अभिनंदन यांचे, चिंता त्यांची

Analysis
Spread the love

बारावीचा निकाल वेळेवर लावला याबद्दल शिक्षण मंडळाचे अभिनंदन.   १४ लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला बसले होते.  त्यापैकी  साडे तेरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा बारावीचा निकाल  साडे तीन टक्क्याने वाढला. उत्तीर्ण होणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना  चिंता वाटते  ती नापास  ५० हजार विद्यार्थ्यांची. फक्त  दहा हजार ४२  विद्यार्थ्यांनी  ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. ह्यांची बल्ले बल्ले आहे. चिंता वाटते ती  त्या १३ लाख ४६ हजार उत्तीर्ण विद्यार्थ्यांची. ह्यातले ४६ हजार  उच्च शिक्षणाचा चक्रव्यूह कसाबसा भेदतीलही  पण इतरांचे काय? नापास मुलामुलींपेक्षा मला ह्या  चांगल्यापैकी पास मुलामुलींची चिंता अधिक वाटते. ह्यापैकी किती जणांसाठी मेडिकल, इंजिनिअरिंगचे दरवाजे उघडतील?   आर्टला ८५ टक्के गुण मिळवूनही पुण्याचे चांगले कॉलेज मिळाले नाही म्हणून धाय मोकलून रडणारे विद्यार्थी पाहिले की  मनातला पालक अस्वस्थ होतो. म्हणजे नापास रडताहेत आणि चांगले पास होणारेही रडताहेत. प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगवेगळा.  ६०-७० टक्के गुण घेऊन होणाऱ्या मुलांच्या वेदना  नापास मुलांसारख्याच  असाव्यात. ह्यांनी कुठे जायचे?   ह्या मुलांची मानसिकता कोण आणि कधी समजावून घेईल?    मुलांच्या अंगभूत गुणांचा कधी विचार होणार? हा यक्षप्रश्न प्रत्येक निकालाच्या वेळी सतावतो.

          ४० वर्षापूर्वी  ६० टक्के गुण मिळाले म्हणजे  मोठा पराक्रम केला असे वाटायचे.  तेव्हा ६० टक्क्याचा विद्यार्थी मेरीटमध्ये पहिला यायचा. आता ९५-९७ टक्के गुण हवेत.  सगळ्या मुलांनी एवढे गुण कुठून आणायचे?  आणखी १०  वर्षांनी  १०० पैकी ११० गुण लागणार. मेरीट लिस्ट आता हद्दपार झाली आहे. पण तरीही प्रश्न आहेच. खेड्यातल्या शिक्षणाचा विचार करायला कोणाला वेळ आहे? कोठे चालली आपली शिक्षण पद्धती?  शिक्षणतज्ञांना, राजकारण्यांना  याचा विचार करायला वेळ आहे का?   शिक्षण मंडळाचा निकालही ३०-३५ टक्के लागायचा. कधी काही तर ३० टक्क्याच्या खाली असायचा. तेव्हा  आम्ही मिडीयावाले मंडळा नापास झाले असे म्हणायचो.  यंदाचा निकाल  यंदाचा निकाल ९४ टक्के आहे. आता बोला. प्रत्येकाला मेडिकल कसे मिळणार?  चांगले कॉलेज कसे मिळणार?  चांगल्या  संधी मिळाल्या नाहीत तर त्याचे भवितव्य काय राहील हे सांगायला ज्योतिषी नको.  शिक्षणाचा घसरता दर्जा आणि आयुष्यात निरुपयोगी होत चाललेले शिक्षण  यामुळे नवे प्रश्न अधिक जटील  होत चालले आहेत. १८ वर्षाच्या तरुणाला आपण मताचा अधिकार तर दिला.पण त्याला समान संधी कधी देणार? दिली नाही तर हे तरुण उद्या दगड घेऊन रस्त्यावर येतील . लोकशाहीला हा मोठा धोका आहे.

