प्रसिद्ध पार्श्वगायक ‘केके’ कशाने मेला याची चर्चा तो गेल्यानंतरही थांबलेली नाही. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. मात्र सुरुवातीला कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. ‘केके’ लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान गात होता. शेवटच्या क्षणी त्याला नेमकं काय झालं? वयाच्या ५४ व्या वर्षी माणूस असा कसा मरू शकतो?
कोणी गर्दीला दोष देतेय तर कोणी त्याच्या तब्येतीला. ज्या सभागृहात कार्यक्रम होता त्या ठिकाणी दुप्पट गर्दी म्हणजे जवळपास ५ हजार लोक जमा झाले होते. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. काहींनी गेटची तोडफोडही केली होती. त्यामुळे काही बाऊन्सर्सनी फोम स्प्रेची फवारणी केली होती असे सांगितले जाते. मात्र आयोजकांच्या माहितीनुसार, सभागृहात असे काहीही घडले नाही. केके ची तब्येत आधीच खराब झाली होती. त्यामुळे त्यांनी काही काळ ब्रेक घेतला होता. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा गाणे गाण्यास सुरुवात केली.
मात्र आता पोस्ट मार्टेमचा अहवाल हाती आला आणि मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले आहे. ‘केके’च्या हार्टमध्ये लहानमोठे ब्लॉकेजेस होते. नाचगाण्यामध्ये त्याची उत्तेजना वाढली आणि रक्तप्रवाह थांबला असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. पोलिसांना त्याच्या खोलीत भरपूर औषधं मिळाली. ऐंटासिड आणि होमिओपॅथीच्या गोळ्या सापडल्या. तो डायजीन घेत असे. त्याच्या चेहऱ्यावर मिळालेल्या जखमांचाही खुलासा झाला आहे. खोलीत सोफ्यावर बसताना तोल जाऊन तो पडला होता असे उजेडात आले आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमापूर्वी त्याने पत्नीला फोन करून आपला खांदा दुखत असल्याचे म्हटले होते. आता प्रश्न हा आहे , की तब्येत बरी नसताना हे गायक कार्यक्रम करण्याचा धोका का पत्करतात? एवढी कमाई आहे तर सोबत डॉक्टर का बाळगत नाहीत? अर्थात हे सारे प्रश्नच आहेत. एक गुणी गायक गेला याची हळहळ सदैव राहील.
253 Total Likes and Views