राज ठाकरे यांनी का केला अयोध्या दौरा स्थगित?

Editorial
Spread the love

      महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो  राज ठाकरे यांनी ५ जूनचा आपला बहुचर्चित अयोध्या दौरा  तुर्तास स्थगित केला आहे. येत्या २२ मे रोजी त्यांची पुण्यात सभा आहे. तिच्यात सविस्तर बोलू असे राज यांनी म्हटले आहे.  प्रकृतीच्या कारणास्तव ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचे मनसेकडून सांगितले जात असले तरी तर्क वितर्काना उधाण आले  आहे.

          दीड वर्षापूर्वी राज यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाच्या दुखापतीचा त्रास  वाढल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी याच कारणाने त्यांनी पुण्याचा दौरा अर्धवट सोडला होता.  तब्येतीचे एक कारण आहेच. पण त्यापेक्षा राजकीय कोंडीने त्यांना वेगळा विचार करणे भाग पडले असावे.  भाजपचे खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध केला होता. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय पाय ठेवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका   त्यांनी घेतली होती.  अशा वेळी उत्तर प्रदेशातून भाजपाचा कोणताही नेता राज यांच्या समर्थनार्थ पुढे आलेला नाही. मुंबईत उत्तर भारतीयांना खुश करण्याची भाजपने खेळलेली चाल राज ठाकरे यांच्यासाठी मात्र अडचणीची ठरली. त्यातच १५ जून रोजी  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार आहे.  मोठे शक्तीप्रदर्शन करून राज यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली होती. ते वेगळे टेन्शन होते. त्यामुळे अयोध्येला जाणेच  रद्द करून  राज यांनी सावध पवित्रा  घेतल्याचे   मानले जाते. शिवसेना खासदार संजय राऊत ही संधी थोडीच सोडणार. “अयोध्या दौऱ्यासाठी त्यांनी मदत मागितली असती, तर आम्ही सहकार्य केलं असतं”, असं म्हणत खोचक टोला त्यांनी  लगावला आहे.

राज ठाकरेंचं ट्वीट

राज ठाकरेंनी आज सकाळीच ट्वीट करून अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाल्याचं जाहीर केलं आहे. “तूर्तास अयोध्या दौरा स्थगित! महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलू” असं म्हणत २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेमध्ये यासंदर्भात भूमिका मांडणार असल्याचं राज ठाकरेंनी या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी निशाणा साधल्यानंतर मनसेनं प्रत्युत्तर दिलं आहे.

                दरम्यान, दौरा स्थगित केल्यानंतर सुरू झालेल्या तर्क-वितर्कांना मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “तूर्तास स्थगितचा अर्थ पुढे होईल असा आहे. “जो नेता महाराष्ट्रहितासाठी राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांना अंगावर घेतो, जो नेता राष्ट्रहितासाठी पंतप्रधानांवर टीका करताना कचरत नाही, तो नेता एका खासदाराच्या बडबडण्याने आपला निर्णय बदलेल का? मीडिया आणि विरोधकांनी तूर्तास स्थगितचा अर्थ लावताना नवनवीन राजकीय शोध लावू नयेत. सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात!” असे शिंदे म्हणाले आहेत.

 158 Total Likes and Views

0 Comments

No Comment.