विलासराव.. सोलापूर-लातूर प्रवासात आठवले तेवढे…!

Hi Special
Spread the love

आज 26 मे. विलासराव देशमुख यांचा आज 77 वा जन्मदिन. ते आज असते तर त्यांच्या वाढदिवसाचा हा कार्यक्रम केवळ लातुरातच नव्हे, तर महाराष्ट्रात गावागावात साजरा झाला असता. पक्षाच्या पलिकडे जावून सामान्य माणसाने स्वीकारलेले महाराष्ट्राचे हे नेतृत्व होते. त्यांचा चेहरा, त्यांचे वागणे-बोलणे हसणे, कोणाचाही मोबाईलवर (9821125000) फोन आला तर एका क्षणात उत्तर देणे… सगळेच काही विलक्षण होते. माझ्या पिढीला तर असे कधीच वाटले नाही की त्यांची जयंती साजरी करावी लागेल. त्यांचा वाढदिवस साजरा व्हावा, त्यांनी शंभर वर्षे पूर्ण करावीत, अशी मनोमन इच्छा बाळगणारे लाखो चाहते होते. पण नियतीच्या मनात काय असेल याचा पत्ता कोणालाच लागत नाही… ही तर निसर्गाची किमया आहे. जे जन्माला येणार ते कधीतरी जाणारच हे ठरलेलेच आहे. पण अकाली जाणारे इतके चटका लावून जाणाऱ्यात विलासराव, आर. आर. आबा, पतंगराव, गोपीनाथ मुंडे, केंद्रीय नेतृत्त्वात माधवराव शिंदे, राजेश पायलट. त्यात विलासराव आणखी वेगळे व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाशी मैत्री आयुष्यभर जपून ठेवावी, अशी होती. महाराष्ट्राच्या घराघरात दूरदर्शनवर विलासराव जेव्हा दिसायचे. तेव्हा पक्षाच्या पलिकडे जावून सगळ्याच घरातील भावना होती की हा फार भला माणूस आहे. राजकारणाशी ज्यांना काही देणेघेणे नाही, त्यांनाही हा आपला माणूस वाटायचा आणि यात कृत्रिमपणा कुठेही नव्हता.
आज विलासराव असे डोळ्यासमोर दिसतात. 1980च्या विधानसभा निवडणुकीत लातूरमधून ते विजयी होऊन सभागृहात आले तेव्हा एखादा महानायक प्रवेश करतो असे जाणवले. त्यांच्या पहिल्याच भाषणाने सभागृह अवाक होऊन गेले होते. व्यक्तिमत्व, वक्‍तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व या सगळ्या विलोभनीय गुणांचे अतुलनीय दर्शन विलासरावांमध्ये होत होते. 1980च्या मंत्रीमंडळात अंतुलेसाहेबांनी त्यांना सामावून घेतले नाही. तेव्हा उस्मानाबाद जिल्ह्यात थोडी नाराजी होती, विलासरावांनी ती कधीही व्यक्त केली नाही, उलट 7 ऑक्‍टोबर 1981 ला मुख्यमंत्री अंतुले यांना लातूरला आमंत्रित करून त्यांचा भव्य सत्कार विलासरावांनी केला आणि हळूच लातूर जिल्हा मागितला. तेवढ्याच हळूच आवाजात अंतुलेसाहेबांनी जाहीर करून टाकले “दिला”… काय दिलं कुणालाच कळलं नाही. पण भाषणात अंतुलेसाहेब म्हणाले, तुम्हाला लातूर जिल्हा दिला. मंत्रीमंडळात राहून जिल्हा मिळवणे सोप्पे होते. मंत्रिमंडळात नसताना विलासरावांनी लातूर जिल्ह्याची निर्मिती केली. पण हा नेता सदैव कृतज्ञ होता. लातूर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर बघता बघता 25 वर्षे निघून गेली. जालना जिल्हा नंतर झाला. सिंधूदुर्गही झाला. पण या 25 वर्षात लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या अग्रेसर जिल्ह्यात गणला जावू लागला. हे कर्तृृत्व विलासरावांचे होते. आज उड्डाणपूल विषय फार सोपा आहे. त्या काळात ही संकल्पना विलासरावांनी राबविली. निधी खेचून आणला. पण कृतज्ञता किती पराकोटीची होती. 