कॉन्ग्रेसचे चिंतन शिबीर नुकतेच उदयपूरला पार पडले. चिंतन शिबीर म्हणण्यापेक्षा ‘चिंता शिबिर’च अधिक होते ते. ह्या शिबिरासाठी गेलेले प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तेथे काय चिंतन केले असेल, ते असेल. पण त्यांनी जे केले ते नागपुरात आल्या आल्या पत्रकारांना छाती फुगवून सांगितले. आयुष्यात प्रथमच नाना खरे बोलले असतील. सोप्या भाषेत बोलायचे तर नानांनी सोनिया-राहुल गांधींकडे राष्ट्रवादीची चुगली केली. “भाजपला बळ देण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. कॉन्ग्रेस संपवायला निघाली आहे राष्ट्रवादी” अशा शब्दात नानांनी राष्ट्रवादीची म्हणजे शरद पवारांची सोनिया गांधींकडे तक्रार केली. मग महाआघाडी सरकारमधून बाहेर पडणार का? असे पत्रकारांनी विचारल्यावर नाना म्हणाले, “येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला परिणाम दिसतील.” मिडीयाने ब्रेकिंग न्यूज चालवली. पण तुम्ही लिहून ठेवा. काहीही होणार नाही. मुळात नानांना पक्षातच किती गांभीर्याने घेतले जाते, हा प्रश्नच आहे. “त्यांच्या म्हणण्याला फार महत्व देण्याचे कारण नाही” असे सांगून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नानांना उडवले. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर नानांनी स्वबळाचा नारा दिला होता तेव्हा “मी लहान माणसांशी बोलत नाही” असे खुद्द शरद पवार म्हणाले होते. आता बोला. नानांची तक्रार ऐकून सोनिया-राहुल सुखावले असतील. चला, महात्मा गांधींची इच्छा पूर्ण करण्याच्या आपल्या कामात पवारही हातभार लावत आहेत, हे ऐकून मायलेकांना हायसे वाटले असेल. पण नानांना गंभीरपणे कोणी का घेत नाही? शरद पवारांना रोखण्यासाठी राहुल गांधींनी नानांना प्रदेशाध्यक्ष केले होते. त्या नानांची आज स्वतःच्याच पक्षात केविलवाणी अवस्था आहे. ती लपवण्यासाठी नाना सनसनाटी वक्तव्ये करीत असतात का? कार्यकर्त्यांना हा प्रश्न छळतो.
बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याकडे पहा. कसे मस्त रमले आहेत महाआघाडी सरकारमध्ये. मग नाना पटोले यांनाच कुठला व्हायरस डसला आहे? की त्यांना मंत्री व्हायचे आहे? विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ते कॉन्ग्रेस अध्यक्ष झाले तेव्हा सर्वांनी त्यांचे कौतुक केले. नानाही गावोगावी गेले. कॉन्ग्रेस नंबर वन होणार असे सांगत सुटले. पण काय झाले? तेच नाना आज पवारांच्या नावाने शंख करीत आहेत. गटा-तटात विभागलेल्या कॉन्ग्रेसमध्ये नानांच्या नावाने आणखी एका नव्या गटाची भर पडली. ‘नानाचा माणूस’ म्हणून अलीकडे काही जणांकडे पाहिले जाते. कॉन्ग्रेस आजही राज्यात चवथ्या नंबरचा पक्ष आहे. वाढणे तर सोडा, सरकारमध्येही कॉन्ग्रेस दिसत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी आक्रमकपणे काम करताना दिसतात. कॉन्ग्रेसचे मंत्री तसे दिसत नाहीत. त्याला कारण आहे. मिळालेली सत्ता लॉटरी आहे. नशिबाने सत्ता आली त्यामुळे जितके दिवस निभतील तितके सही, अशाच मानसिकतेत कॉन्ग्रेसचे नेते वावरताना दिसत आहेत. त्यामुळे अजितदादांशी पंगा घ्यायला कुणीही तयार नाही. १२ आमदारांची नियुक्ती होत नाही तोवर विदर्भ, मराठवाडासाठी वैधानिक विकास मंडळांची नियुक्ती होणार नाही असे सांगून अजितदादांनी कॉन्ग्रेसची कोंडी केली. मंडळेही