निवडणुका सहसा अविरोध होतात. मात्र राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने सातवा उमेदवार रिंगणात उतरवल्याने चुरस वाढली आहे. भाजप किंवा शिवसेनेने आपला एक उमेदवार मागे घेतला नाही तर निवडणूक अटळ आहे. तब्बल १० वर्षानंतर राज्यसभेसाठी मतदान घेण्याची वेळ येताना दिसते आहे. तसे झाले तर अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांचा भाव वाढून घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. भाजपला घोडेबाजार करायचा आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. पण शिवसेनेने एक उमेदवार मागे घेतला तर घोडेबाजार होण्याचा प्रश्नच येत नाही असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दोघांनाही लढण्याची खुमखुमी आहे. त्यामुळे निवडणूक होणार आणि घोडेबाजारही.
विजयासाठी ४२ मतांचा कोटा आहे. सहा जागांपैकी पाच जागांचे निकाल पक्के आहेत. भाजपचे पीयूष गोयल आणि डॉ. अनिल बोंडे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल , कॉंग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि शिवसेनेचे संजय राउत हे पाच जण नक्की राज्यसभेत जाणार. मुकाबला सहाव्या जागेसाठी आहे. आणि ह्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात कुस्ती आहे. दोघेही कोल्हापूरचे आहेत. त्यामुळे कुस्ती रंगणार. महाआघाडी एकत्र लढत असली तरी शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संभाजी राजे छत्रपती यांना शिवसेनेने टोलवले. त्यानन्तर भाजपने धनंजय महाडिक यांना मैदानात उतरवले. खरी निवडणूक सहाव्या जागेसाठी आणि महाडिक आणि संजय पवार ह्या दोघांमध्येच आहे.
ही जागा निवडून आणण्याएवढी मतं कुठल्याही पक्षाकडे नाहीत. त्यांना अपक्षांची मदत घ्यावी लागेल. म्हणूनच ह्या सहाव्या जागेचा फैसला २९ अपक्ष आमदारांच्या हाती आहे. यातल्या महाआघाडी सरकारला पाठिंबा आहे असे एकूण १८ आमदार आहेत. . ६ अपक्ष आमदार भाजपच्या बाजूचे आहेत. ५ आमदार तटस्थ आहेत. ही निवडणूक खुल्या मतदान पद्धतीने होत असली तरी अपक्षांना कुठलेही बंधन नाही. ते कोणालाही मतदान करू शकतात. त्यांना आपले मत दाखवून देण्याचीही सक्ती नाही. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यामुळेच कमालीचे टेन्शन आले असणार. आता प्रश्न आहे घोडेबाजार होणार का? रेकॉर्डवर कोणी कबूल करणार नाही. पण भाव खुलत आहेत. आघाडीची मते घट्ट ठेवण्यासाठी शिवसेनेला खूप सर्कस करावी लागणार आहे. आपल्याकडे पुरेशी मते आहेत असे दोन्ही बाजू म्हणत आहे. पण ते काही खरे नाही. ‘मी १० आमदार आणतो’ असे महाडिक म्हणतात. ते महाआघाडीचेच आमदार फोडणार. याचा अर्थ फोड्फाड होणार. आता कोणाची आणि किती मते फुटणार हे आताच सांगता येणार नाही. राजकारणात ‘लक्ष्मीदर्शन’ हा एक कोडवर्ड आहे. हा कोडवर्ड म्हणजे ‘ऑपरेशन लोटस’ यावेळी जोरदार चालणार. महाआघाडीला जास्तीची १५ मतं आणता आली तर शिवसेनेचे संजय पवार निघतात. पण शिवसेनेला हे जमणार आहे का? कारण ‘आमची मतं आहेत’ असे देवेंद्र बोलून चुकले आहेत. देवेंद्र यांनी गेम केला आणि उद्धव ठाकरे फेल झाले तर ठाकरेंच्या अडचणी वाढतील. सरकारला अडीच वर्षे उरली आहेत. ती पूर्ण करणेही ठाकरेंना अवघड होईल घाम फुटेल. ही निवडणूक साधी नाही. पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहे. पुढे विधानसभा अध्यक्षाची निवडणूक आहे. ह्या निवडणुकीत मतं फुटली तर तिथेही दगा होऊ शकतो.
696 Total Likes and Views