2007 साली. लातूर जिल्हा निर्मितीला 25 वर्षे झाली. तेव्हा विलासराव मुख्यमंत्री होते. काय योगायोग पहा. तेव्हा बॅ. अंतुले सत्तेत नव्हते. पण विलासरावांची मानसिकता अशी की मावळत्या सूर्यालाही नमस्कार करायचा. अंतुल साहेबांनी त्यांना मंत्रीमंडळात घेतले नाही. हे त्यांनी कधीच मनात ठेवले नाही. उलट जिल्हा दिला याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता जिल्हा रौप्य महोत्सव उद्‌घाटन समारंभाला अंतुलेसाहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे त्यांनी ठरविले. मला ते म्हणाले, ही जबाबदारी तुमच्यावर सोपवतो, तुम्ही घेऊन या. दोघाचे बोलणे झाले. उद्‌घाटनाला बॅ. अंतुले आले. 50 हजारांचा जनसुमदाय होता. भाषणात अंतुले म्हणाले, “विलासराव, 25 वर्षांपूर्वी मी तुम्हाला मंत्रीमंडळात घेतले नाही. याचा राग तुम्ही कधी ठेवला नाहीत. आणि आज जिल्ह्याला 25 वर्षे झाली तेव्हा तुम्हाला मी जिलहा दिला म्हणून मी आज सत्तेत कुठेच नसताना आपण मला बोलावले… विलासरावांकडे बघून ते म्हणाले… विलासराव राजकारणात कुणी 25 दिवस माणसाला लक्षात ठेवत नाही. तुम्ही 25 वर्षांनी माझी आठवण ठेवली. मुख्यमंत्र्याला एक जिल्हा देणे फार सोपी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून निघालेला शब्द कायदाच असतो. आता तुम्ही मुख्यमंत्री आहात. मी जिल्हा दिला मेहेरबानी केली नाही. 25 वर्षांनी कृतज्ञतेने तुम्ही मला बोलाविता आणि महाराष्टात अंतुलेंची आठवण लातूरचे मुख्यमंत्री लक्षात ठेवतात. मी हे कधीही विसरु शकणार नाही. अंतुलेंचे डोळे डबडबले होते. विलासराव, दिलीपराव गदगद झाले होते. त्यावेळचा महाराष्ट्र आणि त्यावेळचे नेते असे एकमेकांबद्दल कृतज्ञ होते. आज हे सगळे आठवते आहे. वसंतदादा आठवतात. शंकरराव चव्हाण आठवतात. शरद पवार साहेब तर समोरच आहेत.
दोन वर्षानंतर विलासराव राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून आले. आणि दादांनी तर आणखी एक चमत्कार करून टाकला. दादा म्हणजे वसंतदादा. विलासराव राज्यमंत्री त्यांच्याकडे गृहखाते. दादांनी त्यांना सांगलीचे पालकमंत्री करून टाकले. सांगली दादांचा जिल्हा. विश्‍वास असल्याशिवाय कोणताही मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री राज्यमंत्र्याला नेमणार नाही. अंतुले यांना, वसंतदादा यांना, जवाहरलाल दर्डा यांना विलासरावांमध्ये उद्याचा मुख्यमंत्री दिसायचा. 1985ला निलंगेकर यांना विलासरावांना मंत्रीमंडळात घेतले नाही. तेव्हा आमचे बाबूजी – म्हणजे जवाहरलाल दर्डा विलासरावांना म्हणाले की “ऐसे दिन राजनितीमे आते है, लेकीन याद रखो आपका एक दिन पक्का है. आप चीफ मिनिस्टर बन जाओगे’.
