दहावीचा बम्पर निकाल ९६.९४ टक्के

News
Spread the love

यंदाही राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल भरगोस लागला आहे. एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० टक्के) आहे. यंदा करोना महामारी काळानंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा आहे. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. तरीही निकाल लागला होता ९९.९५ टक्के. म्हणजे जवळपास सारेच पास.  त्यामुळे यंदाच्या निकालाबाबत एक वेगळी उत्सुकता होती. परीक्षेसाठी यंदा राज्यातून  १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १५ लाख २१ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मुलं पास होत आहेत याचा  अभिमानच असला पाहिजे. पण या निकालाचा अर्थ काय?  निकाल फुगला की गुणवत्ता वाढली?  हा बम्पर निकाल काही शिक्षणतज्ञांना चिंतेचा विषय वाटतो.  बारावीचा यंदाचा निकालही असाच ९० टक्केपार लागला होता.

        यंदाही मुलींनी बाजी मारली.  नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ टक्के इतकी आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० टक्के इतकी जास्त आहे. कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ९९.२७ टक्के इतकी आहे. सर्वात कमी उत्तीर्णतेची टक्केवारी नाशिक विभागाची ९५.९० टक्के इतकी आहे.

          राज्यातील २९ शाळांचा निकाल ० टक्के लागला आहे. १ ते १० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या एक आहे. पाच शाळांमध्ये १० ते २० टक्के निकाल लागला. ४ शाळांमध्ये २०-३० टक्के निकाल लागला आहे. १८ शाळांमध्ये ३०-४० टक्के, ३८ शाळांचा निकाल ४०-५० टक्के, ४१ शाळांचा निकाल ५०-६० टक्के निकाल, १२३ शाळांचा निकाल ६०-७० टक्के लागला. याशिवाय ७०-८० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ३२१, ८०-९० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १३३०, ९०-९९.९९ टक्के निकाल असणाऱ्या शाळांची संख्या ८ हजार ८०१ इतकी आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १२ हजार २१० इतकी आहे.

दहावी परीक्षेत एकूण ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातून नियमित विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ५ लाख ७० हजार २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ लाख ५८ हजार २७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ४२ हजार १७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

               मंडळाने  जाहीर केले , की १२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलैपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत असेल. १० वीची पुरवणी परीक्षा २७ जुलैला सुरू होईल. ही परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान असेल. १२ वीचे अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे, १० वीचे अर्ज २० जूनपासून घेण्यास सुरुवात करणार आहे.

 250 Total Likes and Views

0 Comments

No Comment.