आपल्या देशाला मंदिर-मशिदीचे वाद नवे नाहीत. रामजन्मभूमीचा वाद ५०० वर्षे चालला. काशी आणि मथुरा मंदिरांचा वाद सध्या पेटला आहे. त्यात भर म्हणून की काय, आता रामाच्या प्राणप्रिय भक्ताचा म्हणजे हनुमानाच्या जन्मस्थळाचा नवा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या महंतांनी अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म नाशिकच्या अंजेरीत पर्वतावर झाला असल्याचा दावा केला होता. मात्र हनुमानाचा जन्म तिथे नव्हे तर कर्नाटकमधील किष्किंधामध्ये झाला असल्याचा दावा तिथले मठाधिपती गोविन्दानंद स्वामी सरस्वती यांनी केला आहे. आपला दावा सांगण्यासाठी ह्या मठाधिपतीने सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुक्काम मांडला आहे. आपल्याकडे रामायणातले पुरावे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. पण कोणीही त्यांना भेटायला गेले नाही. त्यामुळे त्यांनी तिथे ठाण मांडून आंदोलन सुरु केले आहे. नाशिकचे महंत मात्र त्यांना मानायला तयार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे, की ग्रंथांमध्ये सारे लिहिले आहे. कोर्टात जायची गरज नाही.
हनुमानाच्या जन्मभूमीवरून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये वाद जुना आहे. दोन्ही राज्यांनी हनुमानाचा जन्म आपल्या राज्यात झाला असल्याचा दावा केला होता. कर्नाटकमधील हंपीजवळील अंजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला असल्याचे कर्नाटकातील महंताचे म्हणणे आहे, तर तिरुमालाच्या सात टेकड्यामधील म्हणजे अंजनाद्रीमध्ये हनुमानाचा जन्म झाला असल्याचे आंध्रातील लोकांचा दावा आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानाने तीन वर्षापूर्वी या बाबत एक समितीही नेमली होती. ह्या समितीनेही पुराणातले तसेच शास्त्रीय पुरावे देत अंजनाद्रीच्या बाजूने कौल दिला होता. कोणाचे खरे मानायचे? हनुमानालाच विचरावे लागेल… बाबा, सांग एकदा. तू कुठे जन्मला?
310 Total Likes and Views