एका विधानसभेत गम्मत झाली. दादा मुख्यमंत्री, गृहखाते त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते दत्ता पाटील यांनी एका प्रश्‍नावर दादांना कोंडीत पकडले. दादांनी उत्तर द्यायची जबाबदारी विलासरावांवर टाकली होती. प्रश्‍न बघितलाही नव्हता. काहीच तयारी नव्हती. दत्ता पाटील आक्रमक होऊन बोलत होते, तेव्हा दादांनी उठून सभागृहात चक्क सांगून टाकले की मी काहीही तयारी करुन आलेलो नाही उत्तर विलासराव देणार आहेत.’ विलासराव विधान परिषदेत अडकले होते. ते झटकन खालच्या सभागृहात आले, दादांच्या मागे बसले दादांना म्हणाले, मी आलोय. दादांनी त्यांच्याकडे पाहिले, ते हसले. त्यावळी दादांच्या हातात चालण्यासाठी काठी असायची. विधानसभा अध्यक्षांनी व सभापतींनी त्यांना काठी आणायला विशेष बाब म्हणून परवानगी दिली होती. बसल्या जागेवरूनच दादांनी हातातील काठी उचलून दत्ता पाटील यांच्याकडे बंदुकीसारखी धरली. अरे दत्ता आता काय विचारचे विचार. आता विलासराव आले आहेत. विलासरावांना आधीची चर्चा माहिती नव्हती. त्यांनी प्रश्‍न वाचला. आणि त्यानंतर जे उत्तर दिले, दादा मागे वळून विलासरावांच्या चेहऱ्याकडे पाहताहेत हे मला अजून दिसते. सभागृहात बाके वाजवली गेली. दत्ता पाटील भारावून गेले अन्‌ गप्प बसले.
1986 साली शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रीमंडळाची सगळी यादी बनविण्याचे अधिकार जणू विलासरावांनाच दिले होते. त्यावेळी आम्ही मित्र त्यांना मिनी चीफ मिनिस्टर म्हणत असू. सहा खाती त्यावेळी विलासरावांकडे होती. पण विलासराव यांच्या हातात उत्तर देताना कधी कागद दिसला नाही. फाईल कधी हातात दिसली नाही. उत्तर देताना ते कधी अडखळले नाहीत. “सभागृहाच्या पटलावर नंतर उत्तर ठेवतो, असे सांगण्याची त्यांच्यावर कधी वेळच आली नाही. हसत खेळत, चिमटे काढत उत्तर देणारा असा नेता पुन्हा होणे नाही. विलासरावांच्या मैत्रीचा आमचा एक ग्रुप होता. त्यात मी उल्हासदादा, नासिकचे छाजेड, सुधाकर गंगणे, राजकारणाशी संबंधित नसलेले गायक सुरेश वाडकर. एकदा चर्चेमध्ये असा विषय झाला की तुम्ही थोडे गंभीर व्हा. विलासराव म्हणाले, माझ्याकडे येणारा जो प्रश्‍न घेऊन येतो. तो गंभीर चेहऱ्यानेच येतो. मीच गंभीर चेहरा ठेवला तो म्हणेल हा माझा काय प्रश्‍न सोडवेल.” आज विलासराव किती आणि कसे आठवतील कसं सांगता येईल. त्यांच्या असंख्य भाषणांना त्यांच्यासोबत होतो. महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर त्यांच्योसोबत होतो. त्यांचे एकही भाषण कधी पडले नाही.
