सोनिया आणि राहुल गांधींना ईडीचे समन्स

Editorial
Spread the love

खळबळ आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाने कॉन्ग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. नॅशनल हेराल्ड ह्या १४ वर्षापूर्वी बंद पडलेल्या वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हे बोलावणे आहे. ८ जून रोजी चौकशीसाठी ह्या दोघांना बोलावले आहे. २०१५ मध्ये ह्या प्रकरणाचा तपास बंद केला होता असा कॉन्ग्रेस नेत्यांचा दावा आहे. . पण आता ईडीने फाईल पुन्हा का होईना उघडल्याने राजकारण तापले आहे. काय करील ईडी? मायलेकांना अटक होईल?
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही. सोनियाजी चौकशीला जातील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी तर आरोप केला आहे की, “यापूर्वी ईडीने हे प्रकरण बंद केले होते. भाजपा राजकीय विरोधकांना धमकवण्यासाठी बाहुल्या असलेल्या सरकारी तपास यंत्रणांचा वापर करत आहे.
काय आहे हे नॅशनल हेराल्ड प्रकरण? हेराल्ड नावाचे वृत्तपत्र होते. असोसिएटेड कंपनी ली. नावाने जवाहरलाल नेहरू यांनी ते १९४२ मध्ये सुरु केले होते. पुढे ते तोट्यात गेले. ते चालावे म्हणून कॉन्ग्रेसने ९० कोटी रुपयाचे कर्ज दिले होते. पण ते उठले नाही. पुढे २००८ मध्ये बंद पडले. २०१० मध्ये यंग इंडिया नावाच्या कंपनीने ते विकत घेतले. हेराल्डची मालमत्ता दोन हजार कोटी रुपयांची असेल पण यंग इंडियाने ते फक्त ५० लाख रुपयात विकत घेतले असा विरोधकांचा आरोप आहे. ह्या यंग इंडिया कंपनीत गांधी मायलेकाचे मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत.

               एवढा मोठा सौदा गुपचूप होऊनही कोणाला कशी खबर नव्हती? भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ मध्ये हे प्रकरण उकरून काढले. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून हेराल्ड चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी २,००० कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास ईडीने २०१४ मध्ये सुरू केला होता. आता ईडी पुन्हा कुदली आहे. ८ तारखेला सोनिया ईडी कडे जातील?  गेल्या तर पुढे काय होईल? देशाचे त्याकडे लक्ष आहे. 

 290 Total Likes and Views

0 Comments

No Comment.