देशाच्या १५ व्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपतोय. त्या आधी म्हणजे १८ जुलै रोजी निवडणूक होईल आणि २१ जुलैला निकाल जाहीर होईल. कोण होणार नवे राष्ट्रपती? २९ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. सत्ताधारी भाजपने अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. उमेदवार निवडीची जबाबदारी भाजपने यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दिली आहे. सर्वांचा पाठिंबा असणारा उमेदवार देता येईल का? या दिशेने राजनाथ सिंह विरोधी नेत्यांशी बोलत आहेत. तिकडे तृणमूल कॉंग्रेसच्या सुप्रीमो ममतादीदी यांनी सोनियाच्या हातून पत्ते पिसायला घेतले. पण डाव अंगावर आला. झाडून साऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रवादी कॉन्ग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांना ऑफर दिली. पण पवारांनी नाही म्हटले. विरोधकांना उमेदवार मिळत नाही याची चर्चा नाही. पवारांनी नाही म्हटले याचीच जास्त चर्चा आहे. त्यामुळे पवार नाही तर दुसरा कोण? हा प्रश्नच आहे. अर्थात पवार नाही म्हणतात याचे अनेक अर्थ निघतात. नाही म्हणजे होय असाही अर्थ निघतो. पवार उद्या अर्ज भरायला निघतील असेही होऊ शकते. पण पवार यावेळी गंभीर दिसतात. आखाड्यातून ते हटले याची काही ठळक कारणेही लक्षात येतात. विरोधी पक्ष एकजूट नाही. हरणाऱ्या घोड्यावर कशाला पैसे लावायचे असा विचार पवारांनी केला असेल. दुसरे कारण म्हणजे पवारांचे सर्वच पक्षांमध्ये चांगले संबंध आहेत. वेळ पडली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेंबरमध्ये ते थेट घुसू शकतात. निवडून येण्याची शक्यता नसेल तर उगाच संबंध का खराब करायचे? असाही विचार पवारांनी केला असेल. तिसरे कारण सर्वात महत्वाचे आहे. दिल्लीत गेलो तर महाराष्ट्राला वेळ देता येणार नाही. राष्ट्रवादीत आधीच खूप गटतट झाले आहेत. दुर्लक्ष झाले तर राष्ट्रवादी फुटू शकते. महाआघाडी सरकार हातातून जाऊ शकते. पवार हा धोका पत्करू इच्छित नाहीत. ममतादीदीचे मन त्यांनी मोडले ते या पायी. मग काय होणार?
तुम्ही लिहून ठेवा. भाजपच्या उमेदवाराचे पारडे जड असेल. मोदी सरकारपाशी ४८ टक्के मतमूल्य आहे. बहुमताला १३ हजार मते कमी पडत आहेत. ओडिशातला बिजू जनता दल आणि आन्ध्रमधला वायएस आर कॉन्ग्रेस ह्या मित्र पक्षांच्या मदतीने भाजप ही निवडणूक सहज जिंकेल. कारण विरोधकांच्या महाआघाडीकडे बहुमत नाही. गेल्या निवडणुकीतही नव्हते. तरीही रामनाथ कोविंद यांच्या विरोधात जगजीवन राम यांच्या कन्या मीरा कुमार यांना उभे करण्यात आले. मीरा कुमार पडल्या. पण मोदींना विरोध करायची खुन्नस विरोधकांनी भागवून घेतली. विरोधासाठी विरोध असे सुरु आहे. पडला तरी चालेल. पण उभा पाहिजे. तुम्हाला एक सांगू का? गेल्या ७५ वर्षात फक्त नीलम संजीव रेड्डी अविरोध निवडून आले. रेड्डी सोडले तर आपल्या साऱ्या राष्ट्रपतींना निवडणूक लढूनच यावे लागले. अगदी एपीजे कलम ह्या सारख्या शास्त्रज्ञालासुद्धा. १९७७ च्या निवडणुकीत म्हणजे जनता राजवटीत नीलम संजीव रेड्डी अविरोध राष्ट्रपती निवडले गेले. पण त्याला कारण झाली १९६९ ची निवडणूक. ह्या निवडणुकीत रेड्डी हे कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. पण इंदिरा गांधी यांनी व्हि. व्हि. गिरी यांना बंड करायला लावले आणि निवडून आणले. पुढे मोरारजी देसाई सत्तेत आले तेव्हा त्यांनी रेड्डींना अविरोध राष्ट्रपती म्हणून आणले. सारा सत्तेचा खेळ आहे. १८ जुलैलाही तोच खेळ खेळला जाणार आहे.