1995 साली विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. नंतर ते विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले. त्यांनी तसे करु नये, आम्ही सगळे मित्र त्यांना सांगत होतो. गोपीनाथ मुंडे यांची त्यांची मैत्री अधिक प्रभावी ठरली. त्यांची ती राजकीय चूक ठरली. अर्ध्या मताने ते पराभूत झाले. ते चांगलेच झाले. ते पराभूत झाल्याबद्दल त्यांचे पहिले अभिनंदन मीच केले होते. त्यांना पक्षातून सहा वर्षे दूर केले. तेव्हा नरसिंहराव कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. दिल्लीला ते नरसिंहरावांना भेटायला गेले होते, तेव्हा त्यांच्यासोबत मी होतो. नरसिंहराव विदर्भातील रामटेकमधून निवडून आले होते. तेव्हा त्यांच्या प्रचाराची जबाबदारी जवाहरलाल दर्डा, एन. के. पी. साळवी, किशोर काशीकर यांच्यावर होती. मी बाबूजींसोबत प्रचार सभेत फिरत 15 दिवस होतो. लोकमतचा संपादक होतो. नरसिंहराव यांच्याशी जवळीक होती. म्हणून विलासरावांसोबत दिल्लीला नरसिंहरावांकडे गेलो होतो. काका खांडेकरांना भेटलो. ते त्यांचे ओएसडी होते. त्यांनी लगेच चिठ्ठी पाठवली. तब्बल दोन तास बाहेर बसावे लागले. मलाच कसेतरी वाटायला लागले. विलासराव सारख्या नेत्याला एवढे थांबवणे योग्य नाही, असे मी काकाला जावून सांगितले. विलासरावांनी माझा हात धरला. म्हणाले, बसा… त्यानंतर ते काय म्हणावेत, “भावे, कॉंग्रेस पक्षाने मला भरपूर दिले. मी अपक्ष उभे राहण्याची चूक केली. पुन्हा प्रवेश होण्याकरीता दोन तास बसावे लागणे ही काय फार शिक्षा नाही. पण त्याच विलासरावांनी नरसिंहरावांच्या मृत्यूनंतर कसलाही विचार न करता नरसिंहराव यांच्या अंत्ययात्रेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळच्या राजकारणात नरसिंहराव यांच्याबद्दल आपलेपणा असलेल्यांबद्दल कॉंग्रेस श्रेष्ठी काहीसे वेगळे वागत होते. विलासराव म्हणाले, “काय व्हायचे ते हाईल. नरसिंहरावांनी मला पुन्हा कॉंग्रेस प्रवेश दिला. त्यांच्या अंत्ययात्रेला जाणे महत्त्वाचे आहे.” त्यांनी मला हैदराबादला सोबत नेले.
1999 साली विलासराव मुख्यमंत्री झाले. कॉंग्रेसचे आमदार 69, राष्ट्रवादीचे 72 पण मुख्यमंत्रीपद विलासरावांना देण्यास पवारसाहेबांनी मान्यता दिली. विलासरावांना आठ पक्षांचे सरकार चालवावे लागले. एक विचार मनात येतो. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, तेव्हा विधानसभेत त्यांच्या मागे कॉंग्रेसचे 190चे बहुमत. वसंतराव नाईक यांच्यामागे 67 सालापर्यत 202, 1972 साली 222. शंकररावांच्या वेळेसही तीच परिस्थिती. 