वडाची पूजा किती प्रासंगिक?

Analysis
Spread the love

वटपूर्णिमा हा महिलांचा सण. जन्मोजन्मी हाच पती मिळो  अशी प्रार्थना  करत महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. गेली अनेक वर्षे ही प्रथा चालत आली आहे. पूर्वी ह्याकडे  आदराने पाहिले जायचे. पण अलीकडे    चेष्टेने पाहिले जाते.  जुनाट कल्पना म्हणून टिंगलही होते. ‘चेंज का नको?’ असाही  सवाल  चक्क  काही महिलाच करताना दिसतात.  जमाना बदलला आहे. पुरुष पुरुष राहिले नाहीत आणि महिला ह्या महिला राहिल्या नाहीत.  सणातले गांभीर्यही   आटत चालले आहे. ‘लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही’, असे वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी  विधवा प्रथा बंदीच्या कार्यक्रमात केले होते. त्यांच्या विधानावर समाजमाध्यमातून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर काही जण टीका करत आहेत तर काही जण रुपाली चाकणकर यांच्या रोखठोकपणाचं कौतुक करत आहेत. अशातच भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी ट्विट करुन चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

         ‘लग्न झाल्यापासून मी एकदाही वडाच्या झाडाला फेरे मारले नाहीत’, असं म्हणणाऱ्या  रुपाली चाकणकर यांना भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुनावलं आहे. “वडाला फेऱ्या मारणं महत्वाचं नसतं. त्यातील भावना महत्वाची आहे. आपल्या माणसासाठी कुठल्याही पातळीला जायची तयारी ठेवणं, हा त्यामागचा खरा संदेश आहे”, असं ट्विट करत  बोर्डीकर यांनी वट पोर्णिमेचं महत्त्व  समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. “वडाला फेऱ्या मारणं महत्वाचं नसतं. त्यातील भावना महत्वाची आहे. आपल्या माणसासाठी कुठल्याही पातळीला जायची तयारी ठेवणं, हा त्यामागचा खरा संदेश आहे. तुम्ही करत नाही. पण व्रत न करण्याचा गवगवा करून व्रत करणाऱ्या इतर महिलांच्या भावना दुखावणारं हे कुठलं पुरोगामित्व आहे?”, असा सवाल बोर्डीकरांनी केला.”वटपोर्णिमेच्या सणाचा निसर्गाशी जोडले जाण्याचा उद्देश आहे, हे तुम्ही जाणीवपूर्वक विसरण्याचे कारण काय असावे? पुरोगामीत्वाच्या नावाखाली हिंदुत्वाला खुला विरोध हा आपला जुनाच अजेंडा राहिलेला आहे. तो सुरुच ठेवा. आमच्या धर्म, संस्कृतीचे त्यामुळे काहीच बिघडणार नाही”, असंही बोर्डीकर म्हणाल्या. दोघीही महिला आहेत. पण दोघींची मतं टोकाची आहेत.  वडाची पूजा करणाऱ्या महिलांनी काय करायचे? एकूणच संशयकल्लोळ.

 1,029 Total Likes and Views

0 Comments

No Comment.