देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी येत्या १८ जुलैला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने ह्या निवडणुकीची घोषणा केली आहे. २१ जुलैला मतमोजणी होऊन देशाला नवा राष्ट्रपती मिळेल. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपतो आहे. विरोधी पक्ष तर गलितगात्र आहेत. मोदी कितीही नको असले तरी तेच नवा राष्ट्रपती देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोतडीत कोणाचे नाव आहे याची उत्सुकता देशाला आहे. गेल्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांचे नाव कोणालाही ठाऊक नव्हते. फार कमी लोक त्यांना ओळखत होते. अशा हवेत कोविंद आले. यावेळी मोदी कोणाचे नाव देतात? गेल्या वेळी कोविंद यांच्या रूपाने मोदींनी दलित कार्ड खेळले. यावेळी मोदी आदिवासी कार्ड खेळतील अशी जोरदार चर्चा आहे. ‘एसटी’च्या लोकसभेत ४७ जागा आहेत. ह्या वर्षअखेर गुजरातमध्ये निवडणूक आहे. पुढच्या वर्षी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थान ह्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. ह्या चार राज्यांमध्ये आदिवासी कार्ड जोरात चालू शकते. पण मोदींच्या मनात काय आहे? उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे नावही अचानक पुढे येऊ शकते.
पण मोदी आश्चर्याचा धक्का देऊ शकतील असे नाव कुठले असू शकते? हा शोध गुलाम नबी यांच्या नावावर थांबू शकतो. गुलाम नबी हे इंदिरा गांधी यांच्या काळातले कॉन्ग्रेसचे नेते आहेत. राज्यसभेचे ते विरोधी नेते होते. सध्या ते कुठेही नाहीत. कॉन्ग्रेसने त्यांना यावेळी राज्यसभेचे तिकीट दिले नाही. सोनिया गांधी यांनी त्यांना नुकतेच बोलावले होते. ह्या भेटीत त्यांनी त्यांना कॉन्ग्रेस पक्षातील दुसऱ्या क्रमांकाची जागा देऊ केली. पण गुलाम नबी यांनी ती नाकारली. त्यामुळे गुलाम नबी मोदींचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होणार अशा चर्चेला उधाण आले आहे. ‘मी कॉन्ग्रेसच्या झेंड्यात जाणार’ असे मध्यंतरी गुलाम नबी म्हणाले होते. पण राजकारणात काहीही होऊ शकते. नबी हे काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या काश्मीरमध्ये वेगवेगळ्या समस्या डोके वर काढत आहेत. नबी यांना राष्ट्रपती म्हणून पुढे केले तर काश्मीरची समस्या सौम्य होऊ शकते. त्याच हिशोबाने मोदी हालचाल करताहेत असे मानले जात आहे. काश्मीर ही आज देशाची मुख्य डोकेदुखी आहे. गुलाम नबी यांना पुढे केल्याने दहशतवाद्यांना रोखता येत असेल तर मोदींना ते हवे आहे. ७३ वर्षे वयाचे नबी हे ‘जी२३’ ह्या असंतुष्ट गटाचे नेते मानले जातात. ‘मी कॉन्ग्रेसच्याच झेंड्यात जाईन’ असे त्यांनी वेळोवेळी जाहीर केले आहे. त्यामुळे नबी यावेळी कसे वागणार? राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे प्रश्न उरतोच. काय होणार?
देशातील ७७६ खासदार आणि ४०३३ आमदार असे एकत्रित ४८०९ जण या निवडणुकीचे मतदार असतील. एकूण मतांचे मूल्य हे १० लाख ८६ हजार ४३१ आहे. यामुळे विजयासाठी ५ लाख ४३ हजार २१५ मतांची आवश्यकता असेल. भाजपला हा जादुई आकडा गाठण्याकरिता काही मतांची गरज लागेल. तरीही बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, अण्णा द्रमुक अशा विविध प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपला उमेदवार निवडून आणण्यात काहीच अडचण येणार नाही.
ह्या निवडणुकीत महाराष्टारची भूमिका महत्वाची राहणार आहे. महाराष्ट्रातील आमदारांच्या मतांचे मूल्य हे १७५ असेल. १९७१च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या पाच कोटी चार लाख होती. या लोकसंख्येला विधानसभा सदस्यसंख्या असलेल्या २८८ ने भागले जाते. त्यातून मतांचे मूल्य १७५ येते. त्यानंतर २८८ ला १७५ ने गुणले जाते. त्यातून राज्यातील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५०,४०० येते. राज्यातील खासदारांची संख्या ६७ आहे. लोकसभेचे ४८ तर राज्यसभेचे १९ खासदार आहेत. प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य हे ७०० असेल. यानुसार ७०० गुणिले ६७ केल्यावर राज्यातील खासदारांच्या मतांचे मूल्य हे ४६,९०० होते. महाराष्ट्रातील आमदारांच्या मतांचे मूल्य हे ५०,४०० तर खासदारांच्या मतांचे मूल्य हे ४६,९०० असेल. हे मूल्य कुणाच्या बाजूने झुकते त्याकडे देशाचे लक्ष राहणार आहे.
202 Total Likes and Views