३५ वर्षापूर्वी दूरदर्शनवर ‘रामायण’ नावाची मालिका प्रचंड गाजली होती. गेल्या वर्षी करोनाकाळात ही मालिका पुन्हा दाखवण्यात आली तेव्हाही लोक उदबत्ती लावून टीव्हीपुढे बसायचे. ‘रामायण’मध्ये रामाची भूमिका होती अरुण गोविल याची तर सीता बनली होती दीपिका चिखलिया. राम, सीता त्यांच्या काळात कसे असतील याचे सुंदर व पवित्र दर्शन ह्या दोघांनी घडवले होते. त्या अवतारात दीपिका एवढी अडकली, की पुढे दुसऱ्या रोलमध्ये लोकांनी तिला स्वीकारले नाही. टीव्हीतल्या ह्या सीतेने रोजच्या आयुष्यातही तसेच जगावे अशी लोकांची अपेक्षा होती आणि आजही आहे. प्रत्येक कलाकाराकडे ह्याच चष्म्यातून लोक पाहतात. आणि म्हणून दीपिकाने आखूड स्कर्टमधला आपला फोटो सोशल मिडीयावर टाकला तेव्हा चाहते भडकले. त्यांना हा फोटो आवडला नाही. वेगवेगळ्या कमेंट आल्या. प्रचंड ट्रोल झाली. एकानं लिहिलं, ‘हा तुमचा कोणता अवतार आहे? दुसरा म्हणाला, आम्ही तुम्हाला देवी मानले आहे. पण तुमच्या हातात त्या ग्लासमध्ये कुठले ड्रिंक आहे?
चाहत्यांचा राग समजू शकतो. पण तुम्हाला सांगतो. तुमची ‘सीता’ त्यातली नाही. दीपिका आज ५७ वर्षांची आहे. दोन मुलींची आई आहे. मीडियाशी बोलताना दीपिका म्हणाली, लोक एवढे भडकतील असे वाटले नव्हते. चाहत्यांच्या भावना दुखावल्या. मला वाईट वाटते. म्हणूनच मी लगेच ते फोटो काढून टाकले. मुळात ते आम्हा जुन्या मैत्रिणींचे गेट टूगेदर होते. शाळेच्या ड्रेसमध्ये यायचे होते. माझ्या हातात ग्लास दिसतो. त्यात दारू नव्हती. मी दारू पीत नाही.
दीपिकाच्या ह्या खुलाश्याने लोकांच्या शंका दूर होतील अशी आशा करू या. आणि एक सांगू का? तिला आता ‘दीपिका’ म्हणून जगू द्या. तिलाही खासगी आयुष्य आहे.
185 Total Likes and Views