          यंदा निकाल वेळेवर लागला असला तरी पुढच्या प्रवेशाला विलंब होणार आहे.    राज्य सरकारने उच्च शिक्षणाच्या प्रवेशाबाबत  आवश्यक मार्गदर्शक सूचनाच अद्याप जाहीर केल्या नाहीत.    प्रवेश  परीक्षा ऑगस्टमध्ये होणार  असल्याने   यावेळी रखडपट्टी होणार आहे.   त्यात भर म्हणजे सीबीएसईची परीक्षा  उशिरा झाल्याने  ह्या बोर्डाच्या निकालासाठी थांबावे लागणार आहे.  सरकार पातळीवर प्रयत्न झाले तरच ३० सप्टेंबरपूर्वी  प्रथम  वर्षाचे वर्ग  सुरु होऊ शकतील.   तेवढी चपळाई दिसेल? मंडळाने दहावी-बारावीची मेरीट लिस्ट काढून टाकली.  मेडिकल, इंजिनिअरिंगमध्ये  प्रवेशासाठी हल्ली प्रवेश परीक्षा होतात.  त्यामुळे बारावीच्या गुणांना आता  फारसे महत्व राहिले नाही. ही ‘सीईटी’ म्हणजे  बारावीच्या प्रवेश परीक्षेवर  एक प्रकारे अविश्वास ठरावच आहे.  परीक्षेची परीक्षा घेण्यासाठी आणखी एक परीक्षा.  विद्यापीठांमधून मिळणाऱ्या पद्व्यांवर     सरकारचा किंवा व्यवस्थेचा  यापैकी कोणाचाही विश्वास नाही.   एखादा विद्यार्थी नापास होतो म्हणजे कोण नापास होतो?  विद्यार्थी नापास होतो की शिक्षक नापास होतात की विद्यापीठ नापास होते की शिक्षण व्यवस्थाच नापास होते हे प्रश्न आहेत.

                प्रवेश परीक्षेमागे  सरकारचा काय हेतू असेल तो असेल. पण त्यामुळे खासगी क्लासेसचे पेव फुटले आहे.  ३० वर्षापूर्वी शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थ्याकडे ‘ढ’  म्हणून पाहिले जात असे.  आज शिकवणी नाही असा विद्यार्थी  शोधणे अवघड आहे.   शिकवणीच्या जागी आलेले ‘क्लास’  हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचा  अविभाज्य  अंग बनले आहे. ‘क्लासेसच्या देशा’ अशी आपली ओळख बनली आहे. अगदी ‘नर्सरी’पासून क्लासला सुरुवात होते  आणि शिक्षण संपेपर्यंत क्लासेस विद्यार्थ्याची पाठ सोडत नाहीत.  कुठल्याही स्पर्धा  परीक्षेसाठी क्लासेस जणू मस्ट झाले आहेत.  मग शाळा-कॉलेजात शिकवतात काय? आपली मुले क्लासला जातात याची  शिक्षकांना लाजही वाटत नाही.  कुणी गणितासाठी क्लास लावतो तर कुणी विज्ञानासाठी तर कुणी संस्कृतसाठी.   दहावीचा निकाल लागण्याआधीच  अकरावीचे क्लास सुरु होतात. हल्ली अकरावी-बारावी तसेच जेईई  किंवा ‘नीट’  असे  लाखो रुपयाचे  package   देणारे क्लास आले आहेत.  कॉलेजला दांडी मारून मुले ह्या क्लासेसला गर्दी करतात. ‘क्लास’ ही मोठी बाजारपेठ झाली  आहे. तिच्यात  विद्यार्थ्याकडे  एक वस्तू म्हणून पाहिले जाते. त्यामुळे आधीच महाग शिक्षण आणखी महाग झाले आहे.   आपले मुल स्पर्धेत  मागे पडू नये म्हणून पालकांची तळमळ समजू शकते. पण मुलाला पुढे आणण्याची शिक्षण व्यवस्थेची काहीच जबाबदारी नाही काय?