1980 साली अंतुलेसाहेबांच्या मागे 167 आमदार. सुधाकरराव नाईकांच्या मागे जवळपास तेवढेच. शरद पवारसाहेबांच्या मागे 1990ला जेमतेम बहुमत होते. ही सर्व सरकारं चालविणे सोपे होते. विलासरावांना आठ पक्षांचे सरकार चालविण्याची कसरत करायची होती. दोरीवरुन चालण्याची कसरत होती. ते चालत असताना हातात जो बांबू होता, तो राष्ट्रवादीचा होता. केवळ स्वभाव, समतोल वागणे या दोन गुणवैशिष्ट्यांवर विलासरावांनी ते सगळे निभावून नेले. जवळपास ते आठ वर्षे मुख्यमंत्री राहिले. त्यांच्याच पक्षातील लोकांनी काड्या केल्या नसत्या तर वसंतराव नाईकांचा विक्रम ते मोडू शकले असते. यशवंतराव ते शरद पवार इथंपर्यंतच्या कॉंग्रेसच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना त्या-त्यावेळचे कॉंग्रेस पंतप्रधान, त्या-त्यावेळचे कॉंग्रेसचे अध्यक्ष, त्या-त्या वेळचे कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे निरीक्षक या सर्वांचा खुल्या दिलाने पाठिंबा होता. विलासराव मुख्यमंत्री झाले, तेव्हा दिल्लीत बाजपेयींचे 24 पक्षांचे सरकार होते. महाराष्ट्रात एकदा प्रभा राव व नंतर गोविंदराव आदिक अध्यक्ष होते. मार्गारेट अल्वा निरीक्षक होत्या. देशाचे पंतप्रधान भाजपचे वाजपेयी होते. प्रदेशाध्यक्ष पूर्णपणे विरोधात. विधानसभेत आठ पक्षांचे सरकार. त्यात शेकापक्षाच्या पाच आमदारांनी विश्‍वास ठरावाला विरोध केला. 13 जून 2002 चा तो दिवस. विधानसभेत विश्‍वास ठराव मांडण्यास सांगण्यात आले. बाहेर वातावरण असे तयार झाले की, विलासरावांचे सरकार पडणार. शे. का. पक्षाचे पाच आमदार तटस्थ राहिले. विलासरावांनी 13 मतांनी विश्‍वास ठराव जिंकला.
1995 ते 99 युतीचे सरकार होते. म्हणजे सेना-भाजपचे. ते 1999 पर्यंत चालले. 1999ला विलासराव मुख्यमंत्री झाले तेव्हा ते राज्य हातात घेताना 34 हजार 692 कोटी रुपयांचे कर्ज सरकारवर होते. कृष्णा खोरे महामंडळाच्या 11 हजार कोटींच्या कामांची देणी होती. व्याजापोटी वर्षाला 5 हजार 596 कोटी रुपये द्यावे लागत होते. या स्थितीत सरकार हातात घेऊन आठ पक्षांना बरोबर घेऊन विलासरावांनी चालविलेली सर्कस, त्यांना झालेला मनस्ताप हे सगळेच काही कल्पनेच्या पलिकडले होते. 1 नोव्हेंबर 1999ला ते पहिल्यांना मुख्यमंत्री झाले. 15 नोव्हेंबरला दिवाळी होती. राज्य कर्मचाऱ्यांनी बोनसची मागणी करुन हरताळाच्या संपाचा इशारा दिला. विलासरावांनी कर्मचाऱ्यांच्या नेत्यांना बोलावले. काय सांगावे, परिस्थिती अशी अशी आहे. कर्णिकसाहेब (कर्मचाऱ्यांचे नेते), मी या खुर्चीतून उठतो तुम्ही इथे बसा आणि बोनस देता येतो का पहा ? आर्थिक स्थिती सुधारली तर तुम्हाला बोनस देतो. आजच्या घडीला मी इथे पगार वाटायला बसलेलो नाही. राज्य चालविताना सरकारची एक बाजू असते, प्रशासनाची एक बाजू असते, विरोधी पक्षाची एक बाजू असते आणि कर्मचारी संघटनेची चौथी बाजू असते. या चौघांनी एकमेकांना समजून घेतले तर अडचणीवर मात करता येते, हे दाखविणारा राज्याचा एकच नेता झाला तो म्हणजे विलासराव. र. ग. कर्णिक आणि श्री. कुलथे यांनी समंजस भूमिका घेतली. सहकार्य केले. कर्मचाऱ्यांची सहकाऱ्यांची भूमिका घेऊन बोनसविना दिवाळी साजरी केली. राज्य सरकार आर्थिक सुस्थितीत आल्यावर याच नेत्यांना बोलावून पत्रकार परिषद घेऊन बोनस जाहीर केला. