सुटला शाहरुख खानचा मुलगा

Entertainment
Spread the love

   सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला  एनसीबीने म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने  मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, चौकशीत ६ आरोपींविरोधात पुरावे मिळाले नाहीत.  त्यात आर्यन एक आहे.  १४ जणांविरुद्ध  एनसीबीने कोर्टात  आरोपपत्र  आज दाखल केले.  गेल्या वर्षी हा मामला चांगला ६ महीने गाजला होता. एनसीबीचे   डायरेक्टर समीर वानखेडे वादग्रस्त  बनल्याने  ह्या मामल्याची चौकशी  विशेष  पथकाकडे देण्यात आली होती. ह्या पथकाने हे प्रकरण धसास लावले.

          आर्यन खानला कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी प्रमुख आरोपी करण्यात आले होते. त्यासंदर्भात आर्यन खान जवळपास महिनाभर तुरुंगात देखील होता. मात्र, आता आर्यन खानला क्लीनचिट दिल्यामुळे एनसीबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. यासंदर्भात सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट करण्यात आलं आहे. त्यामधून या संपूर्ण प्रकरणावरून निशाणा साधण्यात आला आहे.  समीर वानखेडे आणि प्रायव्हेट आर्मीवर कारवाई करणार काय? असा सवाल  विचारण्यात आला आहे.

            गेल्या वर्षी  गांधी जयंतीला घडलेले हे प्रकरण आहे. मुंबईच्या समुद्रातून गोव्याला निघालेल्या  जहाजावर ड्रग पार्टी होणार असल्याची  माहिती एनसिबीला मिळाली.  त्यावरून धाड टाकण्यात आली. एकूण २० लोकांना  अटक झाली होती.  तपासानंतर आता १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नव्हतं. चौकशीअंती ६ जणांविरोधात पुरावे मिळाले नसल्याचं एनसीबीकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आर्यन खान आणि इतर पाच जणांची नावं आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत. व्हॉटस  अप संवादावरून  सबळ पुरावे  गोळा करता आले नाहीत. तसेच  ड्रगच्या आंतरराष्ट्रीय  व्यापारात  आर्यनचा काही रोल आहे असेही आढळले नाही असे एनसिबी म्हणते.  मग कुठलाही पुरावा नसताना आर्यनला  एनसिबीने का उचलले? तो शाहरुखचा मुलगा आहे म्हणून उचलले का? हा प्रश्न उपस्थित होतो. 

       २४ वर्षे वयाचा आर्यन तब्बल २८ दिवस  तुरुंगात होता. पुढे तब्बल सात महिन्यानंतर  आता त्याला क्लीन चिट मिळाली. म्हणजे संपूर्ण  ८ महिने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जो मनस्ताप झाला त्याला जबाबदार कोण?  शाहरुखकडून पैसे उकळण्यासाठी  आर्यनला गोवण्यात आले होते काय? याचीही चौकशी झाली पाहिजे.  नाहीतर आज आर्यन झाला. उद्या आणखी कुण्या  स्टारचा मुलगा  टार्गेट बनेल.  मादक पदार्थांचे व्यसन  बलवत चालले आहे.  मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ड्रग सहज उपलब्ध होते असे बोलले जाते.  पुडीवाले  पकडले जातात. पण त्यांना पुडी पुरवतात त्या मुळाशी एनसीबी यंत्रणा केव्हा जाणार?

 228 Total Likes and Views

0 Comments

No Comment.