म्हणायला देशात २२ विरोधी पक्ष आहेत. पण मोदींच्या उमेदवाराशी दोन हात करायला एकही दमदार उमेदवार नाही. तृणमूल कॉन्ग्रेसच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममतादीदी यांनाही हे कळते. पण दीदीचे खरे टार्गेट २०२४ची निवडणूक आहे. दीदीला पुढचा पंतप्रधान व्हायचे आहे. त्यासाठी त्या सध्या बकरा शोधत आहेत. एरवी सूत्रे कॉन्ग्रेसच्या हाती राहायची. यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांचा सहमतीचा उमेदवार निवडीसाठी ममतादीदीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांच्या २२ नेत्यांना दिल्लीत बुधवारी बोलावले होते. पण ह्या बैठकीची हवा आधीच गुल झाली. कॉन्ग्रेस, डाव्यांसह १७ पक्षांचे प्रतिनिधी आले. आम आदमी पक्षाने दांडी मारली. राष्ट्रवादी कॉन्ग्रेसचे सुप्रीमो शरद पवार बैठकीला होते. पण पवारांनी उमेदवारी स्वीकारायला नकार दिला. सोनिया गांधी पवारांच्या नावाला राजी आहेत . पण पवार हे तेल लावलेले पैलवान आहेत. ममताच्या सापळ्यात अडकले नाहीत. ‘विजयाची शाश्वती नसताना मी कशाला जोखीम घेऊ?’ असा प्रश्न टाकून पवारांनी सर्वांना निरुत्तर केले. गेली ५० वर्षे राजकारणात असलेले ८२ वर्षे वयाचे पवार आखाड्यात उतरले असते तर निवडणुकीत रंगत आली असती. पवार नाहीत म्हटल्यावर आता ही निवडणूक म्हणजे एक औपचारिकता झाली आहे. जाहीर सभांमध्ये भाजपशी लढायच्या बढाया करायच्या. पण प्रत्यक्षात लढायची वेळ येते तेव्हा शेपूट घालायचे. पवारांचे सारे राजकारण सत्ताकेंद्रित राहिले आहे. पवारांना महत्वाकांक्षा उरल्या नाहीत अशातला भाग नाही. त्यांना पंतप्रधान व्हायचे होते. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी पवारांनी पंतप्रधानपदाला धडक मारली होती. पण उडी कमी पडली आणि नरसिंहराव यांनी बाजी मारली. सोनिया गांधी विदेशी आहेत असे सांगून १९९९ मध्ये पवारांनी भूकंप घडवला. पण कमी पडले. मिडिया कितीही फुगवून सांगत असली तरी गेली २० वर्षे एका प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष म्हणूनच दिल्लीत त्यांची ओळख आहे. पंतप्रधानपद तर जाऊ द्या, आता तर राष्ट्रपतीपदही त्यांच्यापासून दूर गेले आहे. आपल्याला सक्रीय राजकारण करायचे आहे असे पवार म्हणाले. या वयात काय करणार? ज्या वयात राजकारण करायचे होते त्या वयात त्यांनी काड्या केल्या. पुतण्याला म्हणजे अजितदादांना मुख्यमंत्री करायची त्यांना एकदा संधी होती. पण त्यांनी त्यावेळी त्याबदल्यात मलाईदार खाती मागून घेतली. त्यामुळे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही. आताही उद्धव ठाकरे यांच्या हाती महाराष्ट्र देण्यासाठी ते पावसात भिजले नाहीत. २०२४ मध्ये त्यांना आपल्या कन्येला राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून पहायचे आहे. त्यासाठी त्यांना मोकळे राहायचे आहे. पवारांच्या मनातले कळत नाही असे म्हणतात. पण त्यांचे प्रत्येक समीकरण सत्तेचे असते. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रपती होण्याचा मोह टाळला. ‘पवार हे आपले राजकीय गुरु आहेत’ असे मोदी बारामतीच्या सभेत म्हणाले होते. पवारांमध्ये काही गुण आहेतही. पण स्वतःभोवती सदैव संशयाचे जाळे विणण्याच्या स्वभावामुळे पवार आज मोदींकडे गुरुदक्षिणाही मागण्याच्या परिस्थितीत नाहीत.
यावेळी विरोधकांची मोठी विचित्र परिस्थिती झाली आहे. कॉन्ग्रेस हा युपीएमधला एक राष्ट्रीय पक्ष. पण तो स्वतःच्याच वेगवेगळ्या अडचणीत सापडला आहे. ७५ वर्षे वयाचे सोनिया गांधी यांची तब्येत बरी नसते. त्यात करोना झाला. सोनिया आणि राहुल ह्या मायलेकाच्या मागे ईडी लागली आहे. नेशनल हेराल्डच्या घोटाळ्यात ईडीने बोलावल्याचे टेन्शन दोघांना आहे. करोनामुळे सोनिया यांची तारीख पुढे गेली. मात्र तीन दिवसांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांच्या तोफांना उत्तरं देताना राहुलबाबाची दमछाक सुरु आहे. गांधी घराण्यातल्या कोण्या नेत्याला ईडीचे समन्स येईल याची कल्पना कोणी स्वप्नातही कल्पना केली नसती. पण घरातच ईडी आल्याने कॉन्ग्रेस यावेळी लढण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे ममतादीदीला मैदान मोकळे आहे. आपला घोडा जिंकणार नाही याची विरोधकांना पूर्ण खात्री आहे. त्यामुळे अडगळीत गेलेल्या नेत्यांची नावे पुढे केली जात आहे. महात्मा गांधी यांचे नातू गोपाल कृष्ण गांधी, फारूक अब्दुल्ला, गुलाम नबी, यशवंत सिन्हा आदींच्या नावाची चर्चा सुरु आहे. हे गोपालकृष्ण गांधी गेल्या निवडणुकीत उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढले होते. आपटले. आता ममतादीदीने बोलावलेल्या बैठकीत काही ठरू शकले नाही. पुन्हा बसायचे ठरले. पण मी तुम्हाला सांगतो. विरोधकांकडे मजबूत उमेदवारच नाही. त्यामुळे मोदी कोणाचे नाव पुढे करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. धक्कातंत्रासाठी मोदी प्रसिद्ध आहेत. गेल्यावेळी रामनाथ कोविंद यांचे नाव कोणाच्या स्वप्नातही नव्हते. यावेळी मोदी दक्षिण भारतातला कुणी आदिवासी नेता देतील असा अंदाज आहे.
( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
192 Total Likes and Views