नाहीत, पुरेसा फंड नाही, कॉन्ग्रेसच्या आमदारांच्या फायली पडून राहतात. पण कॉन्ग्रेसचा एकही मंत्री बोलायला तयार नाही. मध्य प्रदेशचे शिवराज सरकार ओबीसींसाठी राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टातून खेचून आणते. ठाकरे सरकार का गोट्या खेळते? इम्पेरीकल डेटा गोळा करण्याचे सोडून ठाकरे सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत राहिले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गेले. नुसता टाईमपास सुरु आहे. ना हे मराठा आरक्षण देऊ शकले ना ओबीसी आरक्षण. सध्या तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपण किती प्रखर हिंदुत्ववादी आहोत हे दाखवू पाहत आहेत. “मेरी साडी से तेरी साडी सफेद कैसे?” असा हा मामला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा विषय काढताच राजकारण तापले. कोणाचे हिंदुत्व मोठे? याची स्पर्धाच लागली आहे. तो विषय तर आहेच. पण तीन पक्षांनी सत्तेत बसताना दिलेल्या ‘समान किमान कार्यक्रमा’चे काय झाले? ह्या बाबत महाआघाडी सरकारचा कोणीही मंत्री बोलत नाही. शेताच्या बांधांवर उद्धव जाणार होते. त्याचे काय झाले? ते सोडून ते ‘’नही झुकेंगी’ म्हणणाऱ्या आजीसोबत का दिसतात? राज ठाकरे, नवनीत राणा, केतकी चितळे हेच लोकांचे प्रश्न आहेत अशी ठाकरे सरकारने समजूत करून घेतली आहे. शिवसेनेने भाजपसोबत निवडणूक लढवली. निकालानन्तर दगा दिला आणि शरद पवारांच्या सापळ्यात अडकले. ठाकरे मुख्यमंत्री झाले, गंगेत घोडे न्हाले. पण महाराष्ट्र बुडतोय, त्याचे काय?
नाना पटोले म्हणतात, राष्ट्रवादीवाले कॉन्ग्रेस संपवायला निघाले आहेत. पण संपवायला आता कॉन्ग्रेस कुठे उरली आहे? इंदिरा गांधी आज हयात असत्या तरी त्यांनाही आजच्या कॉन्ग्रेसला सावरणे शक्य झाले नसते. बोऱ्या वाजला आहे. एकेकाळी देशात सत्तेत असलेली कॉन्ग्रेस आज फक्त दोन राज्यात सत्तेत आहे आणि दोन राज्यात सत्तेत सहभागी आहे. त्यातले एक राज्य म्हणजे महाराष्ट्र. शर्ट नाही तो कॉलर सही. सत्तेची मलाई कोण सोडणार? सरकारबाहेर पडण्याचे धाडस सोनिया करणार नाहीत. पण “राजाचा पोपट शेवटच्या घटका मोजतोय हे राजाला कोण सांगणार?” शरद पवार कॉन्ग्रेसलाच नव्हे तर शिवसेनेलाही संपवायला निघाले आहेत. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी पवारांनी पावसात सभा केली नाही. २०२४ मध्ये त्यांना आपल्या कन्येला राज्याचा पहिला महिला मुख्यमंत्री बनवायचे आहे. त्यासाठी ते शिवसेनेच्या सिटा पाडतील. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन बोलले तर ते सांगतील. म्हणून सध्या ‘चीत भी मेरी आणि पट भी मेरी’ असे सुरु आहे. गोंदियात ठरले असताना राष्ट्रवादीने दगाबाजी केली. जे गोंदियात झाले ते राज्यभर सुरु आहे. “सहन होत नाही आणि सांगताही येत नाही” अशी कॉन्ग्रेसची अवस्था आहे. कॉन्ग्रेस ही रस्त्यावरची पार्टी आहे. “लाठी गोली खायेंगे , इंदिरा को लायेंगे’ म्हणत एकेकाळी लोक रस्त्यावर उतरायचे. आज रस्त्यावरची लढाई कॉन्ग्रेस विसरली आहे. त्यामुळे तिला बुरे दिन आले आहेत. उदयपूरच्या शिबिरात कॉन्ग्रेसने दोन ऑक्टोबरपासून देशभर पदयात्रा काढायचे ठरवले तर खरे. पण राहुलबाबा इतके दिवस देशात राहतील?
( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
604 Total Likes and Views