लाच घेतो म्हणून कोण्या मंत्र्याला हाकलले असे तुम्ही आपल्या भारतात कुठे ऐकले का? नाही ना. पण आता असे घडले आहे. आणि तेही पंजाबमध्ये. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या राज्यात. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतलेल्या एका धडाकेबाज निर्णयाची सध्या जोरदार चर्चा आहे. लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने आरोग्य मंत्री विजय सिंगला यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश भगवंत मान यांनी दिले आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हाही नोंदला जाणार आहे.
विजय सिंगला यांच्यावर ठेक्यासाठी अधिकाऱ्यांकडून एक टक्का कमिशनची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रार येताच चौकशी करून कारवाई करण्यात आली. सिंगला हे प्रसिद्ध डेंटल सर्जन आहेत. मान म्हणाले, आमच्या मंत्रिमंडळात एक टक्कादेखील भ्रष्टाचाराला थारा नाही. जनतेने आम आदमी पक्षाचे सरकारला मोठ्या अपेक्षेने साथ दिली. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत.
भ्रष्टाचाराच्या आरोपात मंत्रीपद गमवावे लागण्याचे देशातले हे दुसरे उदाहरण आहे. पहिली केस २०१५ मध्ये दिल्लीत झाली होती. आम आदमी पक्षाचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एका मंत्र्याला हाकलले होते. दिल्ली, पंजाबमध्ये जे घडले ते महाराष्ट्रात का घडू नये? इथे दोन मंत्री तुरुंगात आहेत. एकाने तर राजीनामा दिला. पण दुसऱ्याला बिनखात्याचे मंत्री म्हणून ठेवले आहे.
506 Total Likes and Views