             शिक्षणाकडे युद्ध म्हणून पाहायला भाग पाडले  गेले आहे.  ह्या युद्धात  आयुष्य जगण्यासाठी शिक्षणाचा उपयोग हा विचार मागे  पडला आहे.   शाळा म्हणा की ‘क्लास’ म्हणा,  दोघेही परीक्षा नावाचे युद्ध जिंकायचे शिकवतात.  मुलांनी विषय समजून घेण्याची आणि स्वतःहून उत्तर शोधण्याची गरज आहे हे कोणीतरी सांगायला हवे. पण त्याकडे  सगळेच दुर्लक्ष करतात.  त्यामुळे विद्यार्थी  पदवी  घेऊन तर बाहेर पडतो. पण  आयुष्यात जगण्यासाठी संघर्षाची ताकद त्याच्यात नसते.   इंजिनिअरिंगचे केवळ  आठ  टक्के पदवीधर    इंजिनिअरिंगची कामे  करण्याला उपयुक्त आहेत अशी खंत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी बोलून दाखवली होती.  हे चित्र बदलायला कोणी तयार नाही. खासगीकरण आणि स्पर्धात्मक शिक्षण व्यवस्थेतून गुणवत्ता निर्माण होईल  ही अटकळ भ्रम ठरते आहे.   मुले डिग्री तर घेतात. पण त्यांना व्यवहारिक ज्ञान नसते.   डिग्री  दाखवून नोकरी मिळत नसेल आणि   स्वतःच्या पायावर जगता येत नसेल तर  अराजक अटळ  आहे. निराश तरुणांच्या फौजा  आपण  जन्माला घालतो आहोत का? गुणांपलीकडचे  आणि प्रवेश  परीक्षापलीकडचे शिक्षण आपण  मुलांना देणार आहोत की नाही?

              एक लक्षात घ्या. पुढचा काळ अनिश्चिततेचा आहे.  तुम्ही चौकस असाल,  शोधक वृत्तीचे असाल , शिकलेल्या गोष्टींची जीवनाशी सांगड  घालता येत असेल  तर  आणि तरच तुम्ही ह्या स्पर्धेच्या युगात टिकू शकाल. दुर्दैवाने  आजचे शिक्षण हे ‘मिशन’ देण्यात अपयशी ठरले आहे.   कॉलेजातून  दिल्या जाणाऱ्या  शिक्षणातून थोडीफार माहिती मिळते, थोडे  कौशल्यही मिळते. पण ज्ञान आणि आत्मविश्वास मिळत नाही. त्यामुळे मिळालेल्या माहितीचा  वापर कुठे आणि कसा करायचा हे विद्यार्थ्यांना कळत नाही.  शिक्षणाच्या नावावर आज जे शिकवले जाते ते शिक्षण नसून ‘छळ’ आहे. बीए, बीकॉम झालेला तरुण  नोकरीसाठी कुठे जाणार? ह्या प्रश्नांचे उत्तर  सरकारकडे नाही.    डिजिटल प्रभावामुळे   तशाही नोकऱ्या आटल्या आहेत.     दरवर्षी  विद्यापीठातून  पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या लाखो  मुलांना आपण काय नोकऱ्या देणार?  ह्या प्रश्नांचे उत्तर  कोणाकडेही नाही.  त्यामुळेच पास झालेल्या मुलांची चिंता आहे.    ह्या चिंतेवर मात करायची असेल तर मुलांनी आतापासून  आयुष्य रंजक, साहसी  कसे करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. नोकरी करू नका, इतरांना नोकऱ्या दया. एक लक्षात घ्या. आयुष्यात महान  म्हणून ओळखली गेलेली  माणसे फारशी शिकलेली नव्हती.  पण त्यांचा स्वतःवर विश्वास  होता. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. आयुष्य तरुन  जाल.त्यासाठी   तुम्ही कोणाच्या संगतीत वावरता यालाही महत्व आहे.  एमआयटी एकच असते, हॉलीवूडही एकच असते.  आणि सिलीकोन व्हाली एकच असते.   तुमचे टार्गेट असेच काही एक असावे लागेल.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.  )

 492 Total Likes and Views

0 Comments

No Comment.