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. राज्य चालविताना विलासरावांवर जेवढी संकटे आली, एखाद्या डोंगराच्या दरडी धडाधड कोसळाव्यात. तिच स्थिती होती. 25 जुलै 2005चा 17 जिल्ह्यातील महापूर, अडीच लाख हेक्‍टर जमीन पाण्याखाली. मुंबई तुंबलेली. वाहतुकीची कोंडी. लाखो लोक रस्त्यावर. त्या तीन दिवसात विलासराव रात्रभर जागे होते, त्याचा साक्षीदार मी आहे. त्याही स्थितीत दहा किलो गव्हू, दहा किलो तांदूळ, दहा लिटर रॉकेल व एक हजार रुपये रोख याचे वाटप करताना त्यांनी सरकारी यंत्रणेला विश्‍वासात घेऊन हे काम इतके चोखपणे पार पडले की, दिल्लीच्या हिंदूस्तान टाईम्सने ही बातमी मुख्य शिर्षक करुन दिली. त्याच काळात विजेचा तुटवडा होता. एन्‌रॉनची वीज 22 रुपये प्रति युनिट घ्यावी लागणार होती. एन्‌रॉनसाठी देशाचे राष्ट्रपती भवन कंपनीकडे गहाण ठेवले होते. आज हे कोणाला खरे वाटेल का ? एकट्या एन्‌रॉनला दरमहा 95 कोटी रुपये द्यावे लागणार होते. एन्‌रॉनशी पूर्वी झालेला करार मोडीत काढत आहोत, हे सांगण्याचे धारिष्ट्य विलासरावांनी दाखविले. एवढेच नव्हे तर राज्य गेले तरी बेहत्तर पण एन्‌रॉनला वाचविणार नाही, हे विलासरावांनी जाहीरपणे सांगून टाकले.
आणखी एक मोठी आठवण आहे. हैदराबाद येथे दक्षिणेतील सहा राज्यातील मुख्यमंत्र्यांची परिषद होती. चंद्राबाबू होते, जयललिता होत्या. अच्युत मेनन होते. महाराष्ट्रातर्फे विलासराव होते. व्यंकय्या नायडू ग्रामीण विकास मंत्री होते. सरकारी बॅंकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेले थकीत कर्ज कसे वसूल करायचे हा परिषदेचा एक विषय होता. सगळ्या मुख्यमंत्र्यांनी थकीत कर्जावर झोड उठवली. विलासरावांसोबत मी त्या परिषदेला होतो. शेवटचे भाषण विलासरावांचे झाले. ते इतक्‍या अस्खलीत इंग्रजीत बोलू शकतील, याची मला तोपर्यंत कल्पना नव्हती. त्यांनी ताड-ताड भाषणात असे काही सुनावले की, व्यंकय्या नायडूंना प्रश्‍न विचारला की, देशातील सात बड्या भांडवलदारांनी 48 हजार कोटींचे कर्ज बुडवले आहे, त्यांचे काय करता ते आधी या परिषदेत आम्हाला सांगा आणि आमच्या गरीब शेतकऱ्यांना दुष्काळ आणि महापुराने कर्ज थकविले तर त्या वसुलीकरिता मुख्यमंत्र्यांची परिषद बोलाविता. विलासरावांच्या भाषणाने परिषदेचा सारा नूरच पालटला. पहिल्या वर्षात मी शेतकऱ्यांसाठी 1300 कोटी रुपये कर्ज वाटप केलेला मुख्यमंत्री आहे. त्या परिषदेत सगळे मुख्यमंत्री एका बाजूला आणि सगळ्या पत्रकारांचा गराडा विलासरावांना.
