ज्ञानवापी आणि सर्वव्यापी

Editorial
Spread the love

संघ परिवार गेली अनेक वर्षे या देशात जाणीवपूर्वक त्यांच्या अजेंड्यावर काम करीत आहे. श्रीराम मंदिराचा मुद्दा संपल्यावर त्यांच्या हातात आता काही राहिले नाही असे ज्यांना वाटते त्यांचे राजकीय आकलन कमी आहे असे आम्हाला वाटते. मोदींच्या दुसर्‍या पर्वात अयोध्या मुद्दा निकाली निघाला असला तरी संघ परिवाराचे मिशन संपले असे म्हणता येणार नाही. 92 च्या आधी जेव्हा श्रीरामभूमी मुक्ती आंदोलन ऐन भरात होते त्या काळात हा परिवार कोणत्या घोषणा देत होता आणि आजही जी कायम आहे, त्याकडे लक्ष दिल्यास काही गोष्टी समजण्यात मदत होते. अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है ही ती घोषणा आहे. *सध्या ज्ञानवापी मशीदवरून जे काही चालू आहे त्याचे मूळ या घोषणेत आहे*.
    काशीत बाबा विश्वनाथ मंदिराला लागून जी ज्ञानवापी मशीद आहे तिची कोर्टाच्या आदेशाने पाहणी झाल्यावर तळ घरात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदुत्ववादी मंडळींनी केला आहे. मुस्लिम मात्र हा दावा खोडून काढतात. ते शिवलिंग नसून पाण्याचा फवारा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ज्ञानवापी हे मशिदीचे नावही मोठे विचित्र आहे.जगातल्या 52 मुस्लिम देशात एकाही मशिदीचे असे संस्कृत नाव आढळत नाही. ज्ञानवापी म्हणजे ज्ञानाची विहीर, मशीद ज्ञानाची विहीर कशी काय असू शकते? या प्रश्नाचे उत्तर अजून तरी कोणत्या मुल्ला, मौलवीकडून आल्याचे दिसत नाही. त्यामुळे हिंदूंचा पक्ष इथे प्रभावी होताना दिसत आहे.
    आपल्या देशात दीर्घकाळ मोघल राजवट होती. त्या काळात हिंदूंची अनेक मंदिरे ताब्यात घेऊन त्यांचे मशिदीत रूपांतर करण्यात आले, असा एक विचारप्रवाह आपल्या देशात आहे.त्याला इस्लामच्या आक्रमणाचे संदर्भही असू शकतात. अनेक मुस्लिम विद्वान सुद्धा हे पुरातत्त्वीय सत्य मान्य करतात. इथे विषय मात्र तो नाही. *संघ परिवाराला त्याचा उन्मादी इव्हेंट करायचा आहे.काशी, मथुरा बाकी आहे, त्यामुळे या इव्हेंटची शिडी करीत भाजपला सुद्धा सत्तेचा सोपान चढल्यावर आणखी काही टर्म तिथेच मुक्काम ठोकायचा आहे हे सगळे सराव त्याचाच एक भाग आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. ओवेसी त्यासाठी संघ परिवाराला साजेशी भूमिका घेताना दिसतात*.
      अयोध्या प्रश्नी कोर्टाचा निकाल आल्यावर अलीकडे एक थेंबही रक्त न सांडता मंदिर निर्माण विषय मार्गी लागला मात्र याच मुद्याने 92 साली शेकडो निरपराध लोकांना दंगलीत जीव गमवावा लागला हे विसरून चालणार नाही.*उत्तर प्रदेशातील काही हजार चौरस फूट जागांच्या बदल्यात या देशातील लोकांचे जीव घेण्यात ज्यांना स्वारस्य आहे त्यांना हा वाद मंदिर-मशीद विश्वस्त यांच्यात बैठक घेऊन सोडवायचा नाही हे आता शेंबडे पोर सुद्धा जाणून आहे*.ओवेसी म्हणतात, एक मशीद आम्ही गमावली आता दुसरी काहीही झाले तरी जाऊ देणार नाही याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. जे विखारी वातावरण संघ परिवाराला हवे आहे तेच ओवेसीच्या मुखातून व्यक्त होत असेल तर अर्थ स्पष्ट आहे.
      *ज्ञानवापी एक जमिनीचा तुकडा असला तरी त्यावरून विखार मात्र सर्वव्यापी करायचा आहे. उन्माद, विद्वेष आणि आक्रमक भाषा माध्यमातून सतत झिरपत राहावी याची पेरणी केली जात आहे. भाजपने खिश्यात टाकलेली मीडिया हाऊस त्या कामात जोमाने भिडली आहेत*. देशातील सगळे ताजे प्रश्न त्यापुढे फिके पडले आहेत. जे पेट्रोल, गॅसची आठवण काढतील त्यांना थेट नास्तिक, फुरोगामी किंवा देशद्रोही ठरवले जात आहे. लोकसभा निवडणूक जशी जवळ येईल तशी काशी, मथुरा एकदम प्रकाशझोतात येईल. मुस्लिमांचे मसिहा ओवेसी त्यासाठी हातात अन् जिभेवर टेम्भे घेऊन तयार असतील, तोवर संघ परिवाराने आवडत्या योजनेवर अखेरचा हात फिरवलेला असेल.

-पुरुषोत्तम आवारे पाटील
संपादक दै.अजिंक्य भारत
संवाद -9892162248

 344 Total Likes and Views

0 Comments

No Comment.