संभाजी राजे लढणार नाहीत?

Editorial
Spread the love

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे जुने लोक सांगून गेले, तेच खरे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे छत्रपती यांना अपक्ष लढायचे होते. त्यासाठी त्यांनी सर्व पक्षांना पाठिंबाही मागितला होता. पण सत्ताधारी  शिवसेनेने अट  घातली. शिवसेनेत येत असाल तर तिकीट देतो असे उद्धव ठाकरे म्हणाले.  राजेंना कोण्या पक्षाचा शिक्का नको आहे.  त्यामुळे शिवसेनेचे दरवाजे बंद झाले. भाजपही काही बोलायला तयार नाही. कोणीही पाठिंबा न दिल्याने संभाजीराजे यांच्यावर न लढताच माघार घेण्याची नामुष्की ओढवू शकते असे बाहेर बोलले जात आहे. उमेदवारी अर्ज भरायची अखेरची मुदत ३१ मे आहे. पण येत्या ४ दिवसात काही  वेगळे घडण्याची शक्यता नाही. उद्या  म्हणजे शुक्रवारी पत्र परिषद घेऊन  संभाजी राजे  आपला निर्णय जाहीर करतील.

              राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना  १० आमदारांचे अनुमोदन सोबत जोडावे लागते. संभाजीराजे छत्रपती यांना तेही जमवता आलेले नाही. अर्ज भरताना ही परिस्थिती असेल तर पुढे काय होईल  ते आजच दिसते. त्यामुळे निवडणुकीतूनच  माघार घेण्याचे राजेंनी  निश्चित केल्याची चर्चा आहे.   शिवसेनेचे तिकीट न घेण्याचे  राजेंचे काही कारण असेल. पण अपक्ष लढण्याचा त्यांनी हट्ट का धरला हे कळायला मार्ग नाही. राजघराण्यातील अनेकांनी  राजकीय पक्षांची तिकिटे घेतली आहेत.  उदाहरण द्यायचे झाले तर ज्योतिरादित्य शिंदे  हे राजघराण्यातले आहेत.  कॉन्ग्रेस सोडून ते भाजपमध्ये आले आणि आज केंद्रात  मंत्री आहेत. मग राजेंनी कुठे मार खाल्ला? भावनेच्या भरात निवडणूक जिंकता येत नसते.  राष्ट्रपतींच्या कोट्यात गेल्या वेळी भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. भाजपला त्यांचा उपयोग झाला नाही का?  झाला असेल व नसेल. तर मग यावेळी  बाजूला करण्याचे कारण काय? कारण मोदींनी मनात आणले तर आजही राजे बाजी पालटवू शकतात.  विजयासाठी ४२ मतांचा कोटा आहे. भाजपकडे   २७ शिल्लक मते आहेत. ह्या निवडणुकीत  खुल्या पद्धतीने मतदान आहे. म्हणजे  मत अधिकृत प्रतिनिधीला दाखवावे लागते.  पण २९ अपक्ष आमदार आहेत.  त्यातील काहींना खेचत येईल. पण तशी कुणाची इच्छा आहे. अर्ज भरायला चार दिवस बाकी असताना भाजप स्गांत आहे. याचा अर्थ काय? हा सापळा कोणाचा?



            १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक  होत आहे. सध्याच्या संख्याबळानुसार, दोन जागांवर भाजप,  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रत्येकी एका जागेवर सहजपणे निवडून येऊ शकतात. सहावी जागा शिवसेनेच्या कोट्यातील असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्यापुढे पक्षप्रवेशाची अट ठेवली होती. मात्र, संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढण्यावर ठाम होते. त्यामुळे शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे  जिल्हा प्रमुख  नेते संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.  त्यामुळे शिवसेनेचे  दोन संजय यावेळी राज्यसभेत दिसण्याची शक्यता आहे.  दोन्ही संजय यांनी आज  आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.  राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार, कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात प्रामुख्याने उपस्थित होते.

 264 Total Likes and Views

0 Comments

No Comment.