तो पंजाब कॉन्ग्रेसचा अध्यक्ष होता. आता त्याला पंजाबचे मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण सध्या तो पतियाळाच्या तुरुंगात आहे. नियतीचा खेळ पहा. होत्याचे नव्हते झाले. ५८ वर्षे वयाचे नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आता ते सिद्धू नाहीत. ते आहे कैदी नंबर २४१३८३. इतर कैद्यांसारखेच त्याना ठेवले आहे. विशेष सुविधा नाही. सिद्धू ह्या धक्क्याने हादरला आहे. पहिल्या रात्री तो तुरुंगात जेवलाही नाही. असे काय झाले , की हा नेता जेलमध्ये आहे?
३४ वर्षापूर्वीचे हे प्रकरण आहे. तेव्हा सिद्धू २५ वर्षाचा होता. नुकतेच त्याने क्रिकेट खेळणे सुरु केले होते. गुरनाम सिंग नावाच्या एका ६५ वर्षे वयाच्या इसमाशी त्याचा कार पार्किंगवरून वाद झाला. त्यात त्याने त्या व्यक्तीला ठोसा मारला. धक्काबुक्की करून खाली पाडले. त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्याच दिवशी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर यांच्याविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण सत्र न्यायालयात गेले. त्यानंतर १९९९ मध्ये सत्र न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला. सप्टेंबर १९९९ मध्ये ट्रायल कोर्टाने नवज्योतसिंग सिद्धू यांची निर्दोष मुक्तता केली होती. परंतु उच्च न्यायालयाने डिसेंबर २००६ मध्ये सिद्धू आणि त्यांच्या मित्राला खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याला दोघांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सिद्धू यांना प्राणघातक हल्ला प्रकरणी दोषी ठरवत ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. नंतर याच प्रकरणात पीडितेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. मार्च २०२२ मध्ये न्यायालयाने ह्या पुनर्विलोकन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. तो निर्णय आता आला. सिद्धूला ३४ वर्षापूर्वी त्याने मारलेला ठोसा अशा प्रकारे भोवतो आहे. आता तो कसे म्हणणार, की ठोको ताली.
258 Total Likes and Views