मुली कोचिंगला पाठवताय नराध्यमांकडे पण लक्ष ठेवा

Hi Special
Spread the love

आजच्या स्पर्धेच्या काळात कुणालाही बाहेर धोका आहे म्हणून घरात कोंडून घेणे शक्य नाही. प्रचंड असुरक्षित काळ आपल्याभोवती घोंगावतोय, मात्र त्याला घाबरून चालणार नाही. आवश्यक ती काळजी घेऊन इथे प्रत्येकाला दररोज घराबाहेर पडलेच पाहिजे. जिथे मुलं, प्रौढ, ज्येष्ठ नागरिक सुरक्षित नाहीत अशा वातावरणात मुली कशा सुरक्षित राहतील याची काळजी पालकांना सतत खात असते. मात्र, त्याची फार चिंता करीत नियमित व्यवहार थांबवता येत नाहीत. सगळ्याच क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धा आणि पोटाची चिंता आपोआप सगळ्यांना घराबाहेर ढकलत असते. अशावेळी आवश्यक ती काळजी घेऊन, प्रसंगी आपले दायित्व निभावत कुटुंब प्रमुख सक्रिय झाले तर जगणे अधिक सुसह्य होण्यास नक्कीच मदत होईल. सामान्य किंवा मध्यमवर्गीय घरातील मुली यांच्यापुढे आजच्या काळात स्वतःची सुरक्षा हा सर्वात मोठा मुद्दा बनला आहे. हॉस्पिटल, मॉल, कॉल सेंटर, खासगी व्यवस्थापन, कॉलेजेस किंवा कोचिंग क्लासेस यांच्यात याच मुली नराधमांना सॉफ्ट टार्गेट वाटतात. *मुलींचे लैंगिक शोषण घराबाहेर पडल्यावर सगळ्याच क्षेत्रात होऊ शकते. मात्र कोचिंग क्लासेस किंवा कॉलेजेस यांच्यात त्याची शक्यता अधिक असते*.        अकोल्यात परवा चौधरी कोचिंग क्लासमध्ये जो प्रकार घडला तो नवा नाही. वसीम चौधरी पकडला गेला इतर लोक लपून आहेत एवढाच त्याचा अर्थ आहे. अकोला शहरातील एकही क्लास त्याला अपवाद नाही अशी स्थिती आहे. *अकोल्यात मागे एका सीए कोचिंग क्लास संचालकांना पालकांनी जो चोप दिला त्यावरून गडगंज श्रीमंत क्लास संचालक पैशांची कशी रग सामान्य मुलींवर काढतात हे जाणवते*.
चौधरी क्लासेसचा मालक वसीम चौधरी याला कमी वयात आणि वेळेत मिळालेले यश आणि गडगंज पैसा बुद्धी भ्रष्ट करण्यास कारणीभूत ठरले. वृत्तपत्रांना कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती बघून मुलांच्या करियरसाठी चिंतेत असणारा पालकवर्ग संभ्रमित होतो आणि थेट पाल्याचा प्रवेश घेऊन टाकतो. *क्लासला जाणार्‍या अल्पवयीन मुली आधीच क्लास आणि क्लास संचालकांचे वैभव बघून स्तिमित होतात आणि त्यांची हीच मनोवस्था हेरून हे लिंगपिसाट मुलींना आपल्या जाळ्यात ओढतात. गरीब की जोरू सबकी भाभी असते, त्याप्रमाणे गरीब आणि मध्यमवर्गीय घरातील होतकरू मुली या नराधमांचे खाद्य बनतात*. वसीम चौधरी याने आपल्या क्लासचा वापर यासाठीच केल्याचे उघड झाले आहे.
      वसीम चौधरी आपली आलिशान बीएमडब्ल्यू कार त्यासाठीच वापरत होता अशीही माहिती चर्चेतून बाहेर येत आहे. मुलींना कॅबिनमध्ये एकटीला बोलावून तिच्या मनोव्यवस्थेचा मागोवा घ्यायचा, हळूच व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग संदेश सुरू करायचे. मुलीचा प्रतिसाद मिळाला किंवा तिने हरकत घेतली नाही तर पुढे अश्लील मेसेज पाठवून प्रतिसाद मजबूत करायचा. नंतर अश्लील संभाषण सुरू झाले की तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा फंडा वसीम वापरत होता, हेही तपासात पुढे आले आहे. आज वसीमवर बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला आहे. *शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात हरामखोरी करून वसीम चौधरीने मध्यमवर्गीय मुलींना बाहेर पडण्याचे दरवाजे बंद करून टाकले आहेत*.
*वसीमचे प्रकरण बाहेर आल्यावर जे इतर क्लास संचालक नाकाने कांदे सोलत आहेत तेही धुतल्या तांदळाचे नाहीत*.शहरातील अनेक क्लास याच अवस्थेतून कधीतरी गेले आहेत. गडगंज पैशाने सगळे काही मॅनेज केले जाते याची प्रचंड गुर्मी अनेक क्लास मालकांना दाटलेली बघायला मिळते. कायद्याची पिन मारून त्यांच्याही अहंकाराची हवा एक दिवस नक्कीच बाहेर काढावी लागेल हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे. अकोल्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मुलींचे होणारे लैंगिक शोषण दबक्या आवाजात कानावर येते. *अडमाप पैसा कमावणारे अनेक डॉक्टर हाताखालील गरीब मुलींच्या मजबुरीचा फायदा घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील लिंग पिसाट लोकांचा भंडाफोड अशाच पद्धतीने होण्याची गरज आहे तो यथावकाश होईलही*.
घराबाहेर कोणत्याही कारणाने पडलेली आपली मुलगी सुरक्षित नसेल, माणसाच्या रूपातील जंगली श्वापदे त्यांच्यावर तुटून पडण्यास आसुसलेली असतील तर त्याला काही प्रमाणात पालक म्हणून आपणही नक्कीच जबाबदार आहोत. आपली मुलगी कोचिंग, नोकरी किंवा शिकायला जात असेल तर आठवड्यातून एकदा तरी तिकडे आपला चक्कर होतो का? काळजाचा तुकडा हातावरील फोडाप्रमाणे आपण वागवतो, मग तिची काळजी कुणीतरी टिनपाट मजनू घ्यायला लागतो.
  कधी ती तिच्या बॉसच्या अन्यायाची शिकार बनते. घरी सांगितले तर कुणी ऐकणार नाही असे वाटून ती जाळ्यात  अधिक रुतत जात असेल तर पालक म्हणून आपण किती काळ झोपा काढणार आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

-पुरुषोत्तम आवारे पाटील
संपादक दै.अजिंक्य भारत
संवाद -9892162248

 151 Total Likes and Views

0 Comments

No Comment.