‘अग्निपथ’ मागे घेणार नाही, सैन्य भरतीच्या तारखा जाहीर

Analysis
Spread the love

केंद्राने आणलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला देशभरातील युवकांकडून हिंसक विरोध सुरु आहे.  ह्या पार्श्वभूमीवर तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी  पत्र परिषद घेतली. कुठल्याही परिस्थितीत  ही योजना मागे घेतली जाणार नाही असे  त्यांनी जाहीर केले. या योजनेवर दोन वर्षांपासून चर्चा सुरु आहे. लष्कराच्या  फायद्याच्या दृष्टीकोनातून विचार करुन ही योजना आणली असल्याची माहिती लष्करातील अतिरिक्त सचिव लेफ्टिनेंट जनरल अनिल पुरी यांनी दिली. तरुणांनी शांतपणे ही योजना समजून घ्यावी.  पोलीस पडताळणीशिवाय सैन्यात  प्रवेश मिळत नसतो. एफआयआर दाखल असेल त्या तरुणाला सैन्यात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे  मुलांनी भवितव्य खराब करून घेऊ नये.


               योजनेला वाढता विरोध पाहता केंद्र सरकारने या योजनेमध्ये अनेक तरतुदी जाहीर केल्या आहेत. या योजनेसाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्यात आली आहे. तसेच अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालय आणि कोस्ट कार्डमध्ये १० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालयातील नोकऱ्यांच्या १० टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजूरी दिली आहे. हे आरक्षण माजी सैनिकांसाठीच्या सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त असणार असल्याचे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले.

       पुरी म्हणाले की, या योजनेचा उद्देश तरुणांमध्ये उत्साह निर्माण करणे हा आहे.  सर्व अग्निवीरांना सामान्य सैनिकांसारखे फायदे मिळणार आहेत. आजच्या तुलनेत अग्निवीरांना अधिक भत्ते आणि सुविधा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तिन्ही सेवांमधून दरवर्षी सुमारे १७ हजार ६००  सैनिक मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतात. निवृत्तीनंतर काय करणार, असे त्यांना कोणी विचारण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाही. त्यामुळे ही योजना तरुणांच्या भवितव्यासाठी जाणीवपूर्वक टाकलेले पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

                     एअर मार्शल एस. के. झा यांनी जाहीर केले, की  भारतीय हवाई दलात अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा समावेश करण्याची प्रक्रिया २४ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन होणार असून त्याअंतर्गत नोंदणी सुरू होईल. एक महिन्यानंतर  पहिल्या  टप्प्यातील अग्निवीरांच्या ऑनलाइन परीक्षा सुरु होणार आहेत. डिसेंबरच्या अखेरीस अग्निवीरची पहिली तुकडी हवाई दलात दाखल होईल.

             नौदलाचे व्हाईस अॅडमिरल डी. के. त्रिपाठी म्हणाले, आमची भरती प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. २५ जूनपर्यंत यासंदर्भातील जाहिरातीची माहिती आणि प्रसारण मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे. महिनाभरात भरती प्रक्रिया सुरू होऊन पहिला अग्निवीर २१ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण संस्थेत उपस्थित असेल.

 1,071 Total Likes and Views

0 Comments

No Comment.