कितू सांगू, किती लिहू आणि किती बोलू… मुंबई विद्यापीठाच्या 150 वर्षाच्या इतिहासात दलित समाजाच्या विद्वानास विद्यापीठाचा कुलगुरु म्हणून विलासरावांनीच नेमणूक केली, ते होते भालचंद्र मुणगेकर. राष्ट्रपती अब्दुल कलाम, अमेरिकेचे राष्ट्रपती क्‍लिंटन, रशियाचे राष्ट्रपती पुतीन, सनईवादक पद्मविभूषण बिस्मिल्ला खॉं. पद्मभूषण पंडीत जसराज, महाराष्ट्र भूषण रतन टाटा, क्रिकेटचा बादशहा सुनिल गावस्कर, सचिन तेंडूलकर, अभिनेते दिलीपकुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, संगणकाचा राजा बिल गेटस्‌, महान शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिन्स अशा अनेक दिग्गजांचे स्वागत करण्याची संधी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाली. दुर्दैवाने मुंबईवर झालेल्या हल्ल्यामुळे विलासरावांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. पण ते केंद्रात मंत्री म्हणून गेले. तेथेही चमत्कारच घडला. लोकसभा किंवा राज्यसभा याचे ते सदस्य नव्हते. प्रतिभाताई पाटील यांनीच त्यांना शपथ दिली. प्रतिभाताई राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला उभ्या होत्या, तेव्हा सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना आदेश दिला होता, की महाराष्ट्राच्या भगिनीला मत द्यायचे. भाजपचे उमेदवार भैरौसिंह शेखावत यांना मत द्यायचे नाही. हे ठरले तेव्हा मातोश्रीवर बाळासाहेबांसोबत विलासराव बसले होते. याचाही मी साक्षीदार आहे. महाराष्ट्रातील आजच्या तीनचाकी सरकारची सुरवात कॉंग्रेसच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेने मतदान करायचा निर्णय झाला, तेव्हा असेच एकप्रकारे वाटत आहे. ज्या प्रतिभाताईंनी विलासरावांना केंद्रीय मंत्रीपदाची शपथ दिली. पण विलासराव खासदार नव्हते. आमदार होते. नागपूरच्या अधिवेशनात ते आले. त्यांनी भाषण केले. सभागृहाने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला. असे पूर्वी कधी घडले नव्हते. खासदार नसताना दिल्लीत मंत्री, विधानसभेत आमदार आणि अभिनंदनाचा ठराव. तसा पवारसाहेबांना (12 डिसेंबर 1990) 50 वर्षे झाली, तेव्हा विधान मंडळाने अभिनंदनाचा ठराव केला होता, तेव्हा ते मुख्यमंत्री होते. विलासरावांच्या सर्वांना भावणाऱ्या या स्वभावामुळेच प्रत्येकाच्या मनात एक तीव्र आत्मियता कायमची भरून होती आणि ती आजही आहे. सुशीलकुमार शिंदे आण त्यांची मैत्री ही तर राजकारणातील आदर्श आहे. 1999 ते 2003 विलासराव मुख्यमंत्री. 18 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री आणि पुन्हा 1 नोव्हेंबर 2004 पासून विलासराव मुख्यमंत्री. पतंगराव कदम चिडले. विलासरावांना म्हणाले, “अरे दोघांमध्येच वाटून घेता की काय ?” विलासरावांनी चिमटा काढला. पतंगराव, लातूरचा रस्ता सोलापूरहून जातो. जकात दिल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. तो भिलवडी-वांगीवरून गेला असता तर तुम्हाला संधी मिळाली असती. असे विलासराव. पराभवात न खचणारे, पराभवाच्या नंतरच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आले तरी हुरळून न जाणारे. सर्व काही विसरता येईल. विलासरावांना कधी विसरता येणार नाही.

टीप – हा लेख लिहित असताना सोलापूर ते लातूर हा प्रवास चालू आहे. लॅपटॉपवर लेख पूर्ण करण्याचे काम झाले आहे. विलासरावांच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमाला जात आहे.

– मधुकर भावे

 241 Total Likes and Views

0 Comments

No Comment.