आवश्यक संख्याबळ नसूनही राज्यसभेचा तिसरा उमेदवार निवडून आणणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता विधान परिषद निवडणुकीत तसलाच चमत्कार करणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. फडणवीस म्हणाले, “विधान परिषदेच्या पाच जागा आम्ही लढवतोय. सत्तारुढ पक्षात खूप मोठा असंतोष आहे. म्हणून आम्ही पाचवी जागा लढतोय. सोपं नाही. पण आम्ही ५ वी जागा म्हणजे प्रसाद लाड जिंकणारच.”
अर्ज मागे घ्यायला ५ मिनिटांची वेळ शिल्लक असताना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी अर्ज माघारी घेतला. फडणवीस म्हणाले, आमची अपेक्षा अशी होती की सत्तारुढ पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करावी. सत्ताधारी पक्षातील काही लोकांनी तसा प्रयत्नही केला. पण काँग्रेसने दोन उमेदवार उतरवल्याने बिनविरोधाचे प्रयत्न फसले.
: महाआघाडीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानपरिषदेचा कोटा २६ मतांचा आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, अपक्ष आम्हाला मतदान करतील. महाविकास आघाडीत कसल्याही प्रकारची बिघाडी नाही. विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीचे ६ उमेदवार विजयी होतील.
आता १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्यानं चुरस वाढली आहे. भाजपकडून प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेनं सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना लढवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर तर काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे मैदानात आहेत. पाचव्या जागेवरील प्रसाद लाड यांच्यासाठी भाजपला आणखी २७ मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. हे करताना दमछाक होणार असल्याने फडणवीस यांनी सदाभाऊंना मैदानातून हटवले असे मानले जाते.
161 Total Likes and Views