संघ सेक्युलर होत चालला?

Analysis
Spread the love

देशात मंदिर-मशीद वाद जोरात आहेत. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ. तिथे  ज्ञानवापी मशीद  हे मुळात मंदिर होते का?  यासंबंधीचा वाद  कोर्टात पोचला आहे. अशा उन्मादी हवेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी  काही धाडशी वक्तव्ये केली.   संघाच्या तृतीय  वर्ष  प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला नागपुरात बोलताना  भागवतांनी नवहिंदुत्ववाद्यांना  चांगलेच फटकारले.  भागवत यांचा पिंड मुळातच संघसुधारकाचा  आहे.  त्याला साजेसे  ते बोलले. ‘प्रत्येक  मशिदीत शिवलिंग शोधू नका’  असे भागवत म्हणाले.  “एक अयोध्या आंदोलन पुरे झाले. आता आम्ही आंदोलन करणार नाही. झगडा क्यू बढाना’ अशा शब्दात  भागवतांनी मुस्लीम  समाजाकडे मैत्रीचा हात केला आहे. जे झालं ते विसरा असा त्यांच्या बोलण्याचा सूर दिसतो.  कट्टर हिंदुत्ववादी ‘काशी, मथुरा बाकी है’ म्हणत असताना  सरसंघचालकांनी  घेतलेल्या ह्या भूमिकेचे स्वागत व्हायला हवे.  कारण अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात दोन्ही  समाजाने खूप भोगले आहे.  अयोध्या संघर्षात उफाळलेल्या हिंसाचारात  हजारो माणसे   बळी गेले.   कारसेवक जिवंत जाळले गेले  आणि त्या नन्तर गुजरातमध्ये  पेटलेल्या  हिंसाचाराचा इतिहास साक्षी आहे.  ते दिवस पुन्हा नको असतील तर भागवत यांनी  आणखी पुढे येऊन  अधिक स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे.   माणूस मंगळावर निघाला आहे. अशा युगात  आपण  मशिदीखाली  मंदिर शोधत असू तर जग काय  म्हणेल? एक स्पष्ट आहे. आता भारतातील मुसलमानांची संख्या २५ कोटी झाली आहे. एवढ्या लोकांना  हटवणे  शक्य नाही.  ह्या २५ कोटीसोबत जगायचे आहे. त्यामुळे  त्यांचा विश्वास कमावणे  आणि ते कृतीतून सिद्ध करणे एवढेच  हिंदूंच्या हाती आता उरले आहे.

               भागवत चांगले बोलले. पण  कट्टर  मुस्लीम  समाज  त्यावर किती  विश्वास   ठेवतो?  कारण भागवत  चार वर्षापूर्वी दिल्लीतल्या ऐतिहासिक चार भाषणांमध्ये  हेच बोलले होते. ‘भारतात राहणाऱ्या मुसलमानांचे पूर्वज हिंदू होते. दोघांचा डीएनए’ एक आहे’ ही त्यांची वक्तव्ये सुखावून जातात. पण दोन्ही समाजाच्या मानसिकतेत त्याचा फार परिणाम होताना दिसत नाही. त्याला कारण आहे.  संघ हा बारा तोंडी आहे. संघाची अनेक रूपे आहेत.  संघ बोलतो. पण भाजप मौन राखतो याचा अर्थ काय घ्यायचा?   भागवत बोलले त्याचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगेच स्वागत  केले का? ‘आता मथुरेसाठी आंदोलन होणार नाही’ असे योगी का  बोलत नाहीत?

                     संघाने एक बोलायचे तर  भाजपने वेगळे बोलायचे हा दुटप्पीपणा होईल.  कट्टर हिंदुत्ववाद नको असे भागवत म्हणतात.  मग  तो कुणाला हवा आहे? महाराष्ट्रात तर कोणाचे हिंदुत्व अधिक प्रखर ह्यासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात स्पर्धा सुरु आहे.  कोणी अयोध्येला जातो म्हणतो आहे तर कोणी  हनुमान चालिसा  वाचण्याचा हट्ट धरून आहे.  स्पष्ट बोलू का?  हिंदुत्व हे भाजपचे ‘एटीएम’ आहे.  निवडणुका आल्या की भाजप हिंदुत्वाचे पंपिंग सुरु करतो.  तेच सोडा असे भागवत म्हणत असतील तर  नरेंद्र मोदी  ऐकतील?  हिंदुत्व नाही तर कशाच्या जोरावर मतं मागणार?  ‘मोहनजी आम्हाला काँग्रेसी करायला निघाले आहेत’ अशी भीती एक ज्येष्ठ स्वयंसेवकाने बोलून दाखवली.  त्यामुळे तुम्ही लिहून ठेवा.  सुजाण नागरिकांना नको असले तरी मंदिर-मशीद हे सुरूच राहणार आहे. केवळ संघ बदलून उपयोग नाही. भाजपपासून संघाच्या  सर्व डझनभर  संस्थांना  बदलावे लागेल. मुस्लिमांनाही  बदलावे लागेल. हे एवढे सारे  जमेल? मात्र एक नक्की झाले.  भागवत यांच्या  भाषणाने  तणाव थोडा कमी व्हायला मदत होईल एवढेच.

 611 Total Likes and Views

0 Comments

No Comment.