कॉन्ग्रेसची अवस्था एक्सपायरी डेट गेलेल्या औषधासारखी झाली आहे. एक एक नेता कॉन्ग्रेस सोडतो आहे. ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, पी. सी. चाको मागेच गेले. गेल्या आठवड्यात पंजाबचे सुनील जाखड, गुजरातचे हार्दिक पटेल गेले. आज ज्येष्ठ नेते आणि मोठे वकील कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली. त्यांनी समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. राज्यसभेच्या ११ जागांसाठी उत्तर प्रदेशात निवडणूक आहे. ह्या पैकी किमान तीन जागा सपा जिंकेल. त्यात एक जागा सपाने सिब्बल यांना दिली. सपाचे दबंग नेते आझम खान जेलमध्ये होते. त्यांना जामिनावर बाहेर आणण्यासाठी सिब्बल यांनी आपले वकिली डोके पणाला लावले होते. त्याची ही बक्षिसी असेल.
राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरताना कपिल सिब्बल यांच्यासोबत सपाचे प्रमुख अखिलेश यादव देखील होते. यावेळी सिब्बल यांनी सांगितलं की, त्यांनी १६ मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सिब्बल यांच्या ह्या निर्णयाने कॉन्ग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गेल्याच आठवड्यात उदयपुरला कॉन्ग्रेसचे चिन्तन शिबीर झाले. आठवडाही होत नाही तो कॉंग्रेसवर ‘चिंता शिबीर’ घ्यायची पाळी आली आहे.
जी-२३ नावाने २३ असंतुष्ट नेत्यांनी स्थापन केलेल्या गटात कपिल सिब्बल हे एक होते. कॉन्ग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा, निवडणुका व्हाव्या अशी ह्या गटाची मागणी होती. त्यावर तात्काळ हालचाल होत नसल्याने हे नेते नाराज आहेत. त्यामुळे आणखी राजीनामे येण्याची शक्यता आहे. सिब्बल यांना कॉन्ग्रेसने खूप काही दिले. तीन वेळा खासदारकी दिली. मनमोहन सरकारमध्ये ते कायदे मंत्री होते. कालपर्यंत राज्यसभा खासदार होते. आता त्यांना राज्यसभेवर घेणे शक्य नव्हते. कारण त्यांना काही देण्याची आता कॉन्ग्रेसची ताकद राहिली नाही. राजस्थानमधून पाठवता आले असते. पण तिथे खूप मारामाऱ्या आहेत. निवडून यायचा भरवसा नाही. तरीही एक प्रश्न उरतोच. कॉन्ग्रेससोबत तब्बल ३० वर्षे राहिलेल्या ह्या नेत्याला आज कॉन्ग्रेस सोडाविसी का वाटावी? आणि तेही ह्या वयात? सिब्बल ७३ वर्षांचे आहेत.
180 Total Likes and Views