मोदींनी आईचे पाय धुतले

Analysis
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन ह्या  वयाच्या १०० व्या वर्षात आज पदार्पण करत आहेत.  त्यानिमित्त मोदींनी गांधीनगरमधील घरी जाऊन  आईची भेट घेतली.   ह्या भेटीचे  फोटो त्यांनी ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत. मोदींनी पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये ते आईचे पाय धुताना दिसत आहेत. “आज मी आईचे आशिर्वाद घेतले. आज ती १०० व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे,” अशी ओळ फोटोखाली मोदींनी दिली आहे.  फोटोंमध्ये आई आसनस्थ झालेल्या खुर्चीच्या जवळ  बसलेले मोदी  आईशी हसून चर्चा करताना दिसत आहेत. एका फोटोत आई त्यांना गोड पदार्थ खावू घालताना दिसतेय. तर अन्य एका फोटोमध्ये मोदी आईचा आशिर्वाद घेताना दिसत आहेत.

       करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे पंतप्रधान त्यांच्या आईला भेटले नव्हते. यंदा मार्चमध्ये ते आईला भेटले होते.  त्या नन्तर  आजची ही भेट आहे. मोदी यांच्या धाकट्या भावाच्या घरी  हिराबेन राहतात.  आजच्या भेटीत मोदी खूप भाऊक झालेले दिसतात.  त्यांनी एक ब्लॉग लिहला असून त्यात  आपल्या आईची थोरवी गायिली आहे.  आई मुलाला केवळ जन्म देत नाही. तर घडवतेही. माझे व्यक्तिमत्व, माझ्यातला आत्मविश्वास  तिचीच देण आहे असे सांगताना मोदी लिहितात, “माझी आई साधी आहे. पण अतिविशेष आहे. तिने शाळेचे कधी तोंड पाहिले नाही. पाहिली ती  गरिबी आणि कमतरता.  वडनगरमध्ये दीड खोल्यांच्या लहानशा घरात आम्ही एवढे सारे  वाढलो.  घराला खिडकी नव्हती, बाथरूमही नव्हते. मातीच्या  भिंतींचे ते घर आई शेणाने  सावरून स्वच्छ ठेवायची.  गोवऱ्यावर  स्वयंपाक करी. वडील पहाटे  चारच्या ठोक्याला घरातून निघून जात. मंदिर आणि नन्तर चहाचे दुकान असा त्यांचा नित्यकर्म असे. आईही चारला उठायची.  तिने खूप श्रम घेतले.  शेजाऱ्यांच्या घरी ती भांडी घासायला जायची. तिने इस्टेट बनवली नाही. तिच्या अंगावर मी कधी सोने पाहिले नाही.  कबीरपंथी आहे. नेहमी माळा जपत  असते.  ह्या वयातही जमेल तेवढे काम स्वतः करते. मला चालता फिरता जायचे आहे असे म्हणते.”

                राजकारणी म्हणून मोदी यांच्याबद्दल मतमतांतरे असतील.  पण  आईबद्दलची त्यांची श्रद्धा प्रत्येकाने घ्यावी अशीच आहे.  मोदींच्या आईचे  विशेष हे , की  ह्या वयातही त्या साध्या राहतात.  साधे जेवण घेतात.  वाढदिवसालाही साधेच जेवण असते. गोडात त्यांना लापशी आवडते.   प्रचंड गरिबीतही तिने मुलांना आत्मसन्मानाने  जगायला शिकवले त्याबद्दल  हिराबेनला मानलेच पाहिजे.  देशाला अशाच आया आणि अशाच मुलांची गरज आहे.  अडचण इथेच आहे. शिवाजी जन्माला  यावा असे प्रत्येकाला वाटते.पण शेजारच्या घरी…हे कसे शक्य आहे?

 955 Total Likes and Views

0 Comments

No Comment.