशात भ्रष्टाचार करण्यात उच्च पदांवरील अधिकारी नेत्यांपेक्षा चार पावले पुढे आहेत. एखाद्या नेत्यांच्या घरात चार दोन कोटी जरी सापडले तरी त्याची एवढी बदनामी होते की त्याचे राजकीय जीवन पणाला लागण्याची वेळ येते. मात्र अधिकारी वर्गाने केलेल्या घोटाळ्यांची हवी तशी दवंडी सुद्धा पिटली जात नाही. हे माना की नका मानू मात्र सत्य आहे
आयएएस अधिकारी कमी वयात सेवेत आला की साधारण पाच सात वर्षात महत्त्वाच्या जागेवर त्याची नियुक्ती होते. दहा वर्षांनी तर एखाद्या खात्याचा तो प्रमुख बनतो. अशावेळी सर्व अधिकार त्याच्या हातात एकवटले असतात. अधिकार्यांना कोणताही जनसंपर्क किंवा पार्टी सांभाळावी लागत नाही. त्यामुळे कंत्राटदार, उद्योगपती यांच्या व्यवहारात मिळणारा गडगंज पैसा थेट स्वतःच्या डब्यात भरण्यात अधिकारी तरबेज झाले आहेत. नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार चांगला आणि यांचा वाईट असे आमचे अजिबात म्हणणे नाही मात्र त्या तुलनेत नेत्यांचे खर्च वाढलेले असतात शिवाय दर पाच वर्षांनी निवडणुकीत हा पैसा बाहेर येतो. लोकांचा पैसा परत लोकांजवळ जातो, अधिकार्यांनी गायब केलेल्या पैशाला अजिबात पाय फुटत नाहीत. तो बेनामी स्वरूपात देश विदेशात गुंतवला जातो हे आता सर्वश्रुत झाले आहे. आपल्या देशात जेवढा भ्रष्टाचार आजवर नेत्यांनी केला नसेल तेवढा पैसा उच्चपदस्थ अधिकार्यांनी गायब केला आहे. फरक एवढाच असतो की लोकशाहीत नेता हा सबकी भाभी असतो. अगदी सामान्य विरोधी कार्यकर्ता सुद्धा त्याच्यावर सहज पैसा खाण्याचा आरोप करतो. सनदी अधिकारी समोर बघितला की भल्या भल्यांची बोबडी वळते. सहज कुणी आरोप करायला धजावत नाही. *नेता नेहमीच गरीब बिचारी गाय, कुणीही हाका असा राहिला आहे
आयपीएस दर्जाचे अधिकारी आणि त्यांनी 25/30 वर्षाच्या सेवेत कमावलेली संपत्ती बघितली तर सामान्य व्यक्तीचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते. अडमाप आणि मोक्कार पैसा असेच ज्याचे वर्णन करता येईल एवढा पैसा यांच्याकडे येतो कुठून? या साध्या प्रश्नाचे उत्तर अजूनही आपल्या देशात मिळत नाही अशा विचित्र लोकशाही व्यवस्थेत आपण सगळे अडकलो आहोत. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी किंवा मनपा आयुक्त पदावरून निवृत्त झालेला कोणताही अधिकारी कुबेराचा बाप शोभेल एवढी संपत्ती जमा करीत असेल तर पाच पन्नास लाख खाणार्या एखाद्या नेत्याला आपण कितीकाळ शिव्या शाप देणार आहोत याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.
मुंबई क्राइम ब्रँचमध्ये कार्यरत असणारा साधा पीएसआय जर नोटांच्या गादीवर झोपत असेल तर
सर्वोच्च पदांवरील अधिकारी काय करीत असतील याची कल्पना केली तर अंगावर काटा उभा राहतो एवढी खोल ही पैशांची दरी आहे. भ्रष्ट अधिकारी मात्र एकमेकांना चटकन सांभाळून घेतात, चिंध्या नंतर नेत्यांच्या फाडल्या जातात. म्हणूनच कधी कोणता अधिकारी आपल्या देशात भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊनही तुरुंगात खडी फोडायला जात नाही कारण त्याला त्यातून अलगद बाहेर काढणार्या सगळ्या जातभाई यंत्रणा कामाला लागलेल्या असतात. कुणी कितीही नाकारले तरी भ्रष्ट अधिकार्यांना वाचवणार्या यंत्रणा गल्ली ते दिल्ली अतिशय मजबूत झालेल्या आहेत.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
संपादक दै.अजिंक्य भारत
संवाद -9892162248
306 Total Likes and Views