महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे आज पुण्याच्या सभेत कोणाला निशाणा करतात याची लोकांना उत्सुकता होती. त्यांनी आपले भाऊ शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले. त्यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या ज्या खासदाराने विरोध केला आहे त्याला अनुल्लेखाने टाळले. उद्धव ठाकरे यांना मात्र टोले हाणले. भाजपशी त्यांचे बिनसलेले दिसते. अयोध्या दौरा हुकला त्यामागे त्यांनी ‘सापळ्या’चा उल्लेख केला. पण तो सापळा कोणी टाकला याबाबत स्पष्ट बोलण्याचे टाळले. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशा हवेत भाजपला उत्तर प्रदेशी मतदारांना दुखवायचे नाही. त्यामुळे शिवसेनेविरोधातील ह्या युद्धात भाजपने राज यांना एकटे सोडले असे दिसते.
भाजपवर हल्ला करायचा मोह त्यांनी टाळला. त्यामुळे मोदींना विनंती आणि उद्धव यांना टोले असे चित्र पाहायला मिळाले. राज म्हणाले, उद्धव यांच्यावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे काय? भूमिकाच घ्यायची नाही. ‘संभाजीनगर नामांतर झाले काय किंवा नाही झाले काय, मी बोलतोय ना’ असे उद्धव म्हणतात. अरे, तू कोण आहेस? वल्लभभाई पटेल आहेस की महात्मा गांधी? त्यांना तो प्रश्न जिवंत ठेवायचा आहे. मतं मिळवायची आहेत. प्रश्न सुटला तर मतं कशावर मागणार? औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावा आणि यांचं राजकारण एकदा मोडीत काढून टाका अशी विनंती मी पंतप्रधान मोदींकडे करतो, असंदेखील राज म्हणाले. समान नागरी कायदा करा, लोकसंख्या नियंत्रण कायदा करा अशाही विनंत्या त्यांनी मोदींना केल्या.
येत्या पाच जून रोजी राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. त्यांनी तो दौरा अचानक स्थगित केलं. त्याची खूप चर्चा होती. त्याचा त्यांनी खुलासा केला. पायाच्या दुखण्यावरही बोलले. येत्या एक जून रोजी आपल्यावर ‘हिप बोन’ची शस्त्रक्रिया आहे असे त्यांनी सांगितले. राज म्हणाले, माझा अयोध्या दौरा अनेकांना खुपला. अनेकांनी माझ्या अयोध्या दौऱ्याविरोधात रसद पोहोचवली. याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. माझ्या उत्तर भारतीयांविरोधातील भाषणांचा पुन्हा विषय काढा, असं सांगितलं गेलं. त्यातूनच मग माफी मागा, वगैरे अशा मागण्या झाल्या. मी हट्टाने तिकडे जायचं ठरवलं असतं तर माझ्यासोबत पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, अनेक हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं तर आपली पोरं तर गेली असती त्यांच्या अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला सडवलं गेलं असतं… मी आपली पोरं हकनाक घालवणार नाही अशी…मला सापळ्यात अडकायचे नव्हते. एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, हे शक्य आहे का… याला अनेक पापुद्रे आहेत. मला सगळं सांगणं शक्य नाही.. दौरा रद्द झाल्याने अनेक जण माझ्यावर टीका करतायत… मी शिव्या खायला तयार आहे.
राजकारणासाठी हिंदू मुस्लिमांच्या विरोधात बोलण्यासाठी एमआयएमला मोठं केलं. आपण एक राक्षस वाढवतोय, हे लक्षात आलं नाही. एमआयएमचा खासदार निवडून आला. शिवसेनेचा तिकडचा खासदार पडला आणि एमआयएमचा खासदार निवडून आला, अशी टीका राज ठाकरेंनी केली. औरंगजेब हा शरद पवार यांना सुफी संत वाटतो का? अफजलखान हा त्याचं राज्य वाढवायला आला होता असं म्हणतात. तो शिवाजी महाराजांना मारायला आला होता, असे राज ठाकरे म्हणाले.
177 Total Likes and Views