राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजी राजे यांना शिवसेना उमेदवारी देणार की नाही यावर तर्क-वितर्क लढवले जात असताना अखेर कोल्हापूरचे अनेक वर्षे जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे नाव शिवसेनेने पक्क केलं. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ही माहिती देताना ‘मावळे असल्यानेच राजे असतात’ असं सांगत अप्रत्यक्षपणे संभाजीराजेंना टोलाही लगावला. दुसऱ्या जागेसाठी आपलं नावही ठरलं असल्याची माहितीही त्यांनी दिली,
संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालं असून आदर ठेवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “नक्कीच सन्मान ठेवत आहोत. त्यांच्या कुटुंबाविषयी, गादीविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कायम आदर आहे. त्यासाठीच तर आम्ही सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार व्हा असा प्रस्ताव ठेवला. त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, अपक्ष लढायचं आहे आणि त्यासाठी ४२ मतांची गरज आहे. जर कोणाकडे ४२ मतं असतील तर तो राज्यसभेवर निवडून येऊ शकतो. संभाजीराजे अपक्ष लढणार असतील तर त्यांच्याकडे मतांची काय योजना आहे माहिती नाही. पण प्रस्ताव आला तेव्हा गादी, छत्रपतींच्या वंशजाचा सन्मान लक्षात घेता शिवसेना उमेदवारी देईल, पक्षात प्रवेश करा असं सांगितलं होतं”. यापूर्वीसुद्धा वरिष्ठ शाहू महाराजांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शाहू महाराजसुद्धा पक्षाच्या तिकीटावर लोकसभा लढले आहेत. मालोजीराव भोसले हेदेखील पक्षाच्या तिकीटावर उमेदवारी घेऊन लढले आहेत. स्वत: संभाजीराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर कोल्हापुरातून निवडणूक लढले आहेत. त्यामुळे राजांना, महाराजांना पक्षाचं वावडं असू नये. देशभरातील अनेक राजघराण्याचे लोक आजही अनेक पक्षांच्या तिकीटावर राज्यसभेत, लोकसभेत आले आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.
आता संभाजी राजे काय भूमिका घेतात त्याकडे राज्याचे लक्ष राहील. भाजप त्यांना उभे करते का? भाजपकडे २२ शिल्लक मतं आहेत. जास्तीची २० मतं जमवण्याचे आव्हान संभाजी राजे यांच्यापुढे आहे. सहाव्या जागेची ही लढाई राजे अखेरपर्यंत लढतात की हत्यार टाकतात ते पहायचे.
170 